जगणं कठीण होत आहे ! मराठी निबंध | JAGAN KATHIN HOT AAHE ESSAY MARATHI

जगणं कठीण होत आहे ! मराठी निबंध | JAGAN KATHIN HOT AAHE ESSAY MARATHI

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जगणं कठीण होत आहे मराठी निबंध बघणार आहोत. आज सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या बोलण्याचा तुम्ही कानोसा घेतलात, तर तुमच्या कानावर एकच वाक्य येईल-'जगणं कठीण होत आहे.' असं का? 


भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे होऊन गेली, स्वराज्यात ज्या सुराज्याच्या अपेक्षा केल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीतच, पण त्याहूनही दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे आणि मग मनात येते की 'याजसाठी केला होता का अट्टाहास!'


दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका अलीकडे दर दोन-चार वर्षांनी येऊ लागल्या आहेत. या निवडणुकांचे वारे वाहू लागले की, वेगवेगळे पक्ष नाना आश्वासने लोकांना देतात. कोळपलेल्या मनात नव्या आशा फुलू लागतात. पण निवडणुका होऊन गेल्यावर लक्षात येते की, आपल्या जगण्यात काही बदल झाला नाही. वाढली असेल ती महागाईच! 


विविध राजकीय पक्षांनी दाखवलेली रम्य स्वप्ने ही स्वप्नेच राहिली. मग, माणूस म्हणतो, भोवतालचे सर्व जग असत्यानेच भरलेले तर नसावे ना? स्वत:ला शिकण्याची संधी न मिळालेले पालक आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना शिकवतात. 


इच्छा एकच असते की त्यांची जीवनशैली बदलावी. त्यांना चांगली नोकरी मिळावी. आपल्यासारखे कष्ट त्यांच्या वाट्याला येऊ नयेत. पण या अपेक्षा पूर्ण होतात का? आजकाल बेकारी एवढी वाढली आहे की, कितीही शिक्षण घेतले तरी नोकरी हमखास मिळेलच असे नाही. 


मग मनात ठेवलेल्या आकांक्षा फलद्रूप होतीलच याची खात्री वाटत नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळत नाही. अशा वेळी एकच गोष्ट तीव्रतेने जाणवते की 'जगणं कठीण झालं आहे.' आजच्या जगण्यात सतत ग्रासणारी एक गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार! कोणतेही क्षेत्र घ्या, तेथे भ्रष्टाचार नाही असे नाही. 


नोकरी मिळवण्यासाठी भ्रष्टाचार, व्यवसायाला मान्यता, अनुमती मिळवण्यासाठी भ्रष्टाचार. आज तर हा भ्रष्टाचार इतका शिष्टसंमत झाला आहे की पैसा न खाणारी, सचोटीने वागणारी माणसेच या भ्रष्टाचाऱ्यांना नकोशी होतात व त्यांना आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी वाटेल ते मार्ग अवलंबले जातात. मग त्या प्रामाणिक माणसांना जगणे कठीण होते.


आज समाजात सर्वांत अधिक बोकाळला आहे चंगळवाद! माणूस विलक्षण आत्मकेंद्रित झाला आहे, स्वार्थी बनला आहे. आपल्या संस्कृतीतील चांगली मूल्ये, संयम, सद्वर्तन या गोष्टी आपण हरवून बसलो आहोत. माणसामाणसांतील जवळीकताच नष्ट होत चालली आहे. 


चैन, उपभोग यांसाठी वाटेल ते केले जाते. त्यांतून व्यसनाधीनता वाढते, तिच्या पाठोपाठ चालत येते गुन्हेगारी. म्हणूनच साऱ्यांनाच जगणे कठीण होत चालले आहे. ज्या भयंकर गोष्टी जगात सगळीकडे पसरत आहेत, त्यांपैकी एक आहे दहशतवाद. 


कोण कोणावर केव्हा गोळी झाडेल वा कोठे बॉम्बस्फोट होतील, हे सांगता येत नाही. या शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने 'खंडणी बहाद्दरांचा' ससेमिरा वाढत आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खंडणी मागावी, त्यासाठी कुणा निरागस बालकाचे प्राण घ्यावे. अशा वार्ता कानावर आल्या की जगणं नकोसे वाटते.


सतत वाढणारी महागाई आणि वाढत्या जीवनगरजांमुळे सामान्याला या जगातून पळून जावेसे होते. मग तो पुटपुटू लागतो 'कोठे जावे काय करावे, नुमजे मजला की विष खावे।। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद