पाऊस पडला नाही तर वर निबंध | Paus padla nahi tar essay in Marathi

 पाऊस पडला नाही तर वर निबंध | Paus padla nahi tar essay in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाऊस पडला नाही तर मराठी निबंध बघणार आहोत. ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना असे कवी आरती प्रभू यांनी आर्ततेने मेघाला आळवले आहे. पाऊस हा मानवी जीवनाचाआधार आहे. कारण आकाशातून पावसाच्या धारा बरसतात, तेव्हाच ही सृष्टी सुजलाम् सुफलाम् होऊ शकते. 


हा पाऊस पाण्याची एवढी उधळण करतो की, 'किती घेशील दो करांनी' अशी स्थिती होते. विशेषतः पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था 'किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋतू तरी' अशी होऊन जाते. पावसाची चाहूल लागते ती वळवाच्या पावसाने. आषाढात मात्र तो कोसळू लागतो आणि श्रावणात तो 'हर्षा'चा ठरतो. मग बालकवी म्हणतात -


'क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनि ऊन पडे' 


पावसाचे हे सारे विभ्रम, पावसाच्या या साऱ्या लीला मानवी जीवनाला हव्याहव्याशा असतात. कारण कवी यशवंत म्हणतात त्याप्रमाणे 'रुप्याची धारा। धारा कोसळते जणू ही रेषा। रेषा भाग्याची' भारतासारख्या देशात मानवी भाग्य हे पावसाच्या धारांवर अवलंबून असते. 


पाऊस कोसळतो. म्हणूनच नदयानाले भरून वाहू लागतात. कालवे भरले जातात आणि शेती, बागायतीला पाणी मिळते. माणसाने आपल्या बुद्धिसामर्थ्यावर कितीही धरणे बांधली, कालवे काढले; पण पाऊसच पडला नाही तर त्याचा काय उपयोग? मानवी जीवन समृद्ध करणारा असा हा पाऊस, पण...


हा पर्जन्यराज कधी कधी बरसू लागला की, थांबायचेच विसरतो आणि सारखा बरसतच राहतो. त्यामुळे मग तयार झालेले धान्य, तयार झालेली फळफळावळही नष्ट होते. कधी हा पाऊस बेभान होतो. नदयानाल्यांनाही पूर येतो. मानवी जीवन धोक्यात येते. 


क्षणापूर्वी उभी असलेली घरे कोसळतात आणि मग सगळीकडे ओला दुष्काळ पसरतो. कधी हा वेडा पाऊस रुसतो आणि गडप होतो. मग लोक विनवण्या करतात. नवस-सायास करतात. कधी अघोरी उपायही योजतात; पण पाऊस येत नाही तो नाहीच.


हा लहरी राजा काही वेळा अवेळी कोसळतो. यासाठी शंभर टक्के त्यालाही दोष देऊन चालणार नाही. काही आपत्ती आज माणसाने आपण होऊन ओढवून घेतल्या आहेत. नागरी जीवनाच्या अवास्तव लालसेतून सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. 


त्यासाठी बरीच वृक्षसंपदा तोडण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. पर्यावरणाची समस्या उभी राहिली आहे. मानवी मनाच्या जमिनीत सौख्य आणि आनंद फुलवण्यासाठी आभाळातून कोसळणारा पाऊसच हवा! पावसाने मानवाच्या भावनिक जीवनावरही मोठा परिणाम केला आहे. 


पाऊस म्हणजे 'रेलचेल,' पाऊस म्हणजे 'विपुलतेचे प्रतीक.' म्हणून तर माणूस आपल्या जीवनात 'पैशाचा पाऊस' अशी शब्दरचना सहज करू शकतो. हा पाऊस माणसाचा अगदी बालपणापासूनचा मित्र आहे.


 'ये रे ये रे पावसा' असा आग्रह करून लहान बाळ पावसाला आपलासा करतो आणि हाच बाळ म्हातारपणी आपण किती 'पावसाळे ' पाहिले, हे आठवत असतो. अशी आहे ही माणसाची व पावसाची गट्टी ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद