ती धन्य बंदिशाला मराठी निबंध | TI DHANYA BNDISHALA ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ती धन्य बंदिशाला मराठी निबंध बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या योग्य सामर्थ्याने मातीची भिंत चालवली. त्यानंतर आणखी एकदा भिंत चालली. हा चमत्कार केला एका प्रतिभावंत कवीने ! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ! तुरुंगात असताना त्यांना अनावर काव्यस्फूर्ती झाली. जवळ कागद, पेन्सिल काहीच नव्हते. काव्याची ऊर्मी तर स्वस्थ बसू देत नव्हती आणि काय चमत्कार!
कारागृहाच्या भिंतीवर काव्य लिहिण्याची विलक्षण कल्पना या कल्पक कवीला सुचली आणि 'कमला' या नितांत सुंदर काव्याची निर्मिती झाली. बंदिशालेच्या खडबडीत भिंतीवर रोमांचाची कमलपुष्पे उमलली. ती धन्य झाली.
बंदिशाला आणि धन्य? विरोधाभास वाटतो खरा ! चोर, दरोडेखोर, खुनी, देशद्रोही यांचा दुःसह सहवास कपाळी रेखलेली बंदिशाला तशी दुर्दैवीच ! मानवच काय समस्त देवांना, सीतामाईला रावणाने बंदी केलेले तिने बघितले. वसुदेव देवकीचा छळ तिला उघड्या डोळ्यांनी पाहावा लागला. प्रसूतीच्या कळा देवकीबरोबर तिनेही सोसल्या.
तिचा देह दगडाचा असेल पण मन मात्र दगडाचे नाही. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चाफेकर, कान्हेरे, मदनलाल धिंग्रा इत्यादी देशभक्तांना सोसावा लागलेला तुरुंगवास तिने छातीवर धोंडा ठेवूनच सहन केला. अंदमानात खितपत पडलेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना काथ्या कुटताना पाहून तिने किती अश्रू ढाळले असतील, त्यांना कोलूला जुंपलेले पाहून किती वेळा हंबरडा फोडला असेल, तिचेच तिला माहीत.
पण तिच्या पदरी कठोर काटे आहेत तशी सगंधी फुलेही आहेत. अंदमानातून बाहेर पडताना तेथील एका जमादाराने स्वा. सावरकरांच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ घातली तेव्हा तिचे डोळे आनंदाने लुकलुकले असतील. त्या माळेतील श्रद्धेचा सुगंध तिने हुंगला आहे. आणि तो देवदुर्लभ, परममंगल क्षण !
भगवान श्रीकृष्णाचे सर्वप्रथम दर्शन घेण्याचं भाग्य जिला लाभलं ती धन्य नाही असं कोण म्हणेल? कवी विनायकांनी या बंदिशालेचं वर्णन केलं आहे - 'गीतारहस्य' बाला, 'कमला' विनायकाला। दे स्फूर्ती गावयाला, ती धन्य बंदिशाला ।। ते सार्थच आहे.
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी 'गीतारहस्य' हा मराठी भाषेला ललामभूत ग्रंथ रचला. तसेच ज्योतिषशास्त्र, वेद, गणित, इत्यादी विषयांचा अभ्यास करुन बंदिशालेला ‘अध्ययनशाला' होण्याचा बहुमान दिला. पाली, हिब्रू, फ्रेंच, जर्मन या भाषांचा अभ्यास करून त्यांनी कारावास सुसह्य केला.
येरवड्याच्या तुरुंगात ‘आर्यांचे मूळ स्थान कोणते?' या विषयावर चिंतन केले तसेच ऋग्वेद संहिता अभ्यासली. सिंहगडावर असताना 'दि आर्क्टिक होम इन दि वेदाज' या पुस्तकाचे लेखन केले. जवाहरलाल नेहरूंनी तुरूंगाच्या चार भिंतीत विशाल जगाच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला आणि प्रियदर्शिनीला पत्राद्वारे कळविला.
साने गुरुजी या सुपुत्राने 'श्यामची आई' ला जन्म दिला तो कारागृहातच. विनोबांना ‘गीताप्रवचने' लिहिण्याची स्फूर्ती येथेच मिळाली. जयप्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांतीचे चित्र रेखाटण्यास सवड दिली या तुरुंगवासानेच..
कारागृहाच्या भिंती या थोर लोकांच्या बुद्धीला, कल्पकतेला, आत्मशक्तीला कोंडून ठेवू शकल्या नाहीत. उलट कल्पनेच्या भराऱ्या मारण्यास, सखोल चिंतन करण्यास व ते शब्दरूपात उतरविण्यास त्यांना येथे भरपूर वेळ मिळाला आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणाशी सामना करत, तुरुंगातल्या नरकयातना सहन करून भरीव असे कार्य त्यांनी करून ठेवले.
या देशभक्तांची तहा काही विलक्षणच ! आपल्याला यमलोकसदृश भासणारी बंदिशाला देशभक्ताला कशी वाटत असेल ? यावर कवी उत्तर देतात. "देशभक्ता प्रासाद बंदिशाला शृंखलांच्या गुंफल्या पुष्पमाला चिता सिंहासन शूल राजदंड मृत्यू दैवत दे अमरता उदंड" मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद