विद्यार्थी जीवनात संचयिकेचे महत्त्व मराठी निबंध | VIDYARTHI JIVANAT SNCHAYIKECHE MAHATVA MARATHI NIBANDH

विद्यार्थी जीवनात संचयिकेचे महत्त्व मराठी निबंध | VIDYARTHI JIVANAT SNCHAYIKECHE MAHATVA MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विद्यार्थी जीवनात संचयिकेचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. आज मी खूप आनंदात होते. माझा वाढदिवस होता आणि माझी छोटीशी बँक मी खोलून पाहणार होते. जिवापाड जतन केलेल्या गंगाजळीत माझ्या पसंतीची वस्तू खरेदी करणार होते. 


गेले कित्येक दिवस संचयिका उघडून पाहण्याचा अनावर मोह मी टाळला होता. माझं अधीर मन मात्र बंडखोरपणा करायचं. चोरपावलांनी जाऊन हळूच ते संचयिकेत डोकवायचं आणि स्वप्नं रंगविण्यात रममाण व्हायचं.


'बबडे' बाबांची हाक कानावर आली. त्यांच्या हातून किल्ली हस्तगत करून बँक उघडली. पंचवीस पैशांपासून बंद्या रूपयापर्यंतच्या नाण्यांचा नाद कानाला सुखवीत होता. कणाकणाने जमविलेली ही रक्कम काय एकाच दिवसात खर्च करुन टाकायची? छे ! छे ! त्यापेक्षा शाळेच्या संचयिकेत ते जमा करावे, मी शहाण्यासारखा विचार केला.


माझ्या या निर्णयाचं आई, बाबा सर्वांनाच आश्चर्ययुक्त कौतुक वाटलं. मात्र माझ्या काही मैत्रिणींना माझा निर्णय म्हणजे 'शुद्ध वेडेपणा' वाटला. "आम्ही चिमुरड्या मुली, आम्हाला कशाला हवी संचयिका नि बचत? खाणं पिणं, मजा करणं असं आमचं फुलपाखरासारखं बागडण्याचं वय," असं त्यांना वाटत होतं. अर्थातच मला ते पटलं नाही. 


माझा निश्चय ठाम होता. "ज्ञानाच्या संचयाबरोबर पैशाचा संचय करण्याची सवय अंगी बाणली तर भावी जीवनात ती उपयुक्त ठरेल," या बाईंच्या सांगण्यावर माझा विश्वास होता. 'कंजूषपणा' हा दुर्गण आहे पण 'काटकसरी वृत्ती' हा गुण आहे. 


बचत करण्याची सवय लागली की आमच्या उधळेपणाला आपोआपच कात्री लागणार आहे. मग ‘संचये किं दरिद्रता?' बचत केलेला पैसा आमच्या अडीअडचणीच्या वेळी कामी येऊ शकतो. तसेच तो 'सव्याज' मिळणार आहे. शाळेतील संचयिकेत काम करताना बँकेच्या व्यवहारांची माहिती होईल. जबाबदारीने काम करण्याची शिस्त अंगी बाणेल.


अचानक एखादी खर्चाची बाब उपस्थित झाली तर संचयिकेतील पैसा हा आमचा हुकमी एक्का' आहे. त्यामुळे कोणासमोर हात पसरण्याचा लाजिरवाणा प्रसंग आमच्यावर ओढवणार नाही. स्वाभिमानी, स्वावलंबी वृत्तीचा विकास होईल.


आमची बचत राष्ट्रकार्याच्या यज्ञात अर्पण केलेली एक छोटीशी समिधा ठरणार आहे. एकटा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलण्यास समर्थ होता पण बालगोपालांनी आपल्या इवल्याशा काठ्यांचा आधार दिला. आमची राष्ट्रकार्यातील मदतही त्या बालगोपालांसारखी अल्प आहे पण 'नगण्य' नाही त्यामागील राष्ट्रप्रेमाची भावना गोपालांच्या कृष्णप्रेमाइतकीच निखळ आहे.


श्रीकृष्णाच्या सुवर्णतुलेत रुक्मिणीच्या तुलसीदलाचं जे महत्त्व तेच प्रचंड राष्ट्रकार्यात आमच्या या बचतीचं ! श्रीरामांच्या सेतुबंधनात खारीने यथाशक्ती आपला वाटा उचलला. राष्ट्रकार्यात आम्ही आमचा वाटाही उचलायला हवा ना?


आजच्या अर्थप्रधान समाजव्यवस्थेत 'बचत करा, बचाव करा' हा सुरक्षित जीवनाचा मंत्र आहे. सर्व आर्थिक संकटापासून स्वतःचे, देशाचे सरक्षण करायचे असेल तर 'बचत' हा राजमार्ग आहे. मग बचतीला सुरुवात करू या आज, आत्ता, ताबडतोब ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद