आम्ही एकादशी करतो मराठी निबंध | Aamhi AKADASHI KARTO ESSAY MARATHI

  आम्ही एकादशी करतो मराठी निबंध | AAMHI  AKADASHI KARTO ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आम्ही एकादशी करतो मराठी निबंध बघणार आहोत.  खरंच सांगतो, भूक मला अजिबात निभत नाही. गवताच्या गंजीवर ठिणगी पडावी आणि पाहता पाहता आगीचा डोंब उसळावा, अशा जातीची माझी भूक! भुकेच्या वेळी तर ती लागतेच पण अवेळही तिला वर्ण्य नसते. 


माझी आई तिला भीमाची भूक म्हणते तर ताई बकासुराची ! संपूर्ण जेवल्यानंतरही जर कुणी भज्याचं तळण केलं तर हात मारल्याशिवाय मी सोडणार नाही. चेष्टेचाच विषय माझी भूक म्हणजे!... असा मी आणि माझी भूक. त्यामुळेच दारातूनच 


"आई, खायला दे" म्हणण्याऐवजी "आई, मी आषाढी एकादशीचा उपास करणार आहे, खरोखरीचा"- असं जाहीर केल्याबरोबर किल्लारीला काय बसला असेल असा जबरदस्त धक्का माझ्या घराला बसला. माझ्यावर अविश्वासाचा ठराव संमत झाला. मी इरेलाच पेटलो होतो. 


खिल्ली उडवणाऱ्या ताईला शरणचिठ्ठी लिहायला लावणार होतो. जमलं तर जमलं, तेवढंच पुण्य पदरी (की सदरी ?) पडेल. नाही जमलं तर, खादाड म्हणून पंचक्रोशीत नाव होतंच.


एकादशी एकटी आईच करायची; आता मी तिला सामील झालो. सदा बरोबरी करायची म्हणून ताईनही संकल्प सोडला. 'एकट्या पप्पांसाठी कुठे स्वयंपाक करायचा?' म्हणून त्यांनाही कंपलसरी झालं उपास करणं!... "एकादशी म्हणजे पोटाला विश्रांती, देवाचं नामस्मरण, आध्यात्मिक आचरण" ही आजीची शिकवण. "... पण उपास याचा अर्थ उपाशी नव्हे" 


हा पप्पांचा युक्तिवाद.  “तेवढाच चेंज' ताईची उडी तेवढीच. “बरं वाटतं" आईचा अनुभव.... मेनूचा घोळच सुरू झाला. साबुदाणा खिचडी आईचा नेहमीचा पदार्थ; पण पप्पांना हवी होती भगर, तर ताईला शिंगाड्याची थालीपिठं, त्रांगडच झालं. अखेर बहुजन सुखाय म्हणून तिन्ही प्रस्ताव पदार्थ 'भुकेल्याच्या जिभेसाठी' करायचं ठरलं. 


कोरडी भगर ओली करायला दाण्याची आमटी आली. ताईने थालीपिठांसाठी लोण्याच्या गोळ्याची फर्माईश केली. “देईन हो, सासरी कोण देईल, न देईल" म्हणत आईची संमती. लोण्याचा गोळा म्हणजे ताजं ताक आलंच! एकादशी म्हणजे बाजारात रताळी आणि बटाटे! 


“एरवी कोण खातंय-" म्हणत रताळी आली. त्याच्या कीस (की खिस?) आणिगोड चकत्यांनी पानात स्थान मांडलं. चवपालट म्हणत बटाट्याची उपासाची भाजी आली. डावा भाग सजवायला पानात लिंबाचं लोणच व राजगिऱ्याची वडी, काकडी सोबत आली. तळलेल्या पापड्यांनी ताटाला पूर्णत्व प्राप्त करून दिलं.... 


स्वीट डिश म्हणून फ्रूट सॅलडचा हल्ला आईनं केळ्यांवर परतवला.... मला खरं तर यातलं काहीच नको होतं. पण ऐकतो कोण माझं? आणि केलेलं टाकायचं कसं? आईला काय वाटेल? बिच्चारीनं एवढं खपून सर्व केलं...


साग्रसंगीत, सुग्रास एकादशीचा फराळ' पोटात रिचवला. “विठ्ठल मंदिरात खूप गर्दी असते आज" म्हणून टी.व्ही. वरच लागलेला 'भक्त पुंडलीक' बघता बघता ब्रह्मानंदी टाळी कधी लागली कळलंच नाही. एक वाजता डुलकलेला मी पाच या भोंग्याचा आवाज, स्वप्नामध्ये "पुंडलीक वरदे हाऽरी विठ्ठल'चा जल्लोष म्हणून ऐकत खडबडून जागा झालो..... पोटाला लागलेली तड तशीच होती. 


डोळ्यांवरची झापड तशीच होती... चुरतुरत्या डोळ्यांनी मी पाहिलं तर... ताई, पप्पा, आई... तिघांच्याही विकेट्स् पडल्या होत्या!!  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद