एका अंधाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Aka Anddhache Atmavrutta Essay Marathi

एका अंधाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Aka Anddhache  Atmavrutta Essay Marathi 


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका अंधाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत.  'डॉक्टर! आज माझ्या डोळ्यांवरची पट्टी काढणार आहात ना?' 'होय, सदाना! आज तू जगाचे दर्शन घेणार आहेस. पण मला एक सांग, तुला आज प्रथम कुणाचे दर्शन घ्यावेसे वाटेल? 


ते जर सांगितलेस तर त्यांना मी आज पट्टी काढण्यापूर्वी तुझ्यासमोर उभं करीन. बोल सदाना, तुला प्रथम कुणाला बघावंसं वाटेल?' ते जर शक्य असतं तर मी प्रथमच नसतं का सांगितलं? या ३० वर्षांच्या आयुष्यापर्यंत जिने माझे संगोपन केले. 


माझ्या बोटाला धरून जिने मला हवे तेथे नेले आणि काय केलं नाही माझ्यासाठी तिनं! तिच्याच तर आधारावर मी आतापर्यंत जगलो; शिकलो, बऱ्याच अंशी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला. तिच्याच नेत्रांनी मी आज जग पाहणार आहे. 


जन्मापासून मृत्यूपर्यंत मला तिची साथ लाभणार आहे; तिचा अपघाती मृत्यू हा नियतीचा केवढा मोठा डाव! माझी प्रेमस्वरूप आई जणू माझ्यासाठीच ! नियतीने रचलेला हा तिच्या भोवतालचा सापळा! त्या अभागी मातेच्या पोटी ३० वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. 


मी जगात आलो ते अंधार घेऊनच! हा अंधार केवळ माझ्यासाठीच नव्हता, तर माझ्या आईच्याही नशिबी होता. कारण माझ्यासारख्या अंध मुलाला जगवताना किती यातना झाल्या असतील तिला! स्वत:चं सुख, समाधान ती हरवून बसली आणि माझ्याभोवती गरगर फिरत राहिली. 


कुठेही बाहेर जायचे म्हटले की तिला प्रथम माझी चिंता वाटे. या चिंतेमुळे ती मला सोडून कुठे बाहेरगावी गेली नाही. रात्रंदिवस माझं सर्व काही करण्यात तिच्या दिवसरात्री कशा संपत ते तिला कळत नसे. जरा अगदी दुसऱ्या खोलीत जाणं झालं तरी ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे येऊन डोकावून जात .असे. म्हणतात ना, 'घार फिरे आकाशी, चित्त तिचे बाळापाशी.'


घरात मी तसा दुर्लक्षितच राहिलो. उलट, सर्वांना माझी अडचण वाटे. माझी भावंडंही माझी उपेक्षा करीत. वडील तर, 'कशाला जन्माला आलास? जन्मत:च मेला असतास तर बरं झालं असतं.' असं म्हणून माझी हेटाळणी करीत. पण माझी माऊली माझी रात्रंदिवस ढाल होऊन राहत असे. 


तिची माया कधीच आटली नाही. उलट ती इतर भावंडांपेक्षा माझ्यावरच अधिक माया करीत असे. मी जसजसा मोठा होत गेलो तसतशी तिच्या चिंतेत भर पडत गेली. पण ती खचली नाही. तिने मला अंधांच्या शाळेत घातले. मीही जिद्दीने शिकू लागलो. S.S.C. झालो, 


पुढे आईने मला व्यवसाय-शिक्षण दिले. मला भांडवल उपलब्ध करून दिले. मी माझा व्यवसाय सुरू केला तेव्हाच त्या मातेला धन्यता वाटली. त्याचबरोबर स्वत:च्या बाबतीतही तिने मला स्वावलंबनाचे धडे दिले. एवढेच करून ती थांबली नाही, तर एका थोडेसे व्यंग असलेल्या मुलीशी माझे लग्नही करून दिले. 


त्या मुलीचाही माझ्याशी लग्न करण्यात मनाचा मोठेपणाच म्हटला पाहिजे. माझ्या जीवनाची गाडी सुरळीत मार्गी लावल्यानंतर माझ्या मातेला थोडी शांतता लाभली. मीही तिच्या जिद्दीला साथ दिली. आता मी तिला विश्रांती देणार होतो. तिची सेवा करणार होतो.


पण नियतीने तिच्यावर घाला घातला नि तिचे अपघाती निधन झाले. तिने म्हणे पूर्वीच आम्हाला नकळत 'नेत्रदान करण्याचा फॉर्म भरला होता. फक्त तिची एकच अट होती, म्हणजे तिचे डोळे मला बसविण्यात यावे. बस्स, त्याप्रमाणे झाले. हा कोणता योगायोग म्हणायचा? नियतीची किमया? की माझ्या मातेची दुर्दम्य इच्छा? 


तिची इच्छा पूर्ण झाली. पण माझी? तिचे प्रथम दर्शन घेण्याची? पण तीच आता माझ्यात सामावणार! तिच्याच नजरेने मी जगाचे दर्शन घेणार! जन्मानंतर तब्बल ३० वर्षांनी मी हे जग पाहणार! कसे असेल ते ?

निबंध 2 

एका अंधाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Aka Anddhache  Atmavrutta Essay Marathi 


'उत्कृष्ट तबलावादनाबद्दल अजय पाटील यांना पहिले बक्षीस मी जाहीर करीत आहे.' अध्यक्षांच्या या शब्दापाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट झाला. माझे मन आनंदाने भरून गेले. मी खुर्चीवरून उठून हळूहळू स्टेजवर गेलो. तेथील स्वयंसेवकांनी मला टेबलापर्यंत नेले. 


मी बक्षीस स्वीकारले.  पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. माझ्या या चाहत्यांना मी पाहू शकत नव्हतो याचे मला वाईट वाटले. माझा अंधपणा मला याक्षणी विशेष जाणवला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. लहानपणी एका मोठ्या आजारपणात माझी दृष्टी गेली. 


विविध औषधोपचार झाले, पण माझी दृष्टी परत आली नाही. माझ्या आई-बाबांना तर दु:ख आवरेना. पण योगायोगाने माझ्या वडलांच्या एका मित्राचा भाऊ अंधशाळेत शिक्षक होता. बाबा मित्रासह त्याच्याकडे गेले. त्याने बाबांना खूप धीर दिला. 


सरावाने अंध व्यक्ती सर्व व्यवहार करू शकतात हे सोदाहरण दाखवून दिले. नंतर मी अंधशाळेत जाऊ लागलो. ब्रेल लिपी शिकलो. आमच्यासाठी असलेली अभ्यासाची व गोष्टीची पुस्तके वाचू लागलो. मी जसजसा मोठा होऊ लागलो तसतसे माझे बाहेर जाणे-येणे वाढले. 


हातात पांढरी काठी घेणे आम्हाला सक्तीचे असते. मला ते आवडत नसे, पण पुढे त्याची उपयुक्तता जाणवली. बसने प्रवास करणे, रस्ता क्रॉस करणे यासाठी मला बरेच दिवस कोणाचीतरी मदत घ्यावी लागे. मला फार शरमल्यासारखे होई. परंतु हळूहळू मी एकटा बसने जा-ये करू लागलो. 


माझा आत्मविश्वास वाढला. अंधशाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर वडिलांनी मला अंधांसाठी चालणाऱ्या कार्यशाळेत घातले. तेथे मी चरख्यावर सूत कातायला शिकलो. वेताच्या खुर्ध्या विणायला शिकलो. सुरवातीला या गोष्टी चटकन जमेनात, पण सरावाने जमू लागल्या. 


एखादे वाद्य शिकावे असे मला वाटू लागले. बाबांनीही मला हौसेने तबलावादन शिकवण्याची सोय केली. नंतर हळूहळू थोडे कौशल्य प्राप्त झाल्यावर मला तबला घेऊन दिला. फावल्या वेळात मी तबलावादनात मन गुंतवू लागलो.


शहरातील एका सेवाभावी संस्थेने अंधांसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गेल्या आठवड्यात तीन चाकी सायकल चालविणे, पोहणे, गायन, वाद्यवादन, अशा स्पर्धा होत्या. मला तबलावादनात पहिले बक्षीस मिळाले. माझ्या आई-बाबांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद झाला. 


मी अंध असल्यामुळे या जगातल्या सुंदर दृश्यांना मी मुकलो आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, झाडे, वेली, फुले हे काहीही मी पाहू शकत नाही. इतरांच्या बोलण्यातून मला या गोष्टींचे सौंदर्य जाणवते. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या आई-बाबांचे चेहरे मी पाहू शकत नाही याचे वैषम्य वाटते.


समाजात आमची आजही उपेक्षा केली जाते. चुकून कोणाला धक्का लागला तर लोक अपशब्द बोलतात. बरेचदा मुले टिंगल-टवाळी करतात. पण त्यातही एखादा प्रेमळ बालक माझी मायेने विचारपूस करतो. रस्ता ओलांडायला, बसमध्ये चढायला, उतरायला मला मदत करतो. 


कधीतरी एखादा सुरकुतलेला हात मायेने माझ्या पाठीवरून फिरतो. मला बरे वाटते. माझ्यासारखे अंध जे आहेत त्यांना समाजाकडून दया, कीव नको आहे. भीक नको आहे. फक्त माणुसकीने आमच्याशी वागा, आमची अवहेलना करू नका. एवढेच आमचे मागणे आहे.