अंधश्रद्धा एक सामाजिक शाप मराठी निबंध | Andhashraddha Ek Shap Marathi Nibandh

 अंधश्रद्धा एक सामाजिक शाप मराठी निबंध | Andhashraddha Ek Shap Marathi Nibandh



नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा एक सामाजिक शाप मराठी निबंध बघणार आहोत. रविवारची जरा निवांत सकाळ होती. चहाच्या कपाबरोबरच 'सकाळ' वाचू लागलो. स्वत:ला मूल होत नसल्याने एका महिलेने एक मुलगा पळवला व त्याला बळी दिले.


ही झाली नरबळीची बातमी. या बातमीखालील 'देशी बनावटीचे रॉकेट-इंजिन लवकर बनवू' अशी ही विज्ञान जगतातील बातमी. या किती टोकाच्या बातम्या आहेत! पहिल्या बातमीने पाताळात गाडल्यासारखे होते, तर दुसरीने आकाशात झेपावल्यासारखे. 


एक अधोगती दर्शवते, तर दुसरी प्रगती दर्शवते. जरा विचार केला तर लक्षात येते की, विज्ञान तंत्रज्ञानात भारत निश्चित प्रगतिपथावर आहे. एकीकडे विज्ञान भारताची प्रगती करत आहे, . तर दुसरीकडे अंधश्रध्दा पाय खेचत आहे. भारतात बालांपासून ते वृध्दांपर्यंत


स्त्री-पुरुष, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत सर्वात अंधश्रध्देचे प्रमाण खूप आहे. भ्रामक समजुती, रूढी, परंपरा यांवरील अंधविश्वासाने सामान्य माणूस अत्यंत अविचारीपणाने वागताना दिसतो.


लहान मुले बाहेर जाताना दोघेजण जात असतील तर तिसऱ्याला बरोबर येऊ देत नाहीत. का? तर म्हणे 'तीन तिघाडा काम बिघाडा'. कावळा घराजवळ ओरडायला लागला तर एखादी स्त्री म्हणते, 'काय रे बाबा, कोण पाहुणा येणार आहे ?' 


पाऊस पडला नाही तर म्हणते 'देव कोपला'. देवाला कोंडा. पोराचा ताप बरा होत नाही, देवाला साकडं घाला. बकरं कापा. असे उपाय करतात. पण डॉक्टरी इलाज करत नाहीत. रोगी दगावला तरी देवाचं करणं धरणं राहिलं म्हणून असं झालं असे मोठ्या (अंध)श्रद्धेने म्हणतात.



काही लोक साधूंच्या मागे लागतात. जपजाप्य करतात. पोथ्या वाचतात. उपवास करतात. अशा बहुतेकांच्या मागे साडेसाती असते. ती संपली तर दुसरा कोणता तरी ग्रह डोके वर काढतो. कोणालाही कळत नाही की साधू हीच साडेसाती आहे. 


याच्या नादाला लागलात तर कोणत्याही फेऱ्यातून कोणाचीही सुटका होणे शक्य नाही. ताईत, दोऱ्यांचा गंडा तर ठरलेलेच. फरक एवढाच की, साधूचे वैभव वाढते व आपले असते तेवढेही राहत नाही. आमचा बहुतांश स्त्रीवर्ग गुरुवारी लक्ष्मीची पोथी वाचणे, शुक्रवारी संतोषी मातेची पोथी वाचणे, उपवास करणे, त्याचे उद्यापन करणे यात मग्न असतो. 


एवढे असूनही कोणाच्याही परिस्थितीत तात्काळ फरक पडलेला दिसत नाही. एकदा तर कहर झाला. माझ्या वर्गातल्या एका मुलाचा डोळा खूप सुजला होता. बाईंनी त्याला 'काय झाले' असे विचारता तो म्हणाला, 'देवीला गेलो नाही, म्हणून ती कोपलीय.' बाईंनी त्याच्या आईला बोलावले.


आईने 'देवीचा कोप' हेच कारण सांगितले. 'मग देवीला का जात नाही?बाई. 'पैशाचा बंदोबस्त होत नाही.'- आई. बाईंनी ताबडतोब २०० रु. . काढून दिले. पैशाचा बंदोबस्त झाला. आई-मुलगा देवीला गेले. बाईंना प्रसाद मिळाला. पुन्हाँ ८ दिवस डोळा तसाच. बाईंनी आईला विचारले, 'आता देवीने डोळा का बरा केला नाही ?' आई निरुत्तर झाली.


बाईंनी मुलाला डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. उपचार केले. डोळा ४-५ दिवसांत . बरा झाला. आई बाईंच्या पाया पडली. म्हणाली, 'आधीच डॉक्टरकडे गेले असते तर बरं झालं असतं.' असे आमच्या बाईंनी अनुभव देऊन डोळे बरे केले व डोळे उघडले.


या अंधश्रध्दांचे मूळ अज्ञान व दारिद्रयात आहे. बुद्धिवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. तसेच कमकुवत मन हे सुध्दा एक सबळ कारण आहे. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी लोकशिक्षणाची गरज आहे. विज्ञानदिंड्या काढल्या पाहिजेत. समस्या काय? 


तिचे मूळ कसे शोधायचे? स्वानुभवावर सत्यासत्य ठरवणे, इ. गोष्टी लोकांना पटवायला हव्यात. अंधविश्वास बाळगून अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवून डोळस श्रध्दा बाळगणे यातच सर्वांचे भले आहे. या सर्वांच्या भल्यातच भारताचेही कल्याण आहे. कारण भारत म्हणजे आपण भारतीयच नाही का?


अंधश्रध्दा-एक सामाजिक शाप  परवा आमची मोलकरीण रजेवर होती. दुसऱ्या दिवशी चौकशी करता कळले की तिची नात वरचेवर आजारी पडते. डॉक्टरांचे औषध लागू पडत नाही. म्हणून बोकडाचा बळी द्यायला ते जेजुरीला गेले होते. देवासमोर बोकड कापला. 


त्याचे मटन शिजविले अन् नैवेद्याच्या नावावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. बिचारे बोकड! 'अजापुत्रो बलिं दद्यात् ! या न्यायाने जीवानिशी गेले. मुलगी अजून खडखडीत बरी झाली नाही हे वेगळेच। शहरात ही कथा, मग खेड्यात काय स्थिती असेल! तेथे तर अजूनही मंत्र-तंत्र, भुतेखेते यांचे प्रस्थ आहे. अमावास्या, पौर्णिमा या

तिथींना काहीही शुभ गोष्ट करू नये हा संकेत ते कटाक्षाने पाळतात. खरे पाहता चांगल्या गोष्टीला मुहूर्ताची गरजच नसते. 'शुभस्य शीघ्रम!' म्हणतात ते खोटे नाही. गृहप्रवेश करताना वास्तुपुरुष जमिनीत पुरण्याची प्रथा तर सुजाण लोकही पाळतात. 


काही लोक वास्तुशांतीनंतर काळी बाहुली उलटी करून दारात टांगतात. एखादे प्रसन्न मंगल तोरण दाराला शोभा देते, पण ही ओंगळवाणी बाहली पाहणेही नको वाटते. हे कशासाठी तर घराला दृष्ट लागू नये म्हणून!
बुवाबाजीमुळे तर अंधश्रद्धेला अधिक खतपाणी मिळते. 


विहिरीला • पाणी लागत नाही म्हणून बाळ-बाळंतीण जिवंत पुरणे ही प्रथाही अतिअमानुष आहे. एका मराठी सिनेमात हे कथासूत्र घेऊन अंधश्रद्धेचा पुरस्कारच केला आहे. एखादा ढोंगी साधू लोकांच्या कमकुवतपणाचा नेमका अंदाज 'घेतो आणि स्वत:चा खिसा भरायला सुरुवात करतो. 


खोटा शिष्यपरिवार जमवतो. संसारातील विविध प्रकारच्या तापांनी पोळलेली माणसे तेथे येऊ लागतात. या लोकांच्या घरची माहिती लबाड शिष्य गुपचूप मिळवतात. मग तो साधू कुणाला अंगारे, कुणाला प्रसाद, कुणाला ताईत देतो. कधीतरी त्याचा अंदाज खरा ठरतो अन् लोक त्याच्या भजनी लागतात. पुरेसा पैसा जमा झाला की एक दिवस तो गुपचूप पोबारा करतो.


मांजर आडवे जाणे, पाल चुकचुकणे, कुत्रा रडणे, झाड कोसळणे या खऱ्या गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. परंतु माणूस आपल्या दैनंदिन जीवनाशी त्यांचा संबंध जोडतो. अंधश्रध्देच्या आहारी जातो.


येत्या पाच-दहा वर्षांत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण वाढीस लागला आहे. समाजात जागृत तरुणांच्या संस्था अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. शहराप्रमाणेच खेड्यातही हे कार्यकर्ते पोहोचत आहेत. लोकांशी गोड बोलून, प्रात्यक्षिकांद्वारे त्यांचे भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.


तरुणांचे हे कार्य प्रशंसनीय आहेच, परंतु लोकशिक्षणाचा प्रसार जसजसा जास्त होईल तसतसे अंधश्रद्धेचे प्रमाण कमी होईल. पण तोपर्यंत अंधश्रध्दा हा समाजाला मिळालेला मोठा शाप आहे. तो शाप नाहीसा करण्याची जबाबदारी आपणां सर्वांची आहे. श्रध्दा जरूर हव्यात, पण डोळस हव्यात. अंधश्रध्दा मात्र झुगारून दिल्या पाहिजेत.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद