अपंगाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Apangache Atmavrutta Marathi Nibandh

 अपंगाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Apangache Atmavrutta Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अपंगाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत.  खरं तर उकिरड्यावरच मी मरायचा. तेही औरस असून ! पण आईनं काळीज घट्ट केलं. धीर सोडला नाही की मलाही सोडलं नाही. खरंच


66 कुपुत्रो जायेत, क्वचिदपि कुमाता न भवति ।” माझ्यासारखा जन्मत: दोन्ही हात नसलेला कुपुत्र जन्मूनही तिनं मला छातीशी धरलं. "काय करणार तू याचं? कुठवर ? त्यालाही अवघड, तुलाही. आश्रमात तरी..." तिनं कुणाचंच ऐकलं नाही. वर थाटानं बारसं केलं. नाव ठेवलंप्रसाद! जणू देवाचा!!


मी म्हणजे नशिबानं तिच्यापुढे उभं केलेलं आव्हान होतं. तिनंही ते स्वीकारलं. पेलण्यासाठी तिनं कंबर कसली. अधूंना अटकाव करत प्रयत्नांची शर्थ करू लागली... दिसामासाने मी वाढू लागलो. मुठी न चोखता पायाचा अंगठा चोखू लागलो. रांगण्याच्या ऐवजी मी वळवळत होतो. 


अन् एकदा चमत्कार झाला.... कधी तरी पायाचा रेटा देऊन मी उठून बसलो. कुणाच्या मदतीशिवाय!... आश्चर्यानं, आनंदातिशयाने आई धावली... माझ्या पायाची असंख्य चुंबनं घेत मला कुरवाळत राहिली. 


माझ्या पायांनी तिला वाट सापडली. हळूहळू पायाचा वापर ती शिकवू लागली. आणि पायांनी खेळणं, भांग पाडणं, दात घासणं, चमचा धरून पायानं जेवणं असे तिनं घालून दिलेले धडे मी शिकलो. सावलीसारखी ती माझ्यासोबत असायची. 


शाळेतसुद्धा. हो, जिद्दीनं तिनं मला शाळेतही घातलं... सारे कुतूहलानं पाहायचे. तालुकाभर चर्चेचा मी विषय झालो. दोन्ही खांदे झाकलेला, बंद गळ्याचा अंगरखा मला रोमन राजपुत्राची ऐट द्यायचा. गळ्यात दप्तर असायचं. आईची जिद्द मी उचलली. 


बुद्धी तेज होती, चेहरा गोड होता, ज्ञानेंद्रिये चलाख होती, पायात बळ होतं- नव्हते तेवढे हात! पण पायानं मी लिहायचो, पायचित्रे काढायचो, पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचो, अभंग गायचो. 


शाळेत घेतल्याचं गुरुजींना समाधान वाटायचं... सज्जन मुले मदत करायची. पण व्रात्य मुले खोड्या काढायची. भुंडा' म्हणून चिडवायची. ढकलून पाडायची. आई म्हणाली, “तुला पाय आहेत ना? मग?" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.