एका हमालाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography of Worker Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका हमालाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. गरिबीचा वारसा घेऊन जन्माला आलो. पोरगा झाला, आईबापाला आनंद झाला. खायला तोंड वाढलं पेक्षा राबायला दोन हात जास्त मिळाल्याचा तो आनंद होता. ठेवलेलं 'केरबा' नाव केव्हाच केराच्या कुंडीत गेलं.
तेही बरंच झालं. 'सोनुबाईच्या हाती कथलाचा वाळा' पेक्षा हे बरं... ए पोऱ्याऽ' 'ए बारक्याऽ' हाकांनी बालपण गेलं. आता 'हमाल पंचायत समिती'चा नंबर हीच माझी ओळख राहिली आहे. रोगांना, एकादशीला आमची झोपडी आवडते. भाकरी, डबलरोटी पक्वानांचं ताट खोपटात शिरूच देत नाहीत.
म. गांधी फॅशनचे कपडे आम्ही पिढीजात करतो. गाडगी, मडकी आमची घराची शोभा. धरतीची गादी, वर आकाशाची काळी घोंगडी, असा आमचा थाट असतो. माझ्या पाठच्या बाळंतपणात माय मेली. बांधकामाच्या भिंतीखाली 'बा' गाडला गेला.
“आई मेली बाप गेला।
आता सांभाळी विठ्ठला"
चा अभंग गात, पोट हातावर घेऊन हिंडू लागलो. भीकही मागितली. बुकाचं वारं लागलं नाही पण भुकेचं वादळ घोंघावत होतं. हॉटेलात 'पोऱ्या' झालो. त्याच भटारखान्यात खात मोठा झालो आणि या भाजी मंडईत टेंपोतून गोबीचा गड्डा पडावा तसा येऊन पडलो.
तेही बरेच झालं. नुसती फेकून दिलेली, रस्त्यावर पडलेली कच्ची भाजी खाल्ली तरी पोट शांत व्हायचं. मुळा, टमाटा, गाजर, फुलवर, काकडी खात मी इथे रुळलो. मिळालेल्या हमालीत भाकरी भेटायची. छान होतं. शिव्या देऊन शिळे खायला देणाऱ्या शेट्टीपेक्षा, कळकट भटारखान्यापेक्षा ताज्या, गोड भाज्या, मोकळा श्वास, भरपूर उजेड देणारी छान छान माणसं दाखवणारी मंडई मला फार आवडली.
आता माझा दिवस ठरल्याप्रमाणे जातो. पहाटे ट्रक, टेंपो यायच्या आत उठायचं. पब्लिकसोईवर सारे उरकायचे. तयार व्हायचं. चहाच्या गाड्यावर चहाबरोबर पाव किंवा भजी खाऊन न्याहरी केली की गडी खूष!... टेंपोतून भाज्यांच्या टोपल्या काढून ज्या त्या दुकानदाराला द्यायच्या, ठरावीक विक्रेत्यांच्या दुकानाची झाडलोट करून पाणी मारायचं. भाज्यांचे ढीग लावायचे.
दुकान मांडायचं, त्यांचं पिण्याचं पाणी हंड्यात भरायचं... गि-हाइकांची ओझी वहायची, रिक्षापर्यंत सोडायची, गाड्यांमध्ये ठेवायची, मिळेल ती लक्ष्मी खिशात ठेवायची... सूर्य डोक्यावर कधी येतो कळत नाही. पोटातले कावळे मात्र विसरत नाही. कष्टाची भाकर, केंद्रावरून घ्यायची, आडोशाला भाजीबरोबर खायची. तिथंच पाय दुमडून मस्त झोपायचं.... जाग आली पुन्हा तेच!
मंडई हा माणसांचाही बाजार. टमाट्यासारखे लालबुंद गालांचे, चवळीच्या शेंगेसारख्या डौलदार बांध्यांचे, लाल भोपळ्यासारखे गरगरीत अंगाचे, पडवळासारखे लंबोडे, बटाट्यासारखे बटबटीत डोळ्यांचे, फणसाच्या सालीसारखे खडबडीत कातडीचे- कित्ती नमुने!
वागणंही वेगळंच. ढब्बू मिरचीसारखे फुसके, डागाळलेल्या अंब्यासारखे नासके, कोल्हापुरी मिरचीसारखे तिखट, मुळ्यासारखे तुरट, चिंचेसारखे आंबट, केळासारखे मऊ, नारळासारखे टणक... स्वभावही तसेच, काटा मारणारे विक्रेते लबाड, भरपूर हमाली देणारे दिलदार.
'गरिबांना मोफत घरे सरकार देणार आहे' अशी चर्चा मंडईत ऐकली. चला. ही पण चिंता मिटेल. आता घर मिळालं की लगीन करून टेचात हमाली करायची. काय बिघडलं?... तुम्ही प्रतिष्ठेचे, जबाबदारीचे, कर्जाचे, काळजीचे ओझे वाहता आणि तो वर बसलेला देव तरी काय तुमचं आमचं सर्वांचं ओझंच वाहतो ना?
आम्ही आपले आमच्या लेवलला भाजीच्या टोपल्यांचे ओझे वाहतो. तुम्ही, आम्ही आणि वरचा 'तो' सारे हमालच- भारवाहक म्हणू या! पटतं ना? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद