बचत मराठी निबंध | Bachat Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बचत मराठी निबंध बघणार आहोत. 'आपल्या शाळेची संचयिका उद्यापासून सुरू होत आहे. तरी विद्यार्थ्यांनी संचयिकेत शाळा सुटल्यावर पैसे भरावेत. ज्यांची खाती संचयिकेत अद्याप नसतील त्यांनी ती उघडावीत.' अशी मुख्याध्यापकांच्या सहीची सूचना वर्गात आली.
तास मराठीचा होता. बाई म्हणाल्या, 'बरं झालं, नोटीसमुळे आठवलं, आपल्याला निबंध लिहायचा आहे.' बाईंनी फळ्यावर विषय लिहिला 'बचत' आणि म्हणाल्या, 'आताची सूचना ऐकलीत ना? मग, तुम्ही बचत का करता? अजूनही कशा कशाची, बचत करता येईल?
विचार करा व कच्चा निबंध लिहून आणा. नाहीच जमले तर मग सविस्तर चर्चा करू.'शाळा सुटली. डोक्यात निबंधाचा विषय घोळू लागला. तेवढ्यात मित्र एका झाडाकडे बोट करून म्हणाला, 'अरे, ते पाहिलंस का?' मी त्याने दाखवलेल्या दिशेने पाहिले.
पाहतो तो भले मोठे मधमाशाचे पोळे लागलेले होते. ते पाहून मला निबंधाचा एक मुद्दा समजला. खरंच मधमाशा रोज थोडा थोडा मध गोळा करतात व साठवतात. म्हणजे त्यासुद्धा मधाची बचतच करतात. शाळेतल्या मुलांकडे फार पैसे नसतात. म्हणून शाळेतल्या बँकेचे नाव संचयिका आहे तर!
किती सार्थ नाव! संचय म्हणजे साठा. रुपया-रुपयांनी बचत. मधमाशीप्रमाणे थेंब थेंब. खरंच थेंबे थेंबे तळे साचे' म्हणतात ते खोटे नाही. नियमित थोडी थोडी बचत करणारे विद्यार्थी सहल, वह्या, पेन इ. छोटे खर्च संचयिकेतील पैशातून करतात.
जर भविष्यकाळ चांगला जावा असे वाटत असेल तर प्रत्येकाने बचत करणे आवश्यक आहे. म्हणून तर बँका, विमायोजना, पोस्टऑफिस बचतीच्या जाहिराती करत असतात. बचतीच्या नवनवीन योजना राबवत असतात. मुलांचे शिक्षण, विवाह, आजारपण आणि इतर ऐनवेळी जर काही आपत्ती आली तर आपणच शिल्लक टाकलेले पैसे आपल्याला खूप उपयोगी पडतात.
तेव्हा तर बचत केल्याचे समाधान ओसंडून वाहते. कारण कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. स्वाभिमान टिकून राहतो. तसा आयता पैसा फार थोड्यांच्या नशिबी असतो. पैशाची बचत तर केलीच पाहिजे. परंतु वीज, इंधन, वेळ, पाणी यांचीही बचत केली पाहिजे.
ज्या खोलीत माणसे आहेत तेथेच दिवे, पंखे आवश्यक तेव्हा लावावेत. खोलीतून जाताना, घरातून बाहेर पडताना दिवे, पंखे आठवणीने बंद केलेत की नाही हे पाहावे. तसेच प्रत्येकाने घराप्रमाणेच वीजबचतीकडे लक्ष दिले पाहिजे.
लाल दिवा लागला की वाहने बंद करून पेट्रोलची बचत करावी. वाहनांची वारंवार तपासणी करावी. वेगमर्यादा कमी ठेवावी. ब्रेक सारखा दाबू नये. बाहेर वस्तू आणण्यास जायचे असेल तर शेजारच्या एकदोन घरात विचारून त्यांच्याही वस्तू आणायच्या असल्यास आणून द्याव्यात.
• एकाच दिशेने जाणाऱ्या शेजाऱ्यांनी एकच वाहन दोघांत वापरून पेट्रोल व पैसे दोन्हींची बचत करावी. घरात स्वयंपाकाला शक्यतो पसरट भांडी वापरावीत. कुकरची आधी तयारी करून मगच गॅस पेटवावा. जास्तीत जास्त भाज्या प्रेशर पॅन'मध्ये कराव्यात.
उन्हाळ्यात घराला अंगण, गच्ची असेल तर सूर्यकुकर वापरावा. पाणी सुद्धा ओतून देऊ नये. गळणारे नळ बदलावेत. वाहता नळ घरचा व सार्वजनिक ठिकाणचा बंद करावा. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच कमी वेळात अनेक कामे उरकायची असतात.
वेळ कमी, कामे अनेक. अशा वेळी आहे त्या प्रत्येक वेळेचा उपयोग करुन घेतला पाहिजे. काळावर नजर ठेवून आपल्या दैनंदिन कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सकाळी जाण्याआधी घरी उरकायची कामे, जाताना वाटेत करण्याची कामे, सुटीची कामे, कमी महत्त्वाची, तातडीची,
हे सर्व प्रकार लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या कामाची आखणी केल्यास वेळ कमी पडणार नाही. कामाचा ताण वाटणार नाही. हिंदी कवी वेळेबाबत म्हणतातक्षण क्षण काल इकट्ठा करके लंबा युग बन जाता है। क्षण को क्षुद्र न समझो भाई वह जग का निर्माता है।
क्षणाक्षणाची बचत केली तर काय कारायचे- वेळच मिळाला नाही' अशी सबब कोणालाही सांगता येणार नाही. अशा प्रकारे पैसा, वीज, पाणी, इंधन, वेळ या सर्वांची बचत केली पाहिजे. कारण यातच भारताचे हित आहे. भारताचा विकास आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद