माझे शेजारी मराठी निबंध Essay on My Neighbour in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे शेजारी मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण माझे शेजारी शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत बदलत्या परिस्थितीनुरूप चाळी, वाडे यांची संख्या नगण्य आहे. त्यांची जागा आता बंगले, अपार्टमेंटस्, फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. त्यामुळे चाळीतल्यासारखे अगदी निकटचे असे शेजार, घरोबा कमी व्हायला लागलेत.
त्यातच गरजेपोटी स्त्रिया घराबाहेर कामाला जाऊ लागल्या. त्यामुळे दोन्ही भाऊ शेजारी पण भेट नाही संसारी' या म्हणीप्रमाणे शेजाराची अवस्था सद्य:स्थितीत आहे. याचा अर्थ असा की, दोन्ही डोळे शेजारी असतात पण मध्ये असणाऱ्या नाकामुळे डोळे एकमेकाला भेटू शकत नाहीत.
त्याप्रमाणेच फ्लॅट व बंगल्याची दारे सारखी बंद असल्यामुळे व जो तो आपल्या उद्योगात असल्याने कारणा-कारणांनीच, प्रासंगिक असेच शेजाऱ्यांशी प्रत्यक्ष संबंधात येतात. आपल्या घरांच्या खिडक्या, सजे याद्वारे शेजाऱ्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत असते. काही शेजारी उपद्रवी, तर काही निरुपद्रवी असतात.
आमच्या डावीकडे अष्टेकरांचा बंगला आहे. आमच्या सोसायटीतील एकुलते एक एकत्र कुटुंब आहे. घरात तीन पिढ्या राहत आहेत. आजोबा, आजी, मुले, सुना, मुली, नातवंडे अशी १५-२० माणसे घरात आहेत. सकाळी आठ ते रात्री बारा सतत आवाज चालू असतात.
सर्वांना चित्रपटाचे, गाण्याचे वेड आहे. त्यामुळे व्ही. सी. आर. वर रोज तीन चित्रपट लावतात. ते सुद्धा इतके जोरात की आम्हाला सर्व ऐकू येतात. अभाव असतो फक्त चित्रांचा. सरळ सांगितले तर बोलत काही नाहीत, पण अजूनच आवाज वाढवतात: घरात ७-८ नातवंडे आहेत.
ती आळीपाळीने तारस्वरात रडून आवाजात आणखीच भर घालतात. आजी-आजोबांपासून ते नातवंडांपर्यंत सर्वांना नटण्याचे वेड आहे. त-हेत हेचे रंगीबेरंगी, चित्रविचित्र कपडे सर्वजण घालतात. लहान मुलींपासून ते आजीपर्यंत दिवसातून अनेक वेळा तोंडावर पावडरीचे थर देत असतात व लिपस्टिक झिजवत असतात.
इकडे असा नट्टापट्टा, तर दुसरीकडे रॉकेलपासून साखरेपर्यंत सर्व वस्तूंची आमच्याकडे उसनवारी चालू असते. करता काय, 'शेजारधर्माला' जागले पाहिजे ना! आमच्या समोर मेहता राहतात. या मेहताबाईंना संधीवात आहे. शरीराची धनुकली झालीय. पण स्वच्छतेचं वेड दिवसेंदिवस वाढत आहे.
या स्वच्छतेचा त्यांना तर त्रास होतोच पण घरातल्यांनाही होतो. घरात धूळ येऊ नये म्हणून खिडक्या सतत बंद असतात. कोणी बसायला त्यांच्याकडे गेले तर ते माणूस दाराशी जातेय तोच या बाई ती जागा स्वच्छ पुसून घेतात. मोलकरणीला तर त्यांच्या नजरेच्या धाकातच धुणीभांडी करावी लागतात.
त्यामुळे दर महिन्याला नवी बाई कामाला दिसते. मेहतांच्या शेजारी गंधे राहतात. हे घर पूर्वीची संस्कृती, रीतीरिवाज धरून आहे. उपवास, व्रते, पूजाअर्चा नेहमी चालू असतात. मेहता अतिस्वच्छ, तर हे सोवळ्याच्या नावाखाली तेलकट, मेणचट कुटुंब आहे.
आमचा फोन त्यांचाच असल्याप्रमाणे फोन करत असतात. शिवाय दिवसाकाठी त्यांना किमान एक फोन कुणाचातरी येतो. तेव्हा त्यांना बोलावण्याचे काम मलाच करावे लागते. कुणाकुणाला आमचा नंबर दिलाय कोण जाणे! आता प्रत्येक फोनच्यावेळी त्यांना बोलावणे म्हणजे खरे त्रासाचेच आहे.
पण आम्हाला हा त्रास वाटत नाही. कारण ते कोणतीही मदत करायला नेहमी तयार असतात. आमच्या उजवीकडे भेंडे राहतात. या बाई समाजसेविका आहेत. कधी कधी समाजसेवा अंगलट येते तेव्हा जोरजोरात चिडून बोलत असतात. बागकाम हा यांचा छंद आहे.
विविध प्रकारची रोपे कुंड्यांत छान वाढविली आहेत. सर्वांना मदत करतात. अडीअडचणीला शेजारीच आधी येतात, मग नातेवाईक! हे जाणून आम्ही सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. आम्ही सर्व मिळून गणेशोत्सव साजरा करतो.
नवरात्रात 'गरबा' नाचतो. हळदी-कुंकू, डोहाळजेवण, बारसे इ. समारंभांनिमित्त एकत्र येतो. असे हे कुंपणापलीकडचे आमचे विविध शेजारी आहेत. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
माझे शेजारी मराठी निबंध Essay on My Neighbour in Marathi
'निंदकाचे घर असावे शेजारी।' असे तुकारामांनी म्हटले आहे. त्याचा अभिप्रेत अर्थ असा की शेजाऱ्याने केलेल्या निंदेतून आपल्याला आपले दोष कळतात आणि स्वत:ला कसे सुधारावे त्याची दिशा मिळते.
परंतु आजकालच्या युगात मात्र या वाक्याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे.
काहीही कारण नसता उखाळ्यापाखाळ्या काढणारे शेजारी. आपण काही नवीन वस्तू आणली व त्यांना दाखविली की हेव्यापोटी त्या वस्तूला नाक मुरडणारे शेजारी, गोड बोलून उसने नेणारे शेजारी निंदक
तर असतातच, पण त्यांच्या विचित्र वागण्याने 'नको ते शेजारी' असे वाट
लागते.
आता आमच्याच वाड्यात पहा ना. समोरच्या पवारकाकू. मूलबाळ नाही. काका रेव्हेन्यू खात्यात नोकरी करतात. काकू कमी शिकलेल्या. घरातच असतात. एकटीला कंटाळा येतो म्हणून सतत त्या आमच्या घरात. चहाच्या वेळी दुपारी तर हमखास हजर. घरातली वस्तू कधीही दुसऱ्याला देणार नाही.
चहा-खाणे तर दूरच; पण गोड बोलून दुसऱ्याकडून सगळे लाटतात. दिवाळीचा फराळ तयार करायला माझी आई, बहीण ह्यांना हक्काने बोलावून नेतात. वरच्या देशपांडे आजींची गोष्ट जरा वेगळीच. पेपर वाचायला खूप आवडतो पण कधीही विकत घेणार नाहीत.
आमचा पेपर हक्काने मागून नेतात. चहाला या, चहाला या' असे खूप वेळा म्हणातात, पण प्रत्यक्ष बोलावत नाही. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. तोंडाने सतत महाराजांचा (गजानन) जप चाललेला असतो.
पलीकडचे मराठे कुटंब मात्र अतिशय दिलदार आणि मनमोकळे. गावाकडे त्यांची शेती, मळे आहेत. तिकडे जाऊन आले की सर्व वाड्यात शेंगा, मक्याची कणसे, हरभरा मुक्तपणे वाटतात. त्यांची मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. ती कधी कधी येतात,
पण एरवी आम्ही मुलेच त्यांच्या घरात हक्काने वावरतो. दर शुक्रवारी शेंगदाणे, फुटाणे हा खाऊ तर आमच्यासाठी ठरलेलाच. एखादा नवा पदार्थ केला की काकू हाक मारून आम्हाला खायला देतात. आम्ही कोणी आजारी पडलो की मदतीला ते दोघे तयार असतात. त्यामुळे आम्हीही त्यांना खूप मानतो.
वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दाणीकाकू मात्र अतिशय शिष्ट आणि गर्विष्ठ. दाणीकाका मिलिटरीतून रिटायर झालेले. गावाबाहेर त्यांचा बंगला बांधण्याचे काम चालू आहे. एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झालेला. त्यामुळे स्वत:च्या मुलाचे, पतीचे कौतुक करण्यापुरतेच त्या इतरांशी बोलतात.
कधीतरी घरगुती समारंभानिमित्त वाड्यातील सर्वांना बोलावतात, तेव्हा घरातील महागड्या वस्तूंचे, कपड्यांचे प्रदर्शन करणे हाच त्यांचा हेतू असतो. एरवी त्या कधी कोणात मिसळत नाही.
असे हे दोन-तीन शेजाऱ्यांचे मासले. कधी कधी हे शेजारी डोकेदुखी ठरतात; पण शेवटी एकत्र राहायचे या भावनेने तडजोड करावीच लागते. 'शेजारधर्म' पाळावा लागतो.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद