जंगलातील एक दिवस निबंध मराठी | | janglatil ek divas essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलातील एक दिवस मराठी निबंध बघणार आहोत. जांभूळघाटी ओलांडून जीप भिंगरीच्या जंगलात शिरली आणि वृक्षांच्या छत्रीनं आमच्यावर सावली धरली. जाणवली ती जंगलाची धीरगंभीर प्रकृती! शांततेला पशुपक्ष्यांचे आवाज छेद देत होते.
आमच्याबरोबर वनात घुसलेला आगंतुक वारा झाडेवेलींशी मस्ती करत होता. कधी चक्क शीळ घालत होता... वृक्ष आपले मस्तक हलवून आमचे स्वागत करीत होते. वनदेवतेला आमची खबर द्यायला माकडं दूर आत पळाली. शेपट्या उंचावत खारी वृक्षांचे मल्लखांब चढून गेल्या.
ससे स्तंभित नजरेनं पाहून माघारी फिरले. "मी माणूस पाहिला" ही वार्ता घरच्यांना सांगायला कदाचित्! ... हळूहळू जंगल दाट होत गेलं. डेरेदार वृक्ष व कमनीय वेलींच्या कमानीखालून, हिरव्यागार गवतांच्या पायघड्यांवरून आम्ही जात होतो. सोबतीचा मंगळ्या हा आदिवासी जंगलाची रनिंग कॉमेंट्री करत होता.
चिंच, निंब, जांभूळ यांबरोबर किंजळ, बदरी, धत्तूर, बृहती, दाडिमी, मरुबक या वृक्षपरिवाराशीही भेट करवून दिली. डब्यात दिसणारे बिब्बा, बेहडा, जायफळ उघड्यावर पाहून मजा वाटली. फुलांचे तर प्रदर्शनच होते. मोहाची शराबी फुलंही मंगळ्यानं दाखवली.
आकार, रंग, वास यांची लयलूट होती... ऑक्टोबरचे दिवस म्हणून आंबे, जांभळं नव्हती पण अनोळखी फळांचा रानमेवा मंगळ्यानं असा खिलवला की 'यँवरे यँव!...' जंगल यात्रेला हेच दिवस चांगले- इति मंगळ्या! पाणवठे भरलेले, गवत खूप, तृणभक्षक पुष्ट, मांसाहारी प्राणीही संतुष्ट.
जमीन ओली म्हणून त्यांचे ठसे ठसठशीत- खरंच होतं ते! फलाहारानंतर नागवेलीची पानं चघळताना मंगळ्यानं “गप्प रहा", म्हटले व जमिनीवर तो ठसे पाहू लागला. माझ्या अंगावर काटा! “मी तुला आता खाणारऽ” म्हणत वाघ येतो काय असे वाटून. "चला हरणं दावतो" म्हणत त्यानं आम्हाला पाणवठ्यावर नेलं.