क्रांतिकारकांचे आत्मवृत्त मराठी निबंध | Krantikarakache Aatmvrat marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण क्रांतिकारकांचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. १५ ऑगस्ट १९४७! स्वातंत्र्याचं पवित्र, भव्य संगमरवरी मंदिर बांधून पूर्ण झालं. वासुदेव बळवंत, तात्या टोपे, झाशीची राणीसारखे त्याचे पायाचे दगड झाले.
भगतसिंग, राजगुरूंसारखे चिरे झाले. टिळक, गांधी, नेहरूंसारखे त्याची शिल्पे अन् नक्षी झाले.... अन् त्यासाठी लागलेल्या असंख्य वाळूकणांपैकी मी एक झालो! “अलंकारण्याला त्या मंदिराला, कणाचेच आहे मला भूषण!"शिरढोण या खेड्यातला मी, सामान्य घरातला!
हूड आणि छांदिष्ट, लहानपणापासूनच. शिक्षणाची गैरसोय माझ्या सोयीची. घरीच धुळाक्षरं शिकायची अन् दिवसभर हुंदडायचं. घरच्यांना काळजी वाटायची म्हणून तालुक्याच्या गावी शिकायला पाठवलं. अंगात हडपणा होता पण मस्तकात शहाणपण होती शिकलो.
पोस्टात पन्नास रुपयावर नोकरदार झालो...मी मार्गी लागल्याचं समाधान घरच्यांना वाटलं. पण नोकरी करता करता मार्गी लागलेला मी वक्री होऊ लागलो... कमी शिकलेला गोऱ्या कातडीचा हेडक्लार्क पगार जास्त घेऊन आमच्या कातडीचा द्वेष करायचा. पाणउतारा करायचा.
"इंडियनांची लायकी पाच रुपयांची, पण पंचम जॉर्ज दयाळू आहे..." नोकरीत गुलामगिरीची कडू चव घेत होतो. सहकारी मनातून चिडायचे पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? मी धुमसत होतो... अखेर ठिणगी पडलीच. एकदा आईच्या आजारपणासाठी माझी रजा त्यानं धुडकावत,
“Let your mother go to hell" असे अपशब्द वापरल्याबरोबर “You swine brute- सही कर नाही तर याद राख" गर्जत त्वेषाने मी धावून गेलो. सारे अचंबित झाले. हरखून गेले. सळसळून उठले. “Sorry म्हण."मी गरजलो. माझारुद्रावतार पाहून तोगांगरला. रजा मंजूर झाली... 'वीर', 'पळ्या', 'हीरो' असा सहकारी माझा उल्लेख करून लागले. माझ्या गैरवर्तनाच्या चौकशीत ते माझ्या बाजूने उभे राहिले.
प्रतिकार केला तर दुर्बळही काही करू शकतो. याचा अनुभव माझ्यात बदल घडवू लागला. गांधी, नेहरू, पटेल, बोसांची भाषणे माझं रक्त तापवू लागली. आईसाठी मी भांडलो मग भारतमातेसाठी? आम्ही तिचे पुत्र, षंढ?... मी अस्वस्थ होत होतो. असे खूप अस्वस्थ साथीदार होते.
आम्ही एकत्र आलो. गुप्तपणे भूमिगतांना मदत करू लागलो. “जागा न सोडता मदत करा.” त्यांची सूचना, म्हणून नोकरी करत होतो... सरकारी पत्रातील गुपितं त्यांना फोडू लागलो. तारांतील मजकूर त्यांना देऊ लागलो. भूमिगतांची खोटी पत्रं सरकारच्या हाती देऊन दिशाभूल करू लागलो.
१९४२ ची गोष्ट! सारे थोर नेते पकडले गेले. 'चले जाव!' चा नारा भारतभर घुमला. “प्रत्येकाने योग्य वाटेल ते करावे." हा गांधींचा आदेश. 'करेंगे या मरेंगे' म्हणत सारे पेटून उठले.... मीही साथीदारांबरोबर कट शिजवू लागलो. जिल्ह्याच्या गावातून तालुक्याच्या पोस्टकचेऱ्यांना रोकड यायची.
तो खजिना लटायचा घाट घातला. पाटसच्या घाटात दबा धरून बसलो. नजरेच्या टप्प्यात येताच दगडगोट्यांचा मारा करून बंदोबस्त विस्कळीत केला. काही समजायच्या आत धाडशी वीरांनी मुसंडी मारून खजिना हस्तगत केला. थैल्या घेऊन वाऱ्यावर स्वार होऊन ते पसार झाले. त्या धुमश्चक्रीत मीही दोन सोल्जर्सना
जायबंदी केले. वर साळसुदासारखा कचेरीत येऊन लुटीची खबर दिली. कचेरीतील बंदकधारी तिकडे धावताच... कचेरीलाच आग लावून दिली. “तुझे पुत्र आम्ही तुझे पांग फेडू"... भारतमातेला मनोमन म्हटले. पुढे पकडले गेलो. तुरुंगात गेलो. आमच्या कृत्यांच्या देशभर आवृत्त्या निघाल्या. युनियन जॅक उतरला आणि तिरंगा मानाने फडकू लागला. सांगणं एवढंच
हम लाये हैं तुफानसे किश्ति निकालके इस देश को रखना मेरे बच्चो सँभालके।"मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.