Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh | माझी आवडती शिक्षिका मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आवडती शिक्षिका मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण माझी आवडती शिक्षिका असलेले दोन निबंध बघणार आहोत इयत्ता ५ वी ते १० वी या शिक्षणप्रवासात प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात. पण एखादा शिक्षक आपल्यावर असा काही ठसा उमटवून जातो की तो पुसता पुसलाच जात नाही.
अशाच आहेत आमच्या मराठीच्या अत्रेबाई. त्या मला ५ वीला मराठी, चित्रकला, पी.टी., तर ६ वीला इंग्रजी, सामान्यविज्ञान, सातवीला गणित, हिंदीला होत्या, तर आठवीला इतिहास, संस्कृतला होत्या. पुन्हा मी नववीत जाते तर मराठीला अत्रेबाई.
१० वीला पण मराठी त्याच शिकवतात. एकूण काय की आमच्या शाळेत बाईंनी सातवीपर्यंत सर्व विषय शिकवले आहेत. सुदैव असे की प्रत्येक वेळा अत्रेबाईंच्या वर्गात मी आहेच. या बाईंच्या बाबतीत माझ्या असे लक्षात आले की, विषय कोणता का असेना, तो सोपा करण्यात बाईंचा हातखंडा आहे.
विद्यार्थ्यांवर उत्तम छाप पडेल असे बाईंचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची उंची बेताचीच आहे. रंग उजळ आहे. नाक सरळ, मोठे टपोरे डोळे, कमनीय भुवया, कुरळे जाड केस. केसांना आता वय दाखवणारी रुपेरी छटा आली आहे.
वाचताना आता त्या सोनेरी काडीचा, आकर्षक फ्रेमचा चष्मा वापरतात. चषयामुळे तर त्या अधिकच भारदस्त वाटतात. शिक्षकी पेशाला शोभतील अशा फिकट रंगाच्या, बहुधा पांढऱ्या रंगाच्याच साड्या जास्त करून नेसतात. त्या नेहमी स्टार्च-इस्त्रीचे कपडे वापरतात.
उजव्या हातात एक बांगडी, डाव्या हातात घड्याळ, कानात रिंग, टॉप्स, गळ्यात छोटे साधे मंगळसूत्र. चकचकीत. डोळ्यात खुपेल अशी कोणतीही गोष्ट बाई कधीही वापरत नाहीत. त्या अतिशय नीट-नेटक्या राहतात. त्यामुळे सर्व शिक्षकांत आकर्षक वाटतात.
प्रत्येक वर्गाला वाटते की अत्रेबाई आपल्या वर्गशिक्षक असाव्यात. बाई शिस्तप्रिय आहेत. बाई ‘गप्प बसा' म्हणून कधीही जोरात ओरडत नाहीत. वर्गात आल्या की पहिल्या बाकापासून ते शेवटच्या बाकापर्यंत नुसती नजर फिरवतात.
ज्या बाकावर गडबड असते तेथे त्यांची नजर खिळते. विद्यार्थी ते पाहतात व त्या बाकावरच्या मुलांना ‘ए, गप्प बसा. बाई आल्या.' म्हणून सावध करतात. सर्व वर्ग शांत झाल्यावर बाई बसा म्हणतात, फी घेतात, पावती देतात. विषयाला सुरुवात करतात.
बाई मराठी अतिशय उत्तम शिकवतात. बाईंचे बोलणे अगदी गोड व ओघवते आहे. नाट्यउतारा तर इतका छान वाचतात की सर्व वर्ग कानांच्या ओंजळी करतो. बाई पाठांचे लेखक, त्यांची पुस्तके याची चर्चा करतात. पुस्तकातील पाठ लिहिण्यामागे कोणती भूमिका आहे?
आपल्याला यातून काय शिकायचे ? पाठात कुठे कुठे सौंदर्य आहे, इ. गोष्टींचे स्पष्टीकरण करतात. ते समजावे म्हणून खूप उदाहरणे देतात. कवितांना सुंदर चाली लावतात. त्यातील नादमाधुर्य, सुंदर शब्द, अलंकार, शब्दापलीकडला अर्थ (ध्वनित) आम्हाला समजावून देतात.
काही वेळा तर फळ्यावर सुंदर रेखाचित्र काढून एखादे दृश्य, वस्तू डोळ्यांसमोर उभी करतात. निबंध लिहिण्याआधी तासभर सविस्तर चर्चा करतात. तसेच आत्मवृत्त म्हटले की सर्वांचे एक, असे बाईंना आवडत नाही. बाई म्हणतात,
७० मुले तर ७० विषयांवर मला ७० आत्सवृत्ते हवीत. बाई ८ वी, ९ वी च्या मुलांकडून स्वतंत्र वहीत त्यांचे स्वत:चे आत्मचरित्र लिहून घेतात. गृहपाठाची कॉपी होऊ नये म्हणून एकाच पाठावर पण प्रत्येक ओळींना वेगळे प्रश्न देतात. पुस्तकाखालचे प्रश्न त्या देत नाहीत.
त्यामुळे गाईडवाल्या मुलांची निराशा होते. पत्रलेखनालाही त्या रोजच्या जीवनातले सोपे विषय देतात. चांगली पत्रे, निबंध त्या वाचून दाखवतात. शाळेच्या हस्तलिखितांसाठी देतात. एकदा खूप जोरात पाऊस पडत होता. बाईंनी मुलांना बाहेर जाऊन १० मिनिटे पाऊस पाहण्यास सांगितले. नंतर पावसावर कविता करायला सांगितले.
आश्चर्य असे, सर्वांनी कविता केल्या. निवडक कविता नोटीसबोर्डावर लावल्या. १० मिनिटांत आम्ही कवी झालो. तसेच एका शनिवारी सकाळ' कविता मैदानावर शिकवली. झाडाआडून दिसणारी सूर्याची किरणे दाखवून म्हणाल्या, 'किरणांचे भुरभुरते कुंतल'.
तेवढ्यात पक्ष्यांचा थवा ओरडत आकाशातून गेला. बाई म्हणाल्या, 'लहरत गेली मधुर एक स्वरलकेर रानोमाळ.' अशा प्रकारे कमी शब्दात पण अनुभूती देऊन आम्ही ती कविता शिकलो. तोंडी परीक्षा वर्षभरात वाचलेल्या इतर पुस्तकांवर आधारित घेतात.
आमची शाळा मुलामुलींची आहे. पण बाई भेद करत नाहीत. एकदा एक गरम डोक्याचे पालक आले. मिलिटरीतून निवृत्त झालेले होते. मुलाने प्रगती-पुस्तकात खाडाखोड केलेली होती. आले वर्गात आणि धरले की मुलाचे बखोटे आणि न्यायला लागले त्याला फरफटत.
बाई लगेच वर्गाबाहेर गेल्या. त्यांनी त्या मुलाला ओढून आपल्यामागे केले. वडील खूप काही बडबडत होते. ते म्हणाले, 'मुलगा माझा आहे. द्या त्याला इकडे.' बाई म्हणाल्या, 'साडेपाच वाजेपर्यंत तो माझा आहे. घरी आल्यावर तो तुमचा.' पालक निघून गेले. पण आम्हा सर्वांना पटले १२ ते ५.३० बाईच आपल्या आई आहेत.
पालकांच्या दुर्लक्षामुळे एका मुलाची जखम बरी होत नव्हती. बाईंनी स्वत: १५-२० दिवस मधल्या सुट्टीत ड्रेसिंग करून जखम बरी केली. बाई वर्षाकाठी एक दोन गरजू मुलांची फी भरतात. स्वत:च्या मुलांचे कपडे शाळेतल्या मुलांना देतात. पण वाच्यता मुळीच नाही.
अशा या माझ्या -आमच्या बाई शतायुषी होवोत! त्यांच्याकडे पाहन मला 'आचार्य देवो भव'चा अर्थ प्रतीत होतो.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh माझी आवडती शिक्षिका