एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध | Marathi essay ekmeka sahya karu avghe dharu supanth.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध बघणार आहोत. 'एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना साथी हाथ बढाना-' दुर्बल घटक एकटे दुर्बल असतात. एकत्रित आले की बलवान होतात. कणकण एकत्रित आले की मणाची शक्ती येते.
पण नुसते एकत्र आले की कार्य होईलच असे नाही. त्यासाठी एकमेकांत आदानप्रदान हवे, सुसूत्रता हवी. एकमेकांना मदत करायला हवी. आपले शरीरच घ्या ना. जोपर्यंत सर्व इंद्रिये, अवयव एकमेकांना पूरक होतात तोपर्यंत माणूस सर्व व्यवहार व्यवस्थित करतो.
पायांनी असहकार केला की लंगडायला होतं किंवा बसकणच मारावी लागते. इंद्रियांनी असहकार केला तर अंथरुणच धरावे लागते. ...यंत्राचंही असंच. एक पार्ट सहाय्य करेनासा झाला की यंत्रच बिघडते. तेच पूरक बनले की उत्पादन वाढते...
घरातील सर्व कामे कर्त्यानेच करायची, इतरांनी नुसते उपभोगायचे म्हटले तर कर्त्याची कंबर खचून घरच बसते.... लग्न, मुंजी अशा समारंभांत तर या परस्पर मदतीवरच त्याची यशस्विता, गोडी, आनंद अवलंबून असतो. कार्य तडीस जाण्यास नातेवाईक, मित्र यांनी मदतीचा हात पुढे केला नाही तर नियोजित वेळेत, नेटकेपणे कार्य कसे पार पडेल?
एकट्या माणसाच्या करण्याला मर्यादा असतात. एकमेकांच्या सहकार्याने या मर्यादा रुंदावतात. घरात पापड, लोणची महिला सहकार्याने करतात. सहकार्याने शक्तीचा गुणाकार होतो, फायद्याचा वर्ग होतो आणि श्रमाचा भागाकार होतो.
सामाजिक व्यवहार तर सहकारावर खूप यशस्वी होतात. एकमेकांच्या गरजा ओळखून त्यानुरूप वागले तर समाजपुरुष बलवान होतो. 'विना सहकार नहीं उद्धार' असे विचारवंत म्हणतात... समाजाने सहकार्याचा समंजसपणा दाखवला नाही तर काय हाल होतील याचे अनुभव संपाच्या वेळी येतात.
शिक्षकांचा संप, रिक्षावाल्यांचा संप, डॉक्टरांचा संप, बसचालकांचा, कामगारांचा संपअसे समाजपुरुषाला अर्धांगवायूचे झटके सारखे बसत गेले, तर त्याची प्रकृती कशी ठीक राहील? संपाने व्यवहार थांबतात, उत्पादन थांबते. असुरक्षिततेची
भावना पसरते. हिंसक वळण लागले तर किती तरी नुकसान होते. झालेल्या प्रगतीचा नाश होतो, नको तिथे शक्ती खर्च होते, विकास थांबतो. या संपाने एका घटकाचे भले झाले तरी एकत्रित परिणाम चांगला नाही. सारेच घटक उठाव करतात. मग यात नुकसान कुणाचे? फायदा काय?
सहकाराने सामंजस्याने सर्वांचाच फायदा व विकास होतो. - सहकारी दूध पुरवठा केंद्रे, सहकारी बँका, पतपेढ्या ह्या ह्याच सहकाराच्या तत्त्वावर आहेत. भ्रष्टाचाराचा कली, अनीतीची कीड, तेवढी निपटली पाहिजे... सहकाराच्या जोरावरच आज सर्व क्षेत्रांत सुधारणा झाल्या.
शोध लागले, निसर्गावर विजय मिळविले. मागील पिढीचे ज्ञान पुढील पिढीला मिळाले. मानवजातीची साखळी तयार झाली. एका देशातील माणसे दुसऱ्या देशाशी जोडली जाऊन जग जवळ आले. एका क्षेत्रातील शोध दुसऱ्या क्षेत्रात उपयोगी पडत आहेत.
मानवजात अधिक सज्ञान, सुखी आणि प्रगत होत आहे. 'मला काय त्याचे ?' म्हणून पायापुरते पाहणे, संकुचित वृत्तीने वागणे त्यासाठीच सोडले पाहिजे. क्षुद्र देहाच्या मुंग्या वारुळ उभारण्याचं अवघड काम करतात, मधमाश्या मधाच्या साठवणीचं गोड काम करतात.
सहकाराची उत्तम उदाहरणे निसर्गात देवाने घालून दिली आहेत. म्हणूनच बिस्मार्कसारखा विचारवंत देवाकडे “पुनर्जन्म द्यायचा तर मुंगीचा दे" असे मागणे मागे. श्रीस्वामी समर्थ रामदास हाच मंत्र समाजपुरुषाला देतात "एकमेकां साह्य करूं। अवघे धरू सुपंथ॥" मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद