मरावे परी कीर्ती रूपे उरावे मराठी निबंध | Marathi essay Marave pari kirti rupe urave

 मरावे परी कीर्ती रूपे उरावे मराठी निबंध | Marathi essay Marave pari kirti rupe urave 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मरावे परी कीर्ती रूपे उरावे मराठी निबंध बघणार आहोत.  सर्वसामान्य माणसे संसाराच्या मायाजाळत पूर्णपणे गुरफटलेली असतात. जीवन म्हणजे अळवावरचे पाणी हे माहीत असूनही संसाराच्या पाशातून ती अलिप्त राहू शकत नाहीत, मग मरणाचा तर विचारच सोडा! 


मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनेही ती भयभीत होतात. या भूतलावरचं आपलं सगळं अस्तित्व काळाच्या झडपेने एका क्षणात नष्ट होणार आहे ही कल्पना ती पचवू शकत नाहीत. परंतु जातस्यहि ध्रुवो मृत्यु:। हे तर कटू सत्य आहे. जो जन्माला आला आहे त्याला मरण येणारच! मग घाबरायचं कशासाठी? 


उलट मृत्यूवर मात करून कीर्तिरूपाने या जगात जिवंत राहण्यासाठी माणसाने आपल्या आयुष्याची जिवंतपणीच आखणी केली पाहिजे हे ओळखून जे जीवन जगतात ते खरे लोकोत्तर पुरुष! समर्थ रामदासांसारख्या क्रांतिकारक सत्पुरुषाने हेही ओळखले होते की- 


'कीर्ति पाहो जातां सुख नाहीं । 

सुख पाहता कीर्ती नाहीं ॥ 


माणसाला जर कीर्ती मिळवायची असेल तर वैयक्तिक मुखांची आहुती ही द्यावीच लागते. या पृथ्वीतलावर जे जे लोक आजही लोकांच्या स्मरणात आहेत त्यांची जीवनचरित्रे पाहा- लो. टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, म. गांधी- सर्वांनी आपल्या संसारावर जवळजवळ तुळशीपत्र ठेवून स्वत:ला स्वातंत्र्याच्या संग्रामात झोकून दिले, म्हणूनच आज ते कीर्तिरूपाने अमर झाले आहेत.


थोर साधुसंतांनी आयुष्यभर लोककल्याणाची चिंता वाहिली,समाजसुधारकांनी तर समाजाच्या टीकेला, निंदेला, हेटाळणीला तोंड देत देत सुधारणा घडवून आणल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे यांना समाजाच्या बहिष्काराचे चटके सहन करावे लागले. 


चंदन झिजल्यावरच त्याचा सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे तुमचं आयुष्य जर एखाद्या चांगल्या कार्यासाठी झिजलं तरच कीर्तीचा सुगंध दरवळतो. कीर्ती मागून मिळत नसते. तुमच्या कामामुळे ती तुमच्या पाठोपाठ येत असते म्हणूनच रामदासस्वामी, संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात


शिवरायास आठवावें। 

जीवित तृणवत् मानावें।

इहलोकीं परलोकीं रहावें। 

कीर्तिरूपें ॥ 


एक बोधकथा आहे माणसाला जन्माला घातल्यावर विधात्याने त्याला विचारले, “कसं वाटतंय?" "देवा छान वाटतंय!" देवानं विचारलं, "काही तक्रार? काही सूचना?" माणसाने म्हटले, "देवा, मरणाबरोबर मी संपून जाईन. सारे मला विसरून जातील. मी मरणार नाही असे कर ना!" 


"माझ्या कल्पनेत बदल होणार नाही. पण- तरी तथास्तु ! तुझी इच्छा असेल तर मरूनही तू जगशील. कीर्तीचा अमरपट्टा मी तुला देतो. मात्र किती काळ त्या आधारे जगशील हे तू केलेल्या कर्मावर अवलंबून राहील." काही महामानव मृत्यूवर मात करतात ती या आधारेच!  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.