माझा आवडता कलावंत मराठी निबंध Maza avadta kalavant marathi nibandh ·
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कलावंत मराठी निबंध बघणार आहोत. हाताने काम करतो तो कामगार. हाताने काम करताना त्या कामात कसब ओततो तो कारागीर आणि हाताने काम करताना कसबाबरोबर त्यात हृदय ओततो-तो कलावंत!
दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेले मानव म्हणजे कलाकार. रूक्ष, बेचव जीवनाला लज्जत देणारे देवदूत म्हणजे कलावंत!...संगीत ही गंधर्वांची कला, वादन ही किन्नरांची, मला मनस्वी प्रिय! संगीताचा मी पुजारी. संगीत कलाकारांचा मी वेडा... माणसाच्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलणारं,
मनसुमनांच्या पाकळ्या हळुवार खुलवणारं, मनाच्या बिलोरी काचेचं चमचमणाऱ्या हिऱ्यात रूपांतर करणारं वाद्य
एकच-शहनाई!... साध्या पिपाणीचं हे शाही रूप मोठं लोभसवाणं भासतं. तिला हे रूप प्रदान करणारा, घराघरातून तिच्या सुरांची कारंजी मुक्तपणे थुईथई नाचवणारा तितकाच देखणा कलाकार - पद्मश्री बिस्मिल्ला खॉ माझ्या गळ्यातील ताईतच!
आपल्या कलाबळावर वेगळेपणानं तळपणारा बिस्मिल्ला खाँ माझा सर्वांत आवडता कलावंत! पहाटेच रविराजाच्या सहस्ररश्मी किरणांबरोबर येतात ते सूर. घर भरून टाकतात. “अपवित्रं पवित्रं भवेत्" म्हणत मांगल्याचं प्रोक्षण करतात. अहिर भैरव प्रसन्नतेचा शिडकावा करतो.
कधी सोनी भटीयार कधी ललत रागाच्या सुरावटीनं वातावरणात आर्तता, गांभीर्य येतं.... उन्हं चढून डोक्यावर येतात तेव्हा कुठे तरी 'सारंग' रंग आणतो. उन्हं कलू लागतात तेव्हा मारवा, पूरिया मन व्याकूळ करतो. पूर्वरात्री यमन कल्याण गुंजतो तर उत्तररात्री जोगिया मन पिळवटून टाकतो. या सर्वांना रंगवतो बिस्मिल्ला अन् त्याची शहनाई !!
अवघ्या सात सुरांनी सप्तस्वर्ग व्यापणारे बिस्मिल्लांचे सूर अलौकिक वाटतात. तिन्ही लोक भरून जातात. दिवस व रात्र कुठलाही प्रहर सोन्याचा करणारा त्यांचा सुरीला आविष्कार मोहमयी वाटतो. बारशापासून बाराव्यापर्यंत सूरसंगत करणारा बिस्मिल्लांचा सूर सच्चा वाटतो, आपला वाटतो.
हिंदूंच्या पवित्र बनारसच्या भूमीत जन्मलेला हा यावनी कलाकार भारतभरच नव्हे तर जगभर वाढला.... गुबगुबीत चेहऱ्याला थोडी टोकदार हनुवटी, त्यावर छोटीशी दाढी, त्याला शोभणारी कोरीव मिशी, थोडासा स्थूल देह, भरदार छाती, पाणीदार डोळे, तिरकस उंच काळी मौलवी टोपी, लखनवी झब्बा किंवा अचकन, शेरवानी पायजमा...
असा अस्सल राजबिंडा मुस्लिम कलाकार मला कधी परका वाटलाच नाही. कारण त्याच्या शहनाईतून सूर येताच मला कुठल्यातरी लग्नमंडपात आल्यासारखे वाटते. छान वाटते. संगीत वाद्यांवर आपापल्या व्यक्तिमत्त्वाची मोहर उठवणारे कलाकार असतात. बहुतेक वाद्यांवर दोन-तीन कलाकारांची छाया असते.
सतारीबरोबर रविशंकर, विलायत खाँ दिसतात. बासरीबरोबर हरिप्रसाद चौरासिया, पन्नालाल घोष आठवतात. तबला म्हटले की झाकीर हुसेन अल्लारखाँ, सामता प्रसाद नजरेपुढे येतात... पण शहनाई म्हटलं की फक्त बिस्मिल्ला खाँचेच स्मरण होते. शहनाईवर फक्त बिस्मिल्लांचीच मोहर आहे.
शहनाई हे वाद्यांमधलं शिवधनुष्यच! ते पेलणं येरागबाळ्याचं काम नाही. छातीच्या श्वासावर खुलणारं हे वाद्य. त्यासाठी छाती भरदार, दमसास भरपूर लागतो. त्यात जिव्हेची करामत नजाकत वाढवते. तासन तास छातीतील श्वासावर आलापी, ताना, हरकती, पलटे घेत रसिकाला सुरांत चिंब भिजवून 'सूर सुख' द्यायचं म्हणजे
तोबा, तोबा! फार मेहनत, रियाज, जाणकारी, तयारी लागते. बिस्मिल्ला खाँ कुठेही कमी पडत नाही. म्हणूनच अखिल जगतात 'गूंज उठी शहनाई'. आज बिस्मिल्लाचं पाऊणशे वयमान झालं तरी त्याच्या तोडीचा त्या वाद्यावर हुकमत असलेला दुसरा कलाकार निर्माण झाला नाही यातच त्याचं स्वामित्व दिसतं. सच्चा रसिक बिस्मिल्ला खाँ पुढे कानाला हात लावतो ते उगीचच नव्हे! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.