माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak.

 माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण माझा आवडता समाजसुधारक  असलेले दोन निबंध बघणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरू मानले, सावरकरांनी ज्यांना सामाजिक क्रांतिकारक म्हणून संबोधले, वि. रा. शिंदे यांनी सत्याचा व पतितांचा पालनवाला असे ज्यांचे वर्णन केले, 


म. गांधींसारख्या महामानवाने ज्यांना 'खरा महात्मा' म्हणून गौरविले ते महात्मा जोतीबा फुले माझे आवडते समाजसुधारक आहेत. जोतीबा मानवतावादाचे उपासक होते. त्यांनी समाजाचा कसून अभ्यास केला होता. भारतीय समाज अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, दैववाद अशा गर्तेत अडकला आहे हे समजायला चाणाक्ष जोतीबांना जरासुद्धा वेळ लागला नाही.


म्हणून सर्व सुधारणांचे मूळ शिक्षण आहे हे जाणून त्यांनी शाळा काढली, याचे ब्रिटिशांनाही कौतुक वाटते. म. फुल्यांनी शाळा काढून त्या ब्रिटिशांना चालवायला दिल्या. कारण सुरवातीला ब्रिटिश लोक शिक्षण देतात म्हणजे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट करतात असे वाटत असे. 


पण लवकरच त्यांना कळले की इंग्रजांचे शिक्षण-विषयक धोरण गरिबांसाठी उपयुक्त नाही. शेतकरी हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे. त्यांची मुले शिकली पाहिजेत. म्हणून हंटर कमिशनपुढे साक्ष देताना जोतीबांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, 'सगळ्यात जास्त सारा, कर शेतकरी तुम्हाला देतो. 


असे असताना तुमचे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी । किती खर्च करता? त्यांच्या मुलांची परवड होते. त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम हवा. चांगला पगार देऊन चांगले शिक्षक खेड्यात पाठवले पाहिजेत. त्या मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत.'


जोतीबांनी स्त्री-शिक्षणाचे महत्त्वही चांगलेच जाणले होते. म्हणूनच त्यांनी आपली पत्नी सावित्री हिला शिकविले व शाळेत अध्यापनाचे काम करायला लावले. मुलींना शिक्षण देण्याचा वसाच जणू फुले दांपत्याने घेतला होता. फुले विधवांचे कैवारी होते.


त्यांनी विधवाविवाह घडवून आणला. ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. त्याला डॉक्टर केले. त्याचा विवाह केला.
जोतीबांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला की त्यांच्या अंत:करणाचा तळ ढवळून निघाला. जोतीबा मित्राच्या लग्नात वरातीबरोबर निघाले तेव्हा कुणीतरी त्यांना जातीवरून हटकले. 


'अंग राखून, स्पर्श टाळून आपली पायरी ओळखून चाल' अशी सूचना केली. या शब्दातील विखार त्यांच्या जिव्हारी लागला. सामाजिक विषमतेमुळेच आपला अपमान झाला याचा उमज त्यांना पडला. वर्णभेदामुळे समाज घसरत आहे हे त्यांनी जाणले. जात जात नाही तोपर्यंत समता नाही.


 म्हणून स्वातंत्र्य नाही. ब्राम्हणांवर जोतीबांचा राग अगदी टोकांचा होता. ते म्हणत, 'देव व माणूस यांच्यामध्ये पूजेसाठी ब्राम्हण कशाला हवा?' 'लग्न लावण्यास ब्राम्हणाचीच काय आवश्यकता आहे ?' असे नुसते म्हणून ते थांबले नाहीत, तर त्या काळात त्यांनी ब्राम्हणाशिवाय स्वत: अनेक विवाह घडवून आणले. 



जोतीबांचा राग ब्राम्हण्य नावाखाली जो कर्मठपणा चालत असे त्यावर होता. ते ब्राम्हणद्वेष्टे नव्हते. त्यांचे ब्राम्हण मित्रही अखेरपर्यंत होते. जोतीबांनी स्वत:च्या हौदातील पाण्याने अस्पृश्यतेचा कलंक धुण्याचा प्रयत्न केला. सत्य व समतेवर आधारित न्याय्य हक्कांसाठी १८७३ मध्ये 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. 


जोतीबांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले होते. त्यांनी लेखनही विपुल केले आहे. जोतीबांचे लेखन वास्तववादी आहे. त्यात पोटतिडीक दिसते. त्यांच्या पुस्तकांची शीर्षके ज्वलंत होती. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्यांचा आसूड', 'इशारा', 'सार्वजनिक सत्यधर्म' इ. पुस्तके जोतीबांनी लिहिली. 


जोतीबांनी अभंगाप्रमाणे काव्यरचना केली. तिला 'अखंड' म्हणतात. जोतीबांचे जीवन त्यांच्याच एका अखंडा'तून प्रतीत होते. 

उद्योग जो करी दीनबंधूसाठी। 
ममता ती पोटी। मानवाच्या॥ 
थकल्या भागल्या दीना साह्य करी। 
उद्योगास सारी। जपूनीया॥ 
त्याच्या उद्योगास नित्य यश येई। 
जगा सुख देई। जोती म्हणे ।।

अशी ही प्रखर ज्योती १८९० मध्ये निमाली. पण तिचा प्रकाश आजही तळपतोय!मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

 माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak.

नदीचे पाणी सतत वाहत असते, पुढे जात असते त्यामुळे ते स्वच्छ राहते, त्यात नवीन झऱ्यांची भर पडते. समाजही तसाच आहे. समाजाची प्रगती होण्यासाठी, आतील रूढी दूर करण्यासाठी समाजसुधारक उदयाला येतात. अशा अनेक समाजसुधारकांपैकी मला संत गाडगेबाबा विशेष प्रिय आहेत.


विदर्भातील शेणगाव या खेडेगावात 'डेबू' जन्मला. बापाविना पोरका झालेला डेबू आईसह मामाकडे राहिला. शेती करू लागला. पण तेव्हापासून अस्पृशाबद्दलची तळमळ त्याच्या मनात निर्माण झाली. योग्य वेळी त्याचा विवाहही झाला. परंतु जनसेवेची त्याची आकांक्षा इतकी प्रबळ ठरली की संसाराचा त्याग करून डेबूने घर सोडले. 


हा डेबू 'गाडगे' घेऊन भ्रमंती करू लागला. लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणून ओळखू लागले. सुरवातीला या भ्रमंतीत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भेटून घरी परतण्याचा खूप आग्रह केला, पण त्यांचा निश्चय ठाम होता. गाडगेबाबांचे कामाचे स्वरूप काय होते? गावोगावी हिंडून रस्ते, पटांगणे स्वतः झाडून काढणे हे त्यांचे पहिले काम. 


नंतर एखाद्याच्या घरी जाऊन भाकरी मागावी, गाडग्यात वरण मागावे; पण ते फुकट घ्यायचे नाही. त्या बदल्यात त्याची लाकडे फोडून देणे, कुंभार असेल तर चिखल कालवून देणे, गोठा साफ करणे अशा प्रकारे मिळेल ती कामे करून फक्त एका वेळेला पुरेल इतकी भाकरी व गाडगे भरून कालवण ते मागत.



त्यांनी मुख्यत: कीर्तनातून समाजप्रबोधन केले त्या काळात देवदेवतांना कोंबडी, बकरे बळी देण्याची पद्धत फार होती. त्यांनी आपल्या कीर्तनातून , या पद्धतीवर कठोर टीका करून ती पद्धत बंद करण्याचे बहुजनसमाजाला आवाहन केले. काही लोकांवर त्याचा परिणाम झाला. 



बऱ्याच जणांनी दारू सोडण्याची, मांसाहार वर्ण्य करण्याची, देवांना बळी न देण्याची प्रतिज्ञा घेतली व ती पाळली.
दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे धर्मशाळा. पंढरपूर, नाशिक अशा तीर्थक्षेत्री यात्रेसाठी हजारो भाविक जमत. पण त्यांना पुरेसे पाणी, राहायला जागा, शरीर-शुद्धीची व्यवस्था काहीच नसे. अत्यंत दुर्गंधीयुक्त वातावरणात ते राहत. 



बाबांनी हे पाहिले. त्यांनी धनिकांना आवाहन केले. बाबांविषयी अमाप श्रद्धा असलेल्या भाविकांकडून देणग्यांचा ओघ सुरू झाला. सर्व प्रमुख तीर्थक्षेत्री मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या गेल्या. यात्रेकरूंनी गाडगेबाबांना दुवा दिला.
गोरक्षणाच्या बाबतीत त्यांनी मोठे कार्य केले


मोकळ्या जागा घेऊन तेथे गुरांसाठी उत्तम गोठे बांधले. कसायाहाती गुरे देण्यापेक्षा तिथे ठेवणे शेतकऱ्यांनी सुरू केले. शिक्षणप्रसारासाठी गावोगाव शाळा काढल्या. अस्पृश्यतेविरुद्ध कडाडून प्रचार केला. अंधळ्यापांगळ्यांसाठी अन्नछत्रे घातली. निर्धनांसाठी वसतिगृहे सुरू केली. हुंड्याविरुद्ध आवाज उठविला.


सारांश, ज्या ज्या सामाजिक सुधारणा त्या काळात व आजही आवश्यक आहेत त्या करण्यासाठी त्यांनी अवघे जीवन खर्चिले. खरा समाजसेवक कसा असावा याचा ते आदर्श होते. म्हणूनच सामान्य जनांच्या मनी त्यांच्याविषयी अपार श्रद्धा होती, आणि आजही आहे.