मी दूरदर्शनचा सल्लागार झालो तर मराठी निबंध | Me Durdhrshanacha Sallagar Zalo Tar Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी दूरदर्शनचा सल्लागार झालो तर निबंध बघणार आहोत. सल्ला देण्याचे काम पोक्त माणसे करतात. मी आहे कुमार, तरी सल्लागार म्हणून या निबंधापुरते चकट फू सल्ला देण्याचे काम करणार आहे. कारण दूरदर्शन आम्ही जवळून बघतो ना!
त्याचं काय आहे, मंगळवारी दोन वाजता दूरदर्शनवर 'डिस्को डान्सर' चित्रपट होता. आमच्या वर्गातील २५-३० मुले तो पाहण्यासाठी घरी राहिली. काही तर शाळेत आल्यावर घरी गेली आणि मधल्या सुट्टीत तर अनेकजण आजारी पडू लागले घरी जाण्यासाठी. सर्व शिक्षक आज 'अनुपस्थिती फार कमी आहे' असे आपापसात बोलू लागले.
चौकशी करता, 'डिस्को डान्सर'मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रजा, हे कळले. 'या टी. व्ही. ने अगदी वेडे करून सोडलेय या मुलांना. टी. व्ही. वाले तरी शाळेच्या वेळात चित्रपट कशाला ठेवतात? ते काही नाही. उद्या सर्वांना दहा रुपये दंड करा.
शिवाय पालकांना पत्रे लिहा.' मुख्याध्यापकांनी फर्मान काढले. मी सुटलो. पण विचार आला, आपणच दूरदर्शनचे सल्लागार झालो तर.... खरंच विद्यार्थी जर शाळा बुडवून टी. व्ही. बघत बसला तर टी. व्ही. द्वारे किती तरी गोष्टी विद्यार्थ्यांवर ठसविता येतील.
अमूर्त गोष्टी मूर्त स्वरूपात दाखवता येतील. शब्दांनी जे समजणार नाही ते प्रत्यक्ष दृश्यांनी समजेल. प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि अनुभवामुळेच शिक्षण अधिक प्रभावी होते. अर्थपूर्ण होते. 'श्रावणमास' ही बालकवींची कविता, मंगेश पाडगावकरांची 'किमया'
या कविता शिक्षकांनी वर्णन करण्यापेक्षा टी. व्ही. वर जर दृश्य स्वरूपात, गाऊन दाखवल्या तर कितीतरी सुंदर समजतील व ठसतील. कविता चालीवर गायला शिकवा. तसेच वेगवेगळ्या विषयांवर निबंध कसे लिहावेत याचे तंत्र मुलांना सोदाहरण दाखवले तर मुले चांगले निबंध लिहितील.
सुंदर नाट्यउतारे कसे म्हणावेत, आवाजात चढउतार कसे करावेत, यातील भावना व्यक्त करणे इ. सांगावे. थोरांची चरित्रे कथारूपाने सांगावीत. भूगोलातील प्रदेश वर्गात. कथनपद्धतीने व नकाशात पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष टी. व्ही.वर पाहिले तर लगेच समजेल. टी. व्हीवर क्रमाक्रमाने भारतदर्शन घडवावे. लोकजीवन, पिके, हवामान इ. सर्व दाखवावे.
चित्रकलेचे, नृत्यकलेचे पाठ द्यावेत. माहिती द्यावी. मुलांना करायला सांगावे. म्हणजे ज्यांना मुळात आवड आहे पण परिस्थिती आड येते अशा मुलांना कलेची थोडीतरी माहिती होईल. संस्कारक्षम कथा दाखवा. स्वच्छता, आरोग्य, व्यायाम, नियमित अभ्यास, आज्ञापालन, शिस्त, कामसू वृत्ती इ. गुण वाढीस लागतील अशा कथा निवडा.
मुलांसाठी कथाकथन स्पर्धा ठेवा. शाळा-कॉलेजमधील नाटके दाखवा. पुरुषोत्तम करंडकाच्या एकांकिका दाखवा. चुटकुले दाखवा. जाहिरातींऐवजी मार्गदर्शक सूचना दाखवा. उदा. 'पाणी हे जीवन आहे. जपून वापरा.' 'बचत करा - पाणी इंधन वाचवा.' वृक्ष लावा वृक्ष जगवा.' इत्यादी. कार्टून फिल्मस् दाखवा. प्रबोधन करा.
शहरात शुद्ध पाणी, गावात अशुद्ध का, त्याचे परिणाम कोणते, हे समजावून द्या. चित्रपट कमी करा. दाखवले तर संत, शिवाजी, श्यामची आई असे चित्रपट दाखवा. कार्यक्रम शनिवारी दुपारी व रविवारी जास्त दाखवावेत. इतर वारी रात्री नऊनंतर कोणतेही कार्यक्रम दाखवू नयेत. म्हणजे अभ्यास व झोप दोन्ही होईल.
थोडक्यात, उद्याचा भारत शाळेत व घरोघरी घडत आहे हे लक्षात घेऊन टी. व्ही.ने अभ्यासपूर्ण ज्ञानार्जनात भर पडेल व जे जे आदर्श ते ते सर्व विद्यार्थ्यांपुढे ठेवावे. साधी राहणी उच्च विचारसरणी' हेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून अध्यापन करावे. मग अशा या दूरदर्शनचे जवळून दर्शन घेण्यास कोण नको म्हणेल?