निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निरोपसमारंभ मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण निरोपसमारंभ असलेले दोन निबंध बघणार आहोत १६ फेब्रुवारी १९९३ चा दिवस माझ्याच काय आमच्या शाळेतील दहावीतील सर्व मुलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. चिरस्मरणीय. निरोप-समारंभाचा दिवस.
शाळेच्या सभागृहात विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, पर्यवेक्षक, प्राचार्य सर्वजण जमले होते. प्राचार्य म्हणाले, 'आजचा हा दिवस तुमच्या जीवनातील अत्यंत स्मरणीय असा महत्त्वाचा दिवस आहे. आम्ही निरोप देण्यासाठी आणि तुम्ही निरोप घेण्यासाठी इथे आला आहात.
एरवी भाषण न ऐकता गडबड. करणारे आम्ही सर्व अबोल बनलो होतो. निरोप हा शब्द ऐकताच. सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आमच्या प्राचार्यानी विद्यार्थ्यांना चार शब्द बोलण्यास परवानगी दिली.
प्रथम तीनचार शिक्षकांनी पेपर कसे लिहावेत याचे मार्गदर्शन केले. . भावी जीवनासाठी शुभ-चिंतन केले. नंतर शिक्षक काही मुला-मुलींची नावे घेऊन त्यांना बोलण्याचा आग्रह करू लागले. काही मुले, मुली बोलण्यास तयार झाली. मलाही बोलण्यास सांगितले.
नेहमी स्पर्धा गाजवलेला मी आज उघड काही बोलावेसे वाटेना. मी मानेनेच नकार दिला. एकेक विद्यार्थी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत होता मी माझ्या मनाशी संवाद करीत होतो. सहा वर्षांपूर्वी या शाळेत पाचवीत प्रवेश केला. तेव्हापासूनचा शालेय पट डोळ्यांसमोरून सरकू लागला.
शाळा मला नवीन. मी शाळेला नवीन. शाळेच्या सेवकाबरोबर मला ५ अ' च्या वर्गात पाठवले. वर्गात बाई होत्या. त्यांनी मला वर्गात घेतले. बाकावर बसण्यास सांगितले. पहिला दिवस उत्सुकता, भीती यातच गेला. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे. हळूहळू शाळेत रुळलो.
कधी खोडसाळपणा केला. बोलणी खाल्ली. शिक्षा भोगली. कधी चांगले वागून वाहवा मिळवली. याच शाळेत साने गुरुजी, रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांचे मोठेपण समजले. टिळक, म. गांधी, फुले, आंबेडकर, ज्ञानेश्वर, तुकाराम समजले.
न्यूटन, एडिसन, मेंडेल, रामन यांच्या संशोधनाने चकित झालो. सर्वात चकित झालो ते म्हणजे स्वातंत्र्याचा वाढदिवस; ज्यावेळी ते मिळाले त्याचवेळी करण्याच्या पध्दतीने! १४ ऑगस्टला रात्री १० ते १२ स्वातंत्र्यसैनिकांचे लढ्याचे अनुभव कथन व रात्री १२ वाजून
१ मिनिटाने झेंडावंदन. हा अनुभव केवळ अलौकिक. राष्ट्रप्रेमाची जागृती झाली. शाळेत स्पर्धा जिंकल्या, हरल्या. व्यक्तिमत्त्वास पैलू पडले. उक्तीपेक्षा कृतीने संस्कार होतात. शाळेतील शिक्षक म्हणजे माणुसकीचे जिवंत झरे! माझ्या पायाची जखम चिघळली होती.
माझ्या बाईंनी स्वत:ची मधली सुट्टी घेतली नाही. माझ्या पायाला मलमपट्टी स्वत: बाईंनी केली. माझा पाया बरा केला. तसेच याच वर्षी फॉर्म फी भरण्यासारखी रमेशची परिस्थिती नव्हती. सरांनी स्वत: फार्मचे पैसे भरले. काही शिक्षक स्वत:च्या मुलांचे गणवेशाचे कपडे, रेनकोट, दप्तर इ. आणून गरजू मुलांना देताना मी अनेक वेळा पाहिलेले आहे.
केस, दात, भांग, नखे इ. सर्व गोष्टींकडे सर्वजण लक्ष ठेवतात. मैदानावर चक्कर आलेल्या मुला-मुलींना शिक्षकांनी स्वत:चे डबे खाण्यास दिलेले मी अनेकवार पाहिलेले आहे. इतके सर्व करून जरा म्हणून गवगवा नाही. 'साधी राहणी उच्च विचारसरणी' यांची प्रचीती या शाळेतील प्राचार्य ते सामान्य सेवकांपर्यंत येते.
या शाळेत बाईंनी शिकवलेले गाणे माझ्या कायम लक्षात राहील. गाणे असे आहे या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार शाळेत रोज जाता आईस देव माना, वंदा गुरुजनांना जगी भावनेपरीही कर्तव्य थोर माना...
शाळेने माणुसकीचे संस्कार करून आमची शिल्पे घडवली. माणूस म्हणून कसे जगावे याचे वस्तुपाठ दिले. बाहेरच्या नव्या जगात आता आम्ही निश्चित भक्कमपणे पाऊल टाकू. एकमेकांस मदत करण्याचा घेतलेला वसा पुढे चालवू. अल्पोपाहाराची बशी पुढे आली.
माझी विचारशृंखला तुटली. मनात एवढेच म्हटले, जन्मदात्या आईप्रमाणेच शाळा-माउलीचे पांग फेडू. तिला मोठी करू!मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही गाठ या कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणातील प्रसिध्द काव्यपंक्ती. रामाला वनातून परत अयोध्येला जाण्याचा आग्रह करणाऱ्या : भरताला रामाने या शब्दात समजावून सांगितले.
माणसे एकत्र येतात. स्नेहबंध निर्माण होतात. कालांतराने काही कारणाने त्यांचा वियोग होतो. वियोगाच्या क्षणी निरोप द्यावा लागतो. कोमल मनाच्या माणसाला हा क्षण फार क्लेशदायक वाटतो. म्हणूनच
‘दही घाल हातावरती बाळ रणा जाई असे म्हणून सैनिकाची माता आपल्या सुनेला त्याला निरोप द्यायला सांगते. तिचा चुडा सावित्रीचा आहे असेही ती तिला सांगते. खरे म्हणजे तिच्या मातृहृदयात भावनेचा केवढा कल्लोळ माजलेला असेल! पण धीरोदात्त भावनेने ती मुलाला निरोप देते.
पतिगृही जाणाऱ्या शकुंतलेला निरोप देताना कण्वमुनींचे मन भरून आले. आज काळ कितीही पुढे गेलेला असला तरी मुलीला सासरी . पाठवताना माता-पित्यांचे डोळे पाणावतातच. एखाद्या संस्थेतून एखादा अधिकारी, सेवक सेवानिवृत्त होतो त्यावेळी इतर सर्व कचेरीतील लोक त्याला समारंभपूर्वक निरोप देतात.
हार, तुरे, भेटवस्तू दिली जाते. त्याचा गुणगौरव करणारी भाषणे होतात. त्याच्यात अतिशयोक्तीचा भाग किती असतो हे सुज्ञांना सांगायला नकोच. एखादा खेळाडू दूरदेशी खेळण्यासाठी जाणार असतो. एखादा गायक, नट दौऱ्यासाठी जाणार असतो. अशा वेळी स्नेही, आप्त त्याला निरोप देतात. त्याने विजयी व्हावे म्हणून शुभेच्छा प्रकट करतात.
आमच्या दृष्टीने महत्त्वाचा निरोप-समारंभ म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला जाण्यापूर्वी शाळेने दिलेला निरोप. शाळेचा निरोप-समारंभ झाला की शाळेत यायला नको ही सुटकेची भावना असते. पण विचारांती पटते की या शाळेशी आपण स्नेहभावनेने किती जखडलो गेलो होतो याची.
शाळेच्या निरोप-समारंभात शिक्षक आम्हा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी शुभेच्छा देतात. पेपर उत्कष्ट रीतीने कसे लिहावे, काय टाळावे याचे योग्य मार्गदर्शन करतात. तसेच पुढील आयुष्यात कसे वागावे याचेही मार्गदर्शन करतात. काही मोजके विद्यार्थीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करतात.
आजवरच्या शालेय जीवनात त्यांना जे अनुभव आले त्याचा आढावा घेतात. कतज्ञता व्यक्त करतात. आता हे सगळेजण कधीही एकत्र येणार नसतात. त्यामुळे प्रत्येकाला एकमेकांशी किती बोलू, किती नको असे होते. शेवटी अल्पोपाहार होऊन हा कार्यक्रम संपतो.
बाहेरच्या जगात मुक्तपणे प्रवेश करायला विद्यार्थी सिद्ध होतात. असे हे विविध प्रकारचे निरोप-समारंभ. प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे, पण भावना एकच- निरोप देणे व निरोप घेणे. माणसाच्या भावविश्वाला आवाहन करणारे हे निरोप-समारंभ ऋणानुबंध दृढ ठेवण्यास मदत करतात.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद