पाण्यासाठी दाही दिशा मराठी निबंध | Panyasathi Dahi Disha Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाण्यासाठी दाही दिशा मराठी निबंध बघणार आहोत. 'अन्नासाठी दाही दिशा। आम्हा फिरविसी जगदीशा' असं व्यंकटेश स्तोत्रात म्हटलं आहे. आज मात्र पाण्यासाठी दाही दिशा' असं म्हणण्याची वेळ आली आहे.
मार्च, एप्रिल महिन्यात उन्हं तापायला लागली की सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवायला लागतात, 'तापतं ऊन आणि आटतं पाणी' या 'आला उन्हाळा' असा सांगावा घेऊन येणाऱ्या खुणा! स्वातंत्र्य मिळून पंचेचाळीस वर्षं झाली, पण सर्व गावांना पुरेसं पाणी मिळण्याची व्यवस्थासुध्दा झाली नाही.
भारत हा खेड्यांचा देश, पण खेड्यांच्याच वाट्याला अनेक गैरसोयी येतात. त्यातली पाणी ही मुख्य अडचण. माणसांना प्यायलाच पुरेसं पाणी नाही, तिथे जनावरांच्या पिण्याचं पाणी, चारा, वैरण यांना पाणी कुठून येणार? 'पाणी' म्हणजे 'जीवन'. पाणी नसेल तर जगणार कसं?