पेराल ते उगवेल मराठी निबंध | PERAL TE UGAVEL MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेराल ते उगवेल मराठी निबंध बघणार आहोत. पेरिलें तें उगवतें।
बोलण्यासारिखें उत्तर येते॥
तरी मग कर्कश बोलावें ।
तें कायें निमित्त॥
समर्थ रामदासांनी सांगितलेला हा निसर्गाचा सामान्य नियम आहे. बीजाचे गुणधर्म फळात उतरतातच. गहू पेरल्यावर ज्वारी उगवत नाही, कार्ल्याच्या वेलीला आंबे कधीच लागणार नाहीत. वीरशैव संत लक्ष्मणमहाराज म्हणतात
एरंड धोतरा पेरून।
करूं पाहे अमृतपान।
पेरिलें तें उगवें रे।
एरंड किंवा धोत्र्याचं बी पेरलं तर त्यातून फुललेल्या झाडातून कधी अमृत पाझरेल का? कडू भोपळ्याच्या वेलीला गोड द्राक्षे येतील का? म्हणूनच दुष्कृत्ये केली तर त्याचं चांगलं फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. यासाठीच सत्कृत्ये करावीत म्हणजे त्याचं फळ चांगलं मिळेल.
पण संसारात मात्र या नियमाचा आपल्याला विसर पडतो. सदा कुरकुर करणाऱ्या, आपमतलबी लोकांना समाज कधीच आदर वा प्रेम दाखवणार नाही. म्हणूनच
जगामध्ये जगमित्र।
जिव्हेपासी आहे सूत्र॥'
हे व्यवहाराचे महत्त्वाचे सूत्र अंगी बाणविले पाहिजे. हीच माणसे जोडण्याची व आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली! ही ज्याला गवसेल त्याचे जीवन आनंदी बनते. पण नुसते बीज चांगले असूनही चालत नाही. एखाद्या कुलीन घरात जन्मलेल्या, संस्कारसंपन्न मुलाला जर पुढे कुसंगत जडली तर तो विकृत बनण्यास वेळ लागत नाही.
म्हणून नुसते बीज शुद्ध असून भागणार नाही. त्याचा मोठा वृक्ष होईपर्यंत आपण त्याची सर्वांगाने काळजी घेणे आवश्यक आहे, याची आजूबाजूच्या लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे. मोहाच्या मृगजळात सापडलेला कुलीन मनुष्यही नाहीतर वाममार्गाकडे वळतो. तात्पर्य- एखादा मनुष्य घडण्यास बीजभूत गुणधर्म, संस्कार व परिस्थिती या तीनही गोष्टी जबाबदार असतात.
जिंदा कडुपण देत असे कोण ।
इक्षु गोडपण कोण करी॥
बिजा ऐसें फळ गोडीचा निकडा ।
हा अर्थ उघडा दिसतसे ॥
बहिणी म्हणे बीजा ऐसें ये फळ ।
उत्तम ओंगळ परीक्षावें ॥
जशी खाण तशी माती असते हे बहिणाबाईंनी किती सुरेख पटवून दिले आहे. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या जमिनीत काय पेरावे याचा प्रत्येकाने नीट विचार केला पाहिजे. सत्कृत्यांचे बीज पेरले तर कीर्ती व सन्मानाची प्राप्ती होईल.
म्हणून आपले संकल्पच शुद्ध असावेत, म्हणजे फळही चांगलं मिळेल! आपली वृत्ती व स्वभाव चांगला असेल तरच सुख, समाधान व मन:शांतीची प्राप्ती होईल. कारण यातच देवत्वाची प्राप्ती आहे.
शुद्ध संकल्पाचें फळ ।
करी ब्रह्मचि केवळ ॥