पिंजऱ्यातील सिंहाचे मनोगत मराठी निबंध | Pinjryatil Shinhache Manogat Essay In Marathi

पिंजऱ्यातील सिंहाचे मनोगत मराठी निबंध | Pinjryatil Shinhache Manogat Essay In Marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पिंजऱ्यातील सिंहाचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत.

 “बलवान् अपि निस्तेजाः कस्य नाभिभवास्पदम्

निःशङ्क दीयते लोके पश्य भस्मचये पदम् ॥" 


आज पिंजऱ्यात सापडलेल्या मला लहान मुलेही खडे मारतात तेव्हा ह्याच ओळी आठवतात. मी मुक्त असताना कुणाची छाती होती माझ्या वाटेला जाण्याची? या प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी, खास माझ्यासाठी उभारलेल्या, 


सर्वांत मोठ्या पिंजऱ्यात, एक शोभेची वस्तू, कुतूहलाचा विषय झालोय मी... पिंजरा मोठा असूनही मन तडफडते आहे. खरंच, माणसासारखा दगाबाज प्राणी कोणी नाही. कपटाने मला पकडलं. कपटीपणाचा मला राग येतो. हत्तीवरदेखील मी समोरून हल्ला करतो. 


आपल्या रक्तात शौर्य आहे, क्रौर्य किंवा कपट नाही. सापळा लावून पकडले, हा कुठला पराक्रम? ... पिंजऱ्यात येरझाऱ्या घालताना आजही आठवतं... गीरच्या जंगलात दमदार पावलं टाकत, गगनभेदी गर्जना करताना कसं मस्त वाटायचं. सारे प्राणी चिडीचूप व्हायचे. 


भिऊन पळून कुठेतरी दडून बसायचे. दराराच होता माझा तसा. जंगलवा राजाच मी!... पराक्रमी सिंहकुलात मी जन्मलो. सिंहकुलाच्या पराक्रमामुळे तर लो. टिळकांनी वर्तमानपत्राचे नाव केसरी ठेवलं. भारताच्या बोधचिन्हावरही आम्हीच आहोत. पराक्रमी पुरुषाचा नरसिंह, नरकेसरी म्हणून गौरव होतो... 


जंगलात भटकत मोठा झालो. आईनं शिकार करायला शिकवलं. सिंहकुलाचे कुळाचारही! ... त्यावरून आमची शिकार आम्ही स्वत: मिळवतो. दुसऱ्यानं मारलेलं खात नाही. स्वत:च्या पंजात बळ असता दुसऱ्याचं का लुबाडायचं?... पोटापुरतंच आम्ही मिळवतो. विनाकारण कुणाला मारणं आम्ही वर्ण्य मानतो. 


वाघांसारखं हिंसेचं थैमान घालगं आम्हाला आवडत नाही. “जीवो जीवस्य जीवनम्" म्हणूनच भूक असेल तर व तेवढीच शिकार. We are animals of principles. भूक लागली म्हणून गवत खाताना आम्हाला पाहिलंय?... शूर पण भोळे आम्ही. सशानेदेखील माझ्या पूर्वजाला फसवून विहिरीमध्ये उडी मारायला लावली. इसापनीतीत ती कथा वाचलीच असेल...


या आमच्या गुणांवर खूष होऊनच परमेश्वरानं आम्हाला देखणेपण बहाल केलंय अन् पंजांत, सुळ्यांत बारा हत्तीचं बळ दिलंय... एकदा तळ्यावर पाणी पिताना माझ्या प्रतिबिंबाकडे मी पाहिलं. बांधेसूद शरीर, ललनांनी हेवा करावा अशी बारीक कंबर, पराक्रमी मर्दपणा दाखवणारी भरदार आयाळ; धारदार, पाणीदार डोळे, सुळ्यांचे भाले... माझी मलाच दृष्ट लागली आणि मी जाळ्यात सापडलो. 


“कालस्य कुटिला गतिः।" माझ्या एका भावाला असेच पकडले आणि त्याच्या नशिबी सर्कशीतला पिंजरा आला तर माझ्या नशिबी हा ! हंटरच्या धाकाने शेळीबरोबर जेवण्याचा खेळ दाखविण्याची नामुष्की तरी आली नाही. आज आठवण येते माझ्यासारख्या पिंजऱ्यात अडकलेल्या अनेकांची. 


रावणाने सारे नवग्रह पिंजऱ्यात ठेवले होते. कंसाने वसुदेव-देवकीला पिंजऱ्यात ठेवले. औरंगजेबाच्या जाळ्यात सापडलेले संभाजीराजे, मंडालेच्या पिंजऱ्यात अडकवलेले लो. टिळक, अंदमानात पाठवलेले सावरकर... स्वातंत्र्यपूर्व काळात हे आणि असे कितीतरी नरसिंह पिंजऱ्यात बंदी झाले.


तसं पाहिलं तर जगही पिंजराच आहे. त्यात तुम्ही आम्ही प्राणी अडकलो आहोत. देहही पिंजराच. त्यात आत्मा अडकलेला आहे.- पण पिंजरा म्हणजे मर्यादा... तत्त्वज्ञान ठीक आहे. माझ्यासारख्या जंगलच्या राजाला घुसमटायला होते या पिंजऱ्यात. इथे किती काळ काढावा लागेल? कुणास ठाऊक! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद