पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त मराठी निबंध | Postachya Petiche Atmavrutta in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत 'उन्हा पावसात राहते, उभी तुमच्याचसाठी घडवाया स्वकीयांच्या, तुमच्याशी भेटीगाठी। पोस्टाची मी पेटी॥' माणसापेक्षा शब्द अधिक दूरवर प्रवास करतात. ही जर्मन म्हण मी खरी करून दाखवते. माझ्या पोटातून, पत्रांच्या वाहनातून, शब्द दाही दिशांना भटकत असतात. ...
जशी धनाची पेटी, प्रसाधनांची पेटी तशी मी मनाची पेटी. माझ्या पोटी अनंत मनेच असतात. खरं ना! मनातील भावनांना शब्दरूप येतं, कागदावर ते साकारतं. त्याचं होतं पत्र. कधी ते वात्सल्याचं गोड रूप घेतं, कधी रागाचं रौद्र रूप! कधी त्यात आनंदाची कारंजी असतात तर कधी निराशेची काजळी.
कधी उत्सुकता डोकावते कधी तत्त्वज्ञान बोलते. - पत्र म्हणजे मानवी व्यवहाराचे परराष्ट्रमंत्रीच! ह्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या कार्यालयामध्ये काम करणारी एक सेविकाच मी! - या पत्रांचे उद्देश तरी किती भिन्न ! पिंडापिंडात वेगळी मती तशी पत्रापत्राची वगळीच प्रकृती...
बहुतेक घरगुती पत्रांत क्षेमकुशल कळवणे, विचारणे असते. कधी आनंदाची वा दुःखाची घटना कळवणे. ही पत्रे साधी सालस असतात. मित्रांची पत्रे ही मिष्किल फिरक्या घेणारी. कधी अभिनंदनाची. एक ओळीपासून ते दहा पानी असा या पत्रांचा विस्तार असतो.
त्या मानाने व्यावहारिक पत्रे कशी आटोपशीर ! मुद्दयाशी गाठ असणारी. अघळपघळपणा न करणारी- म्हणूनच
कोरडी! व्यावहारिक पत्रात चौकशी, मागणी, आभार, अर्ज, होकार, नकार, नोटिसा, बँकव्यवहार, शेअरबाजारांचे आर्थिक व्यवहार, असं काय काय असतं. पत्रांचा मालक कधी सुखी होतो, कधी दु:खी. त्याचा चेहरा मला अगोदरच दिसतो.
पत्रांचे आकार तरी किती भिन्न, तसेच रंगसुद्धा! कार्डे, आंतरदेशीय पत्रे, पाकिटे, लिफाफे, पिवळे, हिरवे, निळे, पांढरे- सप्तरंगी इंद्रधनुष्यच! रंगीत पाकीट पोटात आलं की कळतं ग्रीटिंग आहे. गुलाबी पाकीट आलं की जाणवतं कुणा रसिकाचं हे पत्र, बहुदा प्रियकर प्रेयसीचं.
काही पत्रांना तर अत्तराचा गंधही असतो. माझीही तब्येत खूष होते. तर वाचणारा का नाही होणार? दिवाळी, नाताळला तर मला अजीर्ण होतं. हल्ली 'झी' टी.व्ही. वाल्यांनीसुद्धा 'बंपर गिफ्ट हँपर'ची लालूच दाखवत पत्रांचे ढीग वाढवलेत. माझं पोट दुखतं हो!
मला कसं आवडतं? कुणाची लग्न जमावीत, कुणाला नोकरी लागावी, कुणा पेन्शनराला चेक मिळावा... अशी चांगली कामं करायला आवडतं. बीभत्स भाषा वापरलेली, विनाकारण धमक्या देणारी पत्रं मला नकोशी वाटतात. तशीच ती साखळीपत्रं.
मला हात असते ना तर काढून फेकून दिली असती किंवा फाडून टाकली असती... सुवाच्य, सुंदर हस्ताक्षरातील पत्रं मला आवडतात, पण नॉट पेड, अर्धवट पत्ता लिहिलेली पत्रं मला चीड आणतात. माणसानं किती धांदरट असावं! टाईप अक्षरांची पत्रंही घ्यायला मला खरं तर नकोच वाटतात.
रूक्षपणाच तो; पण इलाज नसतो. कधी कधी मला फुलून यायला होतं. पोस्टाची पेटी असल्याचा अभिमान वाटतो. धन्य धन्य वाटतं. कधी सांगू? .... कुसुमाग्रज, पु.ल., व.पु., शांता शेळके अशा सरस्वतीच्या दरबारातील मानकऱ्यांची, साहित्यक्षेत्रातील दिग्गजांची पत्रं माझ्यात येऊन पडतात तेव्हा!... त्यांचा हस्तस्पर्श झालेली
त्यांच्याच हस्ताक्षरातील ओळी वाचताना, त्यांची झोकदार सही बघताना माझा आनंद पोटात मावत नाही. मला तो दिवस सणासारखा पवित्र मंगल वाटतो. “साहित्यिक येती घरा। तोचि दिवाळी दसरा ॥" रोजचं काम इमाने इतबारे करत असताना माझी नजर नेहमी असंच आनंददायी पत्र शोधत असते. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
पोस्टाच्या पेटीचे आत्मवृत्त मराठी निबंध | Postachya Petiche Atmavrutta in Marathi
पहाटे पाचचा सुमार. जाग आल्यावर लक्षात आले की दोन दिवसांपूर्वी लिहिलेली दोन पत्रे पोस्टात टाकायची राहिली. अगदी लगबगीने मी दोन्ही कार्डे उचलली आणि आमच्या बिल्डिंगजवळच्या पोस्टाच्या पेटीत टाकण्यासाठी तिथे गेलो. पत्र पेटीत टाकतो तो काय !
स्प्रिंगसारखे परत बाहेर. असे दोन तीन वेळा झाले. मनात म्हटले की ही काय भूत चेष्टा ! ही पोस्टाची पेटी आहे की वेताळाची बेटी आहे ? "आधी तोंडातलं पुडकं सार माझ्या पोटात. हाडकासारखं अडकलंय ते. मग जातील तुझी पत्रं...पोस्टाची पेटी बोलत होती.
मी पाहिले तर खरेच तोंडात एक लठ्ठ पाकीट अडकले होते, ते आत सारल्यावर माझी पत्रे आत गेली.
"आता कसं बरं वाटलं" पोस्टाची पेटी म्हणाली. "नोकरीसाठी अर्ज करतोय मेला पोस्टात ! पत्र टाकायचीसुद्धा अक्कल नाही तर हा काय काम करणार पोस्टात ? पण तुला ऐकायला वेळ आहे का ?" "हो आहे तर" मलाही ऐकावेसे वाटले ती काय सांगते ते.
"काल याचवेळी तुझ्याएवढीच एक मुलगी आली होती. ती पण एस.एस.सी. परीक्षेला बसणार आहे, यंदा बरं का ? पुण्याच्या काकांकडून काही पुस्तकं मागविली तिनं. त्यानंतर आले एक दिवटे चिरजीव कॉलेजात शिकणारे. त्यांनी वडिलांना पत्र पाठवलंय-'पाचशे रुपये पाठवा''बापाचा माल पोराची धमाल' दुसरं काय ?
आतासुद्धा माझ्या पोटात सात आठ पत्रं आहेत. एक तातडीचं पत्र आहे. कोकणातल्या आजोबांना बोलावलंय इकडे. दुसरी नोटीस आहे- 'जागा खाली करा.” आणि दहा पत्रं आहेत छापील. “नोकरीसाठी जागा नाही' अशी ठरावीक छापील उत्तरे. त्या खाली एका कविराजाच्या कवितांचं पुडकं आहे.
रोज ५/५, १० १० कविता मासिकांना पाठवतो, आणि त्यांच्याकडून त्या साभार परत' येतात. "तू जे जार्ड पाकीट खाली ढकललंसना, त्या खाली एक साखळी पत्र आहे. 'तुमच्यावर चंडीदेवीचा कोप झाला आहे. तिच्यावर एकशे आठ एकादशण्या करा नाही तर मृत्युयोग आहे.
अशाच मजकुराची दहा पत्रं आपल्या आप्तेष्टांना पाठवा, त्यांनाही अशी पत्रे पाठवायला सांगा'...झाली की नाही साखळी सुरू ! बाजूला निनावी पत्र आहे ढोले मास्तरांना; 'तुम्ही मुलांना मारायचे ताबडतोब थांबवावे नाही तर' - बोलू नकोस कोणाजवळ-तुला म्हणूनच सांगते, अरे या बाजूच्या चौकातल्या एका बँक मॅनेजरला पत्र आलंय-'
गेल्या तीन वर्षात तू तेरा लाख रुपये ढापलेस-उद्या रात्री ९वा. आरोरा टॉकिजजवळ भेट. ओळखीचा शब्द-माफ कीजिए." "तुझ्या एवढाली पोरं सिनेनट्यांना पत्रं लिहितात. आणि या मेल्या चिमुरड्या पोरीसिनेमात काम करायला नाचताहेत. अशी पत्रं लिहायला लाजा कशा वाटत नाहीत रे !” पोस्टाची लाल पेटी रागाने आणखीनच लाल होऊ लागली.
तेव्हा आता इथेच संपवावे या उद्देशाने मी म्हटलं "बरं, उशीर झाला. मी निघतो.' असं म्हणून मी क्षणभर थांबलो...पण एक ना-दोन ! काहीच उत्तर मिळेना. मग माझ्या लक्षात आले की-पोस्टाची पेटी बोलायची बंद झाली होती. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद