रामराज्य आले तर मराठी निबंध | Ram Rajy Aale Tar Essay Marathi

 रामराज्य आले तर मराठी निबंध | Ram Rajy Aale Tar Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  रामराज्य आले तर मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  रामराज्य आले तर असलेले दोन निबंध बघणार आहोत  राम, कृष्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी ही भारतीयांची श्रद्धास्थाने आहेत. भारतीयांचे आदर्श आहेत. यातील एकाही व्यक्तीला आपण पाहिले नाही. 


पण एक गोष्ट खरी की या व्यक्ती तशा आदर्शच असल्या पाहिजेत. कारण त्यांच्या त्यांच्या काळातील लोकांनीही त्यांचा गौरव केला. नंतरच्या काळातील लोकांनीही त्यांचे गुण गायले. आज अनेक शतके लोटली तरी आजही त्या पूजनीय आहेत. त्यांच्यारूपाने माणसात देव जन्माला आले होते.


दोन भावंडे एकत्र चांगली नांदत असली की लोक म्हणतात, अगदी राम-लक्ष्मणाची जोडी आहे. 'ग्यानबा-तुकाराम' यांच्या जयघोषाने आजही अवघी पंढरी दुमदुमते. शिवाजीमहाराज तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा जयजयकाराचा विषय आहे.


'शिवाजी म्हणाला' या खेळातल्या लुटुपुटीच्या खेळातल्या शिवाजीचीही आज्ञा सर्वजण शिरसावंद्य मानून आनंदाने खेळतात. हे असं का? त्यांच्या नावात सामर्थ्य होते? नाही. राम, कृष्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी हे सर्व कर्ते पुरुष होते. त्यांनी केलेल्या कामगिऱ्यांनी त्यांच्या नावांना, त्यांना अर्थ प्राप्त झाला. 


ते मोठे झाले. आज असे मोठेपण कोणाला प्राप्त होईल? चटकन 'हो' उत्तर आम्ही दे. शकत नाही. कारण आज समाजात सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार, अत्याचार, स्वैराचार हे सर्व 'आचार' लोणच्याप्रमाणे मुरत आहेत. या गोष्टींनाच नीती म्हणून समाजमान्यता मिळायला लागली. 


खरी नीतितत्त्वे फक्त भाषणातून व्यक्त करायची असतात. कारण प्रत्येकाला वाटते की ती दुसऱ्यांनी पाळण्यासाठी आहेत. जो तो सत्तेसाठी, पैशासाठी हपापलेला दिसतो. सर्वत्र असमाधान, असंतुष्टता दिसते. हर्षद मेहतांना ऊत येतो. संप, मोर्चे, बंद, आंदोलने हरघडी होत आहेत. 


स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत आहे. दारिद्रय, ,अज्ञान भयानक आहे. गुन्हेगारीचे पेव फुटले आहेत. माणसामाणसातले मानव्य लोपले आहे. जीवन तणावयुक्त आहे. आपल्याला आपल्याकडे जे नाही ते हवे वाटते. म्हणूनच आजच्या .. या अशांत, अस्थिर, अतृप्त, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर रामराज्याची' फार फार आठवण होते. 


खरंच, रामराज्य आले तर! तर सर्व लोक सुखाने नांदतील. कारण राम लोककल्याणकारी राजा होता. रामराज्य आले तर लोक सत्तेचा लोभ करणार नाहीत. लोकांनी पंतप्रधानांवर अविश्वास दर्शवला तर ते त्वरित राजीनामा देतील. जो तो आपल्या वाट्याला आलेले काम अत्यंत प्रामाणिकपणे करील. 


दुसऱ्याचे हित पाहण्यात सर्वांना आनंद होईल. स्वस्ताई होईल. दुधाच्या नद्या वाहतील. साजूक तुपाशिवाय मिठाई असणार नाही. पाचशे रुपयात सर्व कुटुंबाचा खर्च व्यवस्थित भागून काही पैसे शिल्लक पडतील. नद्या निर्मळ जळे खळाळतील. पाऊस वेळेवर हवा तेवढा पडेल. 


शेतात सोने पिकेल. वृक्ष फळांनी लहडतील. वाहने म्हणजे फक्त रथ, घोडे. त्यामुळे आवाज, धूर, प्रदूषण यांचा मागमूस राहणार नाही. सर्वांना राहण्यास भरपूर जागा. एकत्र कुटुंबपद्धती येईल. घराघरात त्याग, सेवा, प्रेम, चारित्र्य यांची शिकवण मिळेल. जीवनास शिस्त लागेल. 


वडीलधाऱ्यांचा मान राखला जाईल. स्त्रियांना नोकरीसाठी बाहेर वणवणावे लागणार नाही. बालसंगोपन नीट होईल. पोटाला अन्न, अंगभर वस्त्र सहजी मिळेल. सर्वांना उत्तम आरोग्य लाभेल. सामान्यांनाही उच्च शिक्षण घेता येईल. सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे होतील. 


काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे रिपू भुईसपाट होतील. सर्वजण एकदिलाने काम करतील. दंड, शिक्षा यांची हकालपट्टी होईल. न्याय, नीती हातात हात घालून चालतील. अवघा संसार सुखाचा होईल. फुलाफुलांवर सुवर्ण शोभेल. जगात शांतता, हास्य नांदेल. प्रेमाचे साम्राज्य होईल. भारत बलसागर होईल. विश्वात शोभून दिसेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 

रामराज्य आले तर मराठी निबंध | Ram Rajy Aale Tar Essay Marathi 


राज्य या रघुनाथाचे। 

कळीकाळासी नातुडे...

संतोषे समस्तै लोकां। 

रामराज्य भूमंडळी। 


असे रामदासांनी लिहून ठेवले आहे. खरोखर, प्रभु रामचंद्रासारखा श्रेष्ठ, कर्तव्यनिष्ठ, सत्यवचनी आणि पराक्रमी राजा पृथ्वीतलावर अद्याप झाला नाही. प्राचीनकाळी रामचंद्राने प्रथमच असे राज्य निर्माण केले की जे सर्वश्रेष्ठ न्यायावर आधारित होते. रामाच्या राज्यात कुणी दु:खी नव्हतं, 


कुणी अत्याचारी, भ्रष्टाचारी नव्हतं, कुणी भुकेलं नव्हतं, कुणी चोर नव्हतं. मानवी संस्कृतीला अपूर्व असा बहर रामाच्या राज्यातच आला. 'माणूस' रामाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ ठरला.



'रामराज्य' हे स्वप्नरंजन नव्हते, ती वस्तुस्थिती होती. जिथे राज्यकर्ता हा संन्यस्त उपभोगशून्य राजा होता. जिथे प्रजा ही राज्याची स्वामी होती, तिला आपले मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य होतं. जिथे ज्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याच्या नावाने राज्य चालविले जाते.


जो वनवासी युगपुरुष असुरांच्या सत्तेविरुद्ध मानवाच्या संघर्षाचे विजयी नेतृत्व करीत असतो, तिथेच मानवाची प्रतिष्ठा आकाशाला भिडते! आजकाल घडत असलेल्या अनेक गोष्टी, घटना ऐकल्या-पाहिल्या तर मनापुढे प्रश्नचिन्ह येते की, खरंच, आज आपण सुराज्याच्या वाटेवरून जात आहोत का?


याचे उत्तर नकारार्थी येईल. पण 'रामराज्य' निर्माण करायचे झाले तर असंख्य गोष्टी मुळापासूनच स्वीकारल्या पाहिजेत की त्या आम्ही आज विसरून गेलो आहोत. आज त्यासाठी भरताला रामाने शिकवलेली राजनीती' प्रथम संसदेच्या भिंतीवर सुवर्णाक्षरात कोरून ठेवावी लागेल. विश्वमित्रांनी श्रीरामाच्या मदतीने ज्याप्रमाणे जातिभेद मिटवून एकसंध


आर्यावर्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे आपणही विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर भारतातील जाती-उपजातींच्या भिंती कोसळून पडतील. रामराज्य खरोखर अवतरले तर... म. गांधींचे आदर्शत्वाचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल. 


माणसे सत्याने वागतील. समतेवर आधारित समाज निर्माण होईल. एकमेकांना सुखी पाहण्यास माणसाला धन्यता वाटेल. विश्वकुटुंब निर्माण होईल. ते कुटुंब स्वयंशासित राहील. शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत व पुढाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वजण न्याय आणि नीतीने वागतील. 


वरून लोकशाही व आतून हकूमशाही असला प्रकार दिसणार नाही. भ्रष्टाचाराला मूठमाती मिळेल. समस्त पुरुषवर्ग 'एकपत्नीव्रत' पाळेल. पुरुषप्रधान संस्कृती नाहीशी होईल. स्त्रियांना आदराने वागविले जाईल; पण स्त्रियांना सीतेप्रमाणे अग्निदिव्य तर करावे लागणार नाही ना?


समताधिष्ठित समाजात श्रमाला मोल येईल. श्रमिकांकडून काम करवून घेताना त्या श्रमाचा योग्य मोबदला दिला जाईल. त्यांनाही हक्क मिळतील. लोकांचे दामापेक्षा कामाकडे लक्ष राहील. युनियन्समार्फत सतत संप, बंद, घेराव यांची टांगती तलवार राहणार नाही.


न्यायदेवतेच्या दरबारात शिरलेली मतलबी दृष्टी नाहीशी होईल. हातात भगवद्गीता घेऊन आरोपी-साक्षीदार खरंच सांगतील, खोटं सांगणार नाहीत. त्यामुळे न्यायाची पायमल्ली होणार नाही. माणसं सज्जन बनतील. गुंडगिरी, तस्करी, बॉम्बस्फोट, खून, मारामाऱ्या करण्यास धजावणार नाहीत. कारण रामराज्यात असे घडेलच कसे?


आज आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत; पण आपल्या उघड्या डोळ्यांना नैतिकमूल्यांचा हास होत असताना दिसत आहे. तेव्हा भविष्यकाळातील अराजकाच्या मार्गावर आपणाला श्रीरामाचे चरित्र दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शन करील.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद