आई थोर तुझे उपकार मराठी निबंध | Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आई थोर तुझे उपकार मराठी निबंध बघणार आहोत. लहानपणी आमच्या शाळेतल्या पुस्तकात आचार्य अत्र्यांचा 'दिनूचे बिल' नावाचा एक धडा होता. आई दिनूला डॉक्टरांकडून औषध आणायला सांगते.
औषधाबरोबर डॉक्टर औषधाचे बिल तयार करून देतात. त्यात दोन-तीनवेळा घरी येऊन गेल्याबद्दल व्हिजिट फी लिहिलेली असते. दिनूला वाटते आपणसुद्धा घरात पुष्कळ कामे करतो, दुकानातून वेळोवेळी वस्तू आणतो, निरोप सांगतो, शिवाय घरातली कामे करतो.
आपणसुद्धा बिल का करू नये ? तसे बिल करून - तो आईच्या डोक्याशी औषधाच्या बाटलीखाली ठेवतो. सकाळी झोपेतून उठून पाहतो तर त्याच्या डोक्याशी त्याच्या बिलाबरोबर पैशाची रक्कम असते. त्या सोबत दुसरे एक बिल असते.
'आईचे बिल'. (१) दिनूला लहानाचा मोठा केला. काही नाही. (२) दिनूच्या अनेक आजारपणात त्याची सेवा शुश्रूषा केली. .....काही नाही. (३) दिनूला आवडणारे अनेक पदार्थ करून जेवाखायला वाढले. ....काही नाही. (४) दिनूला घरी शिकविले, गोष्टी सांगितल्या, त्याचा संभाळ केला. ....काही नाही.
ते बिल वाचल्यावर दिनूच्या डोळ्यांतून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या. त्याला आईच्या थोर मनाची आणि अगणित उपकारांची जाणीव झाली. (त्यालाच नव्हे, मलासुद्धा!) आई मुलाला नऊ महिने उदरी वाहून देते तेव्हापासून अखेरपर्यंत ती आपल्या मुलासाठी सतत श्रम करते.
यातना सहन करीत असते. तान्ह्या मुलाला सांभाळणे ही अतिशय बिकट गोष्ट असते. त्यावेळी त्याचे मलमूत्र काढण्यापासून त्याला दूध पाजणे, झोपविणे वगैरे कामे मुलाची आईच करू जाणे ! मूल जसे जसे मोठे होते तसे त्याला बोलाचालायला शिकविणे ही सारी कामे बहुतेक प्रत्येक घरात आईच करीत असते.
पुढे आणखी मोठा झाल्यावर त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देते. त्याच्या लहान-मोठ्या चुका पदरात घेते. पुष्कळ वेळा गुन्ह्याबद्दल कठोर शासन करते आणि त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणते. लहान मुलांना योग्य ते वळण लावण्याचे व सन्मार्गाचे संस्कार करण्याचे काम आईच करते.
साने गुरुजींची 'श्यामची आई' ही गोष्ट महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय आहे. श्याम लहानपणी रडका, चिडका, हट्टी, आळशी, कामचुकार असतो. क्वचित खोटे बोलतो. तोच आईच्या प्रेमळ शिकवणीने आनंदी, खेळकर व कामसू बनतो. सत्यप्रिय होतो. घरातल्या सुखदुःखात समरस होतो.
लहान वयात आईने केलेले संस्कार चिरंतन असतात. आईची माया निरपेक्ष असते. तिचे प्रेम अक्षय अविनाशी असते. आईचे वात्सल्य सांगणाऱ्या शेकडो कविता जगातल्या विविध भाषांत प्रसिद्ध आहेत. कवी माधव जूलियन ‘आईची आठवण' काढताना म्हणतात -
सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे
तेणे चिताच चिती माझ्या अखंड पेटे
इतकेच नव्हे पुढील जन्मसुद्धा याच मातेच्या पोटी यावा अशी इच्छा ते व्यक्त करतात. कवी यशवंत त्यांच्या आई या कवितेत लिहितात 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.' माणसाला साऱ्या गोष्टी बाजारात मिळू शकतात. मोठेपणा, विद्या, मानमरातब, धनदौलत सारे काही मिळते. पण आईचे प्रेम नसले तर सारे तुच्छ आहे.
सत्यभामेच्या खजिन्यातल्या साऱ्या सुवर्ण भांडाराने श्रीकृष्णाची सुवर्णतुला होऊ शकली नाही पण "रुक्मिणिने एका तुलसिदलाने गिरिधर प्रभु तुळला." कशाच्या जोरावर ? निरपेक्ष प्रेमाच्या शक्तीवर ! आईचे मुलावरचे प्रेम असेच निरपेक्ष असते. साने गुरुजींची ‘मोलकरीण' कथा पहा. मुलाचे .
सुख डोळे भरून पहावे आणि दुःखात व अडचणीत त्याची नित्य सेवा स्वतःला करता यावी यासाठी आई स्वतःच्या मुलाच्या घरात मोलकरीण' बनून राहते. त्यांच्या दुसऱ्या एका गोष्टीत प्रेयसीच्या पांचट प्रेमापायी पागल झालेला मजनू आपल्या 'लैला'साठी ती मागेल ते तिला आणून द्यायचे कबूल करतो.
ती आईचे काळीज मागते. प्रेमापायी वेडापिसा झालेला तो नादान पोर आपल्या आईला ठार मारतो. तिचे काळीज कापून हातात घेऊन प्रेयसीकडे येतो. रस्त्यात त्याला ठेच लागून तो पडतो. हातातले काळीज लांब जाऊन पडते, स्वतःला सावरत लंगडत्या पायांनी मुलगा ते काळीज उचलायला जातो,
तेव्हा त्या काळजातून शब्द ऐकू येतात-"बाळ तुला जास्त लागलं तर नाही ना?" म्हणून बाळ कोल्हटकर 'दरिताचे तिमिर जावो' या नाटकात लिहितात आई तुझी आठवण येते सुखद-स्मृतींच्या कल्लोळांनी काळिज का जळते ? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद