आमची मोलकरीण निबंध मराठी | Aamchi Molkarin Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची मोलकरीण मराठी निबंध बघणार आहोत. “भारतीबाई, चार दिवस पोरी येणार आहेत. काम थोडं जास्तच पडेल आणि हो, त्या आहेत तोपर्यंत खाडा करू नकोस बरं! माहेरविशिणींना काम नको पडायला" इति मातोश्री. "काई फिकर करू नका तुमी. नाय करत मी खाडा. पोरींना त्यांच्या त्यांच्या घरी करनंच हाय. आन कितीबी काम पडू द्या, मी कायबी न्हनायची नाई" भारतीबाई म्हणाली.
माहेरवाशिणी येणार म्हटलं की आई आणि भारतीबाईचा संवाद ठरलेला! आई तिला हक्कानं सुटी न काढण्याबद्दल बजावणार, तीही आवासन देणार (आणि पाळणारही!) या तिच्या समजूतदारपणामुळे, सच्चेपणामुळे तिने आमच्या सर्वांच्या मनात कायमचं घर केलंय. भारतीबाई तशी अशिक्षित, निरक्षरच! शाळेची पायरीही चढलेली नाही.
पण तिचा सुसंस्कृतपणा पाहिला की ती स्वतःला सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या पुढे आहे हे लक्षात येतं. कुरकुर, कटकट करणं तिच्या रक्तातच नाही. प्राप्त परिस्थितीबद्दल फारशी तक्रार नाही. कष्ट करून जे काय चार ओले कोरडे घास मिळतील त्यावर तिचा उदरनिर्वाह चालू आहे. वाटतं तिचंही जीवनाबद्दलचं एक तत्त्वज्ञान खचितच असलं पाहिजे. त्यानुसार तिची कालक्रमणा सुरु आहे.
तिचा नवरा शिकलेला. चांगला मॅट्रिक झालेला. पण नोकरी नाही म्हणून रिक्षा चालवितो. रात्री थकून भागून घरी यावं तर दारुड्यांचा हैदोस सुरु होतो. अशी रोजचीच 'कोजागिरी' नशिबी आलेली. दिवसभर ढोरमेहनत करून अंग आंबून जातं. रात्री रोज फुकटचा तमाशा.
मग सुखाची झोप कुठली लागायला! थोडा वेळ भुईवर हाडं टाकली की उठायचीच वेळ. दिवसाचं रहाटगाडगं चालू. एखाद्या हळुवार क्षणी जखमेवरची खपली पडून ती भळभळ वाहू लागते. तेव्हा भारतीबाई आपली व्यथा बोलून दाखविते. अन्यथा 'सुख सांगावं जनात, दुःख ठेवावं मनात' हे तिला माहीत असावंसं वाटतं.
भारतीबाईचं कुटुंब तसं छोटंच. नवरा, बायको, एक मुलगी, मुलगा असं चौकोनी कुटुंब, मुलीच्या नशिबानं तिला चांगलं ठिकाण मिळालंय. मुलाचंही लग्न झालं. आपल्या नातवंडांना या प्रेमळ आजीने मोठा जीव लावलाय! सारखं नातींच्या हुशारीचं कौतुक चालू असतं.
आपल्या ऐपतीनुसार त्यांचे लाडही ती पुरवीत असते. सुनेला काहीच बोल न लावणारी सासू विरळाच. अशा दुर्मिळ सासवांमध्ये भारतीबाई आहे. "सून बेस हाय बाई. मला घरात कायबी काम करू देत नाई. आयतं जेवायला भेटते." हे सांगताना तिचा चेहरा आनंदाने खुलला असतो.
गरिबी असली तरी ती हावरट नाही. तिचं जिणं लाचारीचं नाही. तिच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तितकं थोडं. दुपारी चहाच्या वेळी ती आली तर आई तिला सहजच विचारते, "चहा घेणार का?” नुकताच कोणाकडे चहा झाला असेल तर ती सांगते, “बाई, आत्ताच घेतला. जास्त च्या प्यायला की तरास होतो" आज आमच्या घरी ती गेल्या वीस वर्षापासून काम करते आहे पण कोणत्याही वस्तूसाठी तिने कधी हात पसरल्याचं स्मरत नाही..
लग्नकार्य, दुखणी, प्रवास, पाहुणे असा जास्तीचा खर्च उपटला की तिला जास्तीचे पैसे मागायची वेळ येते. मग ती बिचकतच म्हणणार, “बाई, पैसे पायजे होते थोडे. मयन्याच्या पगारावर कापून घ्या." या तिच्या खुबीमुळे तिला नकारार्थी उत्तर द्यायला जीभ रेटत नाही.
तिचा आत्मविश्वास चांगला आहे. नेतृत्वाचे गुणही तिच्या अंगी आहेत. कधी कधी गंमत म्हणून डोक्यात कल्पना येते की तिची रास 'सिंह' असावी. ती भांडखोर नसली तरी पण इतर मोलकरणींवर ती वचक ठेवून आहे. दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती तिच्या अंगी उपजतच असावी. भारतीबाई तशी 'ग्रेट' आहे हं! मध्यंतरी एका मोलकरणीचं कसलंसं ऑपरेशन झालं.
डॉक्टरांनी तिला जड उचलायला मना केलेलं. सर्व कामं सुटायची वेळ आली. अशा वेळी भारतीबाईने काढलेला तोडगा पाहून तर आम्ही थक्कच झालो. तिने आपली भांडी घासण्याची सर्व घरं तिला दिली आणि तिची धुण्याची कामं स्वतःकडे घेतली. तिचे दोन महिने निभवून देणाऱ्या भारतीबाईला अशिक्षित का म्हणायचे? हाही एक अनुत्तरित प्रश्नच आहे.
इंग्रजी शब्द वापरण्याच्या तिच्या हौशीमुळे कधीकधी खूप विनोदी प्रसंग घडतात. माझ्या ताईला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. भारतीबाई आईला म्हणाली, “आपली बाई 'निर्मल' झाली नं?" म्हणजे गं काय? काहीच अर्थबोध न झाल्याने आईने विचारले, “म्हणजे कात्री नाही लावावी लागली नं?" आईने त्यावर हसत हसत उत्तर दिले "हो, हो, निर्मल झाली." नॉर्मल आणि निर्मल तिच्या दृष्टीने सारखेच!
एकदा मात्र कळसच झाला. तिच्या नात्यातले एक आजोबा 'हार्ट अटॅक' ने दगावले. दुसऱ्याच दिवशी भारतीबाईने माहिती पुरवली. "बाई, डागतरांनी त्यांस्नी 'बेडशीट' घ्यायला सांगितलं व्हतं. पर त्यानं ऐकलं न्हाई. गेला बिचारा! आपुन काय करनार?" आईने कसेबसे हसू आवरले पण घरात येऊन आम्हाला हे सांगताना आईची हसून हसून मुरकुंडी वळत होती.
भारतीबाई आता थकत चाललीय. पूर्वसूचना न देता होणाऱ्या खाड्यांचं प्रमाणही वाढलंय. पण तिला सोडायचा विचार आम्हाला सोसवणारा नाही. कधीतरी आम्ही गमतीने तिला म्हणतो, “आम्ही दुसऱ्या गावाला बदलून गेलो तर तिथेही तुला नेणार आहोत." यावर ती हसत हसत होकार भरते. एकदा अशीच आठ दिवस भारतीबाई घरी राहिली.
आई तिच्यावर चांगलीच उखडली. भारतीबाई म्हणाली "बाई, आजकाल तुम्ही जास्तच चिडचिड करता." आई खवळून म्हणाली, “म्हणजे? तू १०, १० दिवस घरी राहणार आणि मी चिडणार नाही तर काय!" या गोष्टीला २, ३ दिवस लोटले. आईचा मूड पाहून ती आईला म्हणाली, "बाई, मला नंतर लई वाईट वाटलं आपुन बाईंना असं बोललो म्हनून." आईचा राग तर केव्हाच विरघळला होता, तिने म्हटले, "बरं, बरं, ठीक आहे.
पुढच्या आठवड्यात पोरी येताहेत." आईचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच भारतीबाई तत्परतेनं उद्गारली, "येऊ द्यानं बाई त्यांस्नी, आता मी येकबी खाडा करनार नाय." मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद