आमची सहल मराठी निबंध | Aamchi Sahal Marathi Nibandh
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठाऊक नाही असा एखादा मराठी माणूस महाराष्ट्रात आढळेल काय ? शिवाजी महाराजांच्या अद्भुत चरित्राची मोहिनी लहानथोर सर्वांनाच पडते. शिवाजी महाराजांच्या जीवनातले किती तरी प्रसंग रोमहर्षक व चित्तथरारक. पण मला त्यातला अफझलखान भेटीचा प्रसंग सर्वाधिक चित्तथरारक वाटला.
जिथे उभयतांची ही भेट झाली तो प्रतापगड पाहण्याची इच्छा मला होती ती त्यामुळेच. तसा योग नुकताच जुळून आला. 'या दिवाळीच्या सुटीत महाबळेश्वर-प्रतापगडावर यायला कोण तयार आहे' म्हणताच जवळजवळ चाळीस पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी तयारी दाखविली. (सुटीच्या दिवसांत बहुधा कोणी येणार नाही असे आमच्या राजे सरांना वाटले होते.)
शुक्रवारी ३ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता आमची एस. टी. बस आमच्या 'चिकित्सक हायस्कूलपासून निघाली. पहिली विश्रांती आम्ही महाडला घेतली. दुपारी एक वाजता तिथे जेवण खाणे उरकून आम्ही पुढे निघालो. महाबळेश्वरला हॉटेल ‘सत्कार' मध्ये आमची राहण्याजेवण्याची सोय केली होती. हॉटेल मध्यम स्वरूपाचे आहे.
अगदी मामुली टुकार नाही तसे फार बडे नाही. तिथे चहापाणी करून आम्ही संध्याकाळीच सूर्यास्त (sunset point) पॉइंटवर सूर्यास्त पाहायला गेलो. मुंबईतल्या मुलांना मुळातच सूर्योदय आणि सूर्यास्त ही निर्सगरम्य दृश्ये पाहण्याची संधी कमी !
त्यात आम्हा गिरगावकरांना चौपाटीवर सूर्यास्त पाहायला मिळू शकतो. पण पाहतात किती जण ? सध्या दूरदर्शन (T.V.) व चित्रदर्शन (व्हिडिओ) मुळे बहुतेकांचे संध्याकाळचे फिरणे बंदच झालेय. (तसा मी चौपाटीवरचा सूर्यास्त एक-दोनदा पाहिलाय, पण तोही बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी तिसरी-चौथीत असताना) त्यामुळे हा सूर्यास्त अत्यंत रमणीय वाटला.
सूर्य मावळताना आकाशात बदलणारे रंग, सूर्याचे बदलते आकार - दंडगोलाकृती, 'उपड्या घड्यासारखा-सूर्याचा तांबुस सोनेरी रंग, आणि क्षितिजाखाली उतरताना तो हळूहळू नाहीसा होणे, सारेच विलोभनीय. असाच नेमका उलट चित्तचक्षुवेधक अनुभव दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ।। वाजता सूर्योदय पॉइंटवरून सूर्योदय पाहताना आला.
खोल दरीतून तो भगवान सहस्ररश्मी अलगद वर येत होता, 'दिशा उजळल्या' या शब्दांचा खरा अर्थ तिथे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाला आणि साऱ्यांच्याच चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. या दोन पॉइंट खेरीज आम्ही अनेक रम्य स्थळे पाहिली. पण याची सर नाही.
एका पॉइंटवरून आपल्या आवाजाचे दोन दोन, तीन तीन प्रतिध्वनी एकले. आमच्यातला बाबू नाईक मोठा नाटकी. त्याने वेगवेगळ्या नटांचे आवाज काढले, आणि मजा म्हणजे प्रतिध्वनी अगदी तसेच्या तसे आले. हिंदी चित्रपटातल्या नटनट्यांचे नाचण्याचे आवडते स्थळ 'आर्थर सीट'; तेही आम्ही पाहिले. संपूर्ण महाबळेश्वर दुसऱ्या दिवसात पाहून त्या दिवशी संध्याकाळी आम्ही प्रतापगडावर निघालो.
प्रतापगडाच्या पायथ्यापाशी वाडा गाव आहे. वाईपासून जवळ आहे. तेथून अर्धा एक किलोमीटर चढाव आहे. एक रस्ता बाजूच्या विरळ जंगलातून जातो. पण आमची एस.टी.बस असल्यामुळे आम्ही अगदी प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन पोचलो. उतरता क्षणीच थोड्या अंतरावर डाव्या बाजूला अफझलखानाची कबर आहे. त्याच्याच बाजूला सय्यद बंडाचीही कबर आहे.
राजे मास्तरांनी आमचा मोर्चा प्रथम त्या कबरींकडे वळवला. ती कबर व तो दिवाणखाना इतका दिमाखदार आणि भपकेबाज आहे की पाहणारा स्तिमित व्हावा. आमचा शशांक कोल्हटकर फार चौकस, त्याने विचारले “ही कबर इतकी ऐटबाज कशी ?” “या कबरीच्या देखभालीकरता इराणमधून आणि इतर आखाती देशांतून पैसा पुरवला जातो.
" आमच्या नव्या मार्गदर्शकाने (गाइडने) उत्तर दिले. पण मंजू व्यासला निराळाच प्रश्न पडला होता. ती म्हणाली - "इथे हे धागे कसले बांधले आहेत ? आणि वर चांदीचे पाळणे कशासाठी ?... तिथला निवेदक म्हणाला “धागे मदत मागण्यासाठी, मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि समजा इच्छेप्रमाणे मूल झाले तर इथे चांदीचा पाळणा बांधायचा.
हे सारे पाळणे त्यातले आहेत." "म्हणजे इथे नवस बोलतात ?' विनूने आश्चर्याने विचारले. "हो नवस बोलतात. भूतबाधा झाली तरी इथे येतात. भुते काढायला". दुसरी निवेदिका म्हणाली. संदीपला राहवले नाही; तो म्हणला, “या भुताला गाडणारा वर आहे. आणि हा काय भुते घालविणार ?
ही अंधश्रद्धा कोण दूर करणार आहे ?" (याच जागी महाराजांची व खानाची भेट झाली होती, तो प्रसंग आम्हांला सर्वांना आठवला.) तिथून गडाच्या पायऱ्या अगदी कमी आहेत. दोनशे असतील. रायगडासारख्या सोळाशे नाहीत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम महाराजांच्या ज्या भवानीमातेने महाराजांना दृष्टांत - दिला,
काही तर सांगतात - महाराजांना भवानी तलवार भवानीमातेनेच दिली. त्या मातेचे देऊळ पाहिले. त्यानंतर आम्ही महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा पाहायला गेलो. महाराजांचा सारा इतिहास डोळ्यांपुढे उभा राहिला. आपटे सरांनी सर्व मुलांना एका महालात एकत्र बसवून अफझलखान वधाचा रोमहर्षक इतिहास तिथे सांगितला.
सुमारे तासभर सर बोलत होते, पण आम्ही सर्व चित्रासारखे बसून उत्कंठेने ऐकत होतो. पुढे आम्ही प्रतापगडावरची गुलाब पुष्पवाटिका पाहिली. गुलाब इतक्या विविध रंगांचे असतात हे प्रथम तिथे समजले मला. गुलाबी गुलाब, लाल गुलाब, पांढरा गुलाब, पिवळा गुलाब.
असे व एवढे मोठे गुलाब यापूर्वी कधीच नव्हते. ही पुष्पवाटिका पंडित नेहरू येण्याच्या सुमाराला तयार झाली असावी. (नेहरूंना गुलाबाची फुले फार आवडत.) नेहरूंची छत्री प्रतापगडावर आहे. बऱ्याच मुलांना त्याचा अर्थ आधी कळला नव्हता. काहींना वाटले नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा तिथे छत्री विसरले.
नंतर समजले जिथे बसून नेहरूंनी थोडा वेळ विश्रांती घेतली ती जागा म्हणजे नेहरूंची छत्री. (त्यावेळी पंडित नेहरू प्रतापगडाच्या पायऱ्या स्वतः झपाझप चढून गेले आणि त्यांच्यासाठी आणलेल्या डोलीतून दुसरेच गेले असे म्हणतात.) प्रतापगड तसा मोठा गड नाही पण चांगल्या स्थितीत आहे. तिथून इतरही गडांचे दर्शन घडते.
महाराजांच्या जीवनातला पहिला रणसंग्राम, मराठी अस्मितेचा पहिला हुंकार इथे उमटला. महाराष्ट्र राज्याचा पहिला श्रीकार तिथे कट्यारीने लिहिला गेला. समर्थ रामदास स्वामींच्या ओव्या आठवल्या.
शिवरायाचे आठवावे रूप ।
शिवरायाचा आठवावा प्रताप ।
शिवरायाचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।। शिवरायास आठवावे ।
जीवित तृणवत् मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे ।
कीर्तिरूपे।।
त्यानंतर यथावकाश आम्ही एस. टी. ने घरी परतलो खरे, पण पुढे कित्येक दिवस मी मात्र मनाने प्रतापगडावरच वावरत होतो. माझी स्थिती झाली होती एकला नयनाला, विषय तोचि जाहला। कुणी भाग घेतला ? राहण्या-जेवण्याची काय व्यवस्था होती ? याचे वर्णन सहलीच्या वर्णनात हवे.
सहल परतल्याचेही वर्णन हवे. तथापि सहलीत केवळ प्रवासाचे वर्णन नको. सहलस्थळाच्या वर्णनाला जास्त महत्त्व हवे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद