आजकालचे शिक्षण व बेकारी मराठी निबंध | Ajkalche Shikshan V Bekari Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजकालचे शिक्षण व बेकारी मराठी निबंध बघणार आहोत. 'मी जरा आत येऊ का?' 'ये की, काय म्हणणं आहे ?" या फॉर्मप्रमाणे शाळेचे प्रशस्तिपत्रक हवे आहे, त्याखाली मुख्याध्यापकांची सही हवी आहे' 'कशासाठी?'
'महापालिकेत नोकरीसाठी अर्ज करतो आहे.' जूनमध्ये दहावी, बारावीचे निकाल मिळायला लागल्यावर नेहमी असे संवाद ऐकायला मिळतात. अलीकडे दरवर्षी शालान्त परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे. इ. १९९५ मध्ये केवळ मुंबई विभागाच्या एस.एस.सी. परीक्षेला सुमारे चार लाख विद्यार्थी बसले.
२२०००० म्हणजे सुमारे ५५% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हल्ली महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे बारा लक्ष विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यापैकी सुमारे ५ लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात ऑक्टोबरमध्ये ५०/६० हजार उत्तीर्ण होतात. यातले कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे किती ? आणि कमी टक्केवारी असणाऱ्यांना तो मिळणेही मुश्किल.
ते सारे वगळले तरी उत्तीर्ण झालेल्यापैकी सुमारे दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी नोकरीसाठी धडपडतात. त्यातल्या निम्म्या मुलांना नोकरी मिळते-म्हणजेच दर वर्षी केवळ महाराष्ट्रातच जवळजवळ १ लाख २५ हजार विद्यार्थी नव्याने बेकार बनून राहतात.
शाळांमधून शिकविले जाणारे विषय-मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गणित, शास्त्रे, अर्थशास्त्र, या विषयांचा अभ्यास करून उच्च अभ्यासक्रम घेणारे किती ? कार्यानुभव, हस्तव्यवसाय, समाजसेवा या विषयांचे नियोजन व उपयोजन बरोबर झाले नाही. म्हणून विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हा दृष्टिकोन फुकट गेला आहे.
डॉक्टर, इंजिनीअर, वकील व अकाउंटन्ट किती जण होणार ? छोटे छोटे तंत्रज्ञ, यंत्र विशारद, टर्नर, फिटर, मशिनिस्ट वगैरे शिक्षण देणारी आय.टी. आय. सारखी संस्था किती विद्यार्थ्यांना एका वर्षात शिकविणार ? तिथे जास्त विद्यार्थी घ्यावेत पण साहित्य, जागा, शिक्षक व आर्थिक तरतूद या साऱ्यांचीच उणीव !
आज गिरण्या, कारखाने, उद्योगधंदे, लहानमोठे व्यवसाय, मच्छिमार, नौकानयन, दळणवळण केन्द्र, लहानमोठे प्रकल्प, शेती व इतर क्षेत्रातली उत्पादनवाढीची क्रांतिकारी योजना, यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले तरुण हवे आहेत. पुढील संशोधन करण्यासाठी जिद्दी संशोधक हवे आहेत. सध्या ते काम करणाऱ्यांना मदत करणारा नोकरवर्ग हवा आहे.
काय परिस्थिती आहे पहा. तिकडे दरवर्षी १ लाख २५००० तरुण बेकार होत आहेत, तर इकडे या विविध क्षेत्रांत काम करायला माणसे मिळत नाहीत. म्हणजे नोकरी आहे व बेकारीही आहे. म्हणजे हल्लीचे शिक्षण नोकरी देण्यास निरुपयोगी ठरत नाही का ?
केवळ शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊनही माणसे मिळणार नाहीत. त्यासाठी छोटे छोटे व्यवसायपूरक अभ्यासक्रम शिकवले पाहिजेत. त्यांची सोय करायला हवी.
त्यासाठी आर्थिक व शैक्षणिक नियोजन हवे. सतत महाविद्यालयांकडे धाव घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ठरावीक नोकया मिळणार तरी कशा? म्हणून वाढत्या बेकारीला आळा घालण्यासाठी शिक्षणाची रूढ चाकोरी सोडण्याची हीच वेळआहे, असे माझ्याप्रमाणे तुम्हांलाही वाटत नाही का ? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद