चहाचे मनोगत मराठी निबंध | Chahache Manogat Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण चहाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. 'चहाचा घुटका, घेतल्याविना नाही सुटका इकडे पाही तिकडे पाही, चहा काही मिळत नाही, कसा मी नशिबाचा फुटका आजोबांचे चहावरचे गाणे फार रंगात आले होते.
चहावरचे ते गाणे, चहा पिता पिता ऐकताना मला फार मजा वाटली, चहाकडे पाहिले तो काय आश्चर्य ? तो सोडा लेमनसारखा फसफसत होता. 'झालं काय तुला फसफसायला' मी चहाच्या कपाकडे पाहात म्हटलं... "काय झालं नाही ते विचार?" चहाच बोलत होता, "फसफसतोय म्हणजे आनंदाने हसतोय मी."
"घरी वा दारी, गावी किंवा शहरी मजवाचून चैन न कुणा परी" "अरे वा, तू कवीसुद्धा झालास.'' चहाच्या कपाकडे पाहात मी म्हटलं. "मूर्ख मुला, अरे कवी नव्हे, मी म्हणजेच मूर्तिमंत काव्य आहे"...चहा पुढे बोलू लागला. "माइयावाचून कवीचं काव्य कागदावर उतरत नाही.
गावं, शहरं, घरं, बागा, स्टेशनं, शाळा, कॉलेज, नाट्यगृहं, सिनेमा थिएटरं सर्वत्र माझा स्वैरसंचार आहे. हॉटेलांचा तर मी प्राण आहे. माझी किंमत कॅशरला विचार. (पूर्वी एक आणा होती, आता दोन ते चार रूपये झाल्येय !) पण माझे मोल इराण्याला विचार. माझ्या आधारावर त्यांनी इथे वसाहती केल्या.
'माझ्या रंगाकडे पहा. कसा आहे ? लालसर गोऱ्या रंगाच्या सोळा वर्षाच्या लाजऱ्या बालिकेच्या गालावरच्या लालीसारखा. ज्यांनी हा रंग डोळे भरून पाहिला त्यांचे डोळे निवलेच समज. आणि माझा गुण काय विचार ?...तुम्हांला कितीही शीण आलेला असो, तुमचं डोकं दुखत असो, अंग मोडून आलेलं असो, 'एकवार घ्या मम आश्रय...बघा घडे कोणता विस्मय !'
तुमचा शीण हळू हळू क्षीण होत जाईल. तुम्हांला तरतरी येईल. उत्साह येईल. अवघ्या पाच मिनिटांत. आणि त्या मानाने माफक पैशांत. "तुला काय वाटतं ? माझं व्यसन वाईट ? मी दारूसारखा आहे ? अरे चंद्र व सूर्य दोन्हीही प्रकाश देतात, मग चंद्र हा सूर्यासारखा म्हण की ! आता का ? सूर्याची दाहकता जशी चंद्रात नाही,
तशी दारूची दाहकता माझ्यात नाही. माझ्यात आहे मद्याची मादकता माफक प्रमाणात; परिणाम मात्र नेमका उलटा. मद्यामुळे बसलेला माणूस आडवा होतो, तर माझ्यामुळे आडवा झोपलेला माणूस उत्साहाने उठून बसतो.हल्ली सगळ्यांचा ‘कर्ता करविता' मी आहे.
कविजनांची प्रतिभा मी, संपादकांची स्फूर्ती मी. प्रणयीयुग्मांची प्रीती मी, तर कृष्णमेननसारख्या आंतरराष्ट्रीय नेत्याची कीर्ती मी! मी म्हणजे वसुधातलावरील सुधा ! (अमृत) सर्व सृष्टीवर माझंच राज्य आहे. अखिल मानव जातीवर माझाच 'अंमल' चालू आहे. 'कॉफी, कोको, ओव्हलाटिन' यासारख्या पेयांनी मला माझ्या 'सम्राट' पदावरून खाली खेचण्याचे प्रयत्न केले पण सारे व्यर्थ ! माझ्यावाचून काय अर्थ ?"
मी अचानक भानावर येऊन चहाचा घुटका घेतला. तेव्हा बाहेर आजोबा गात होतेया चहाप्रती किती मान । म्हणति मधुपान । जसे तुकड्यासाठी श्वान। लाविते ध्यान...म्हणति मधुपान॥ मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद