चौपाटीवर संध्याकाळी मराठी निबंध | Chopativr Sandhyakal Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण चौपाटीवर संध्याकाळी मराठी निबंध बघणार आहोत. 'आग्याला जाऊन तिथे दोन चार दिवस राहून ज्याने ताजमहाल पहिला नाही असा एखादा महापुरुष मला दाखवाल का ? त्याला माझा दंडवत ! आग्याचा जसा ताजमहाल, तशी मुंबईची चौपाटी ! लोकमान्य टिळक व विठ्ठलभाई पटेल यांच्या स्मारकांनी सजलेले महाराष्ट्र राजधानीचे निष्ठास्थान - मुंबई गिरगाव चौपाटी.'
पण त्यातही सायंकाळी चौपाटीवर फिरायला जाण्यात जो आनंद आहे तो एरव्ही नाही. भैरवी ही सदारागिणी खरी, पण तरीही मैफल संपविताना भैरवी गाण्यात अधिक गोडी आहे. तसेच संध्याकाळी चौपाटीवर कसलीही सभा असेल तर विचारायला नको. एका बाजूला चौपाटीच्या धक्क्यावर धडका देणारा अरबी सागर, तर समोर त्याच्याशी स्पर्धा करणारा अफाट जनसागर. हजारो लोक तासन् तास तिष्ठत उभे असतात.
ध्वनिक्षेपकांवरून ओरडणा-या वक्त्यांची भाषणे कानांचे द्रोण करून ते त्यात साठवत असतात. आणि भाषणाकडे ढुंकूनसुद्धा न पाहता आणि कान न देता चौपाटीच्या कट्टयावर इतर हजारो स्त्री-पुरुष टोळक्या टोळक्यांनी बसलेले असतात. सारी टोळकी आपापल्या तो-यात, नादात आणि तालात गुंग झालेली असतात.
पुराणवस्तुसंग्रहालय म्हणजे म्युझियम, प्राणिसंग्रहालय म्हणजे राणीची बाग, तसे विविधजन संग्रहालय म्हणजे चौपाटी. चौपाटीवरच्या लोकांकडे नीट पहा. यात कोण दिसत नाही ? इथे लहान मुले मुली, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, विवाहित अगर विवाहोत्सुक तरुणतरुणी आहेत,
डोळ्यावर चाळिशी धारण करणारे चाळिशीतले रावसाहेब, भाऊसाहेब आहेत, साठीपर्यन्तचे आयुष्य गाठीला मारलेले सेवानिवृत्त पंत, दादाजी आहेत. चणेवाले, भेळवाले, नारियल पाणीवाले, कुल्फिवाले, बूट पॉलिशवाले आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज आहेत.
मी चौपाटीच्या वाळून बसलो होतो तिथून काही अंतरावर काही छोटी मुले वाळूचा किल्ला करीत होती, तर काही जण विहीर करीत होती. रंगी बेरंगी चित्राचे शर्ट, बुशर्ट, टी शर्ट, पोलो शर्टस, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या, काळया हाफ पँटस घातलेली असंख्य छोटी मुले, मोठी
माणसे दिसत होती. बाकी एक गोष्ट खरी, पुरुष किती नटले मुरडले तरी नारीच्या नख-याचा तोरा त्यांना येणे शक्यच नाही. रंगी बेरंगी फ्रॉक्स, स्कर्टस, मॅक्सीज, मिडीझ, नायलॉन, ड्रैलॉन, टेरीन, सेमीटेरीन, पॉलिस्टर प्रिन्टेड साड्या, रेशमी झुळझुळीत मुलायम तलम पातळे परिधान केलेल्या तरुण स्त्रिया म्हणजे चालते बोलते विविध वस्त्रभांडारच !
वेशभूषा, केशभूषा, आधुनिक अलंकारभूषा यांची अघोषित हलती फुलती स्पर्धाच जणू काही लागलेली ! स्पर्धा कसली अनिबंध शर्यतच म्हणाना ? खरंच ! साज शृंगार करावा तर स्त्रियांनीच. (पुरुषांनी तो फक्त डोळे भरून पहावा, दुरून !)
पण चौपाटीवर फिरायला जाणारे सारे समुद्राकडे पाठ फिरवून बसलेले पाहिले की मनात विचार येतो की निसर्गसौंदर्य यांना दिसत नाही की कळतच नाही ? संध्याछाया आणि मेघांच्या विविधरंगी पडछाया पडलेल्या या रत्नाकराकडे कोणाचेच कसे लक्ष नाही ?
त्या उसळणा-या लाटा त्यांचे ते फेसाळ तुषार, त्यात पडलेली इमारतींची, दिव्याची व नक्षत्रांची हलती डोलती प्रतिबिंबे, हे सारे पाहून परतत असताना मनातल्या ओळी कानात गुणगुणतात चौपाटीवर संध्याकाळी, हरपून जाते अवघे तनमन रूप रंग सौन्दर्यसागरी ओसंडे आनंदहर्षधन मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद