भूकंप निबंध मराठी | Essay on Bhukamp in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंप मराठी निबंध बघणार आहोत. ३० सप्टेंबर १९९३ची प्रलयंकारी पहाट ! नुकतीच अनंतचतुर्दशी होऊन गेली होती. गणरायाला निरोप देऊन पुढल्या वर्षी लौकर येण्याची आठवण देऊन थकले भागलेले लोक घरी परतले होते. आणि पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी साऱ्या महाराष्ट्राच्या भूमीला भूकंपाचा धक्का बसला.
पुण्या-मुंबईतल्या लोकांना तो जाणवला तरी त्यांना तो प्राणघातक ठरला नाही. पण लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत भूकंपाचा भयंकर हादरा बसला. सुमारे ५० ते ६० लहानमोठी गावे या भागात अक्षरशः जमीनदोस्त झाली. दगड, विटा, माती, चुना, फुटलेली धाब्याची कौले यांचे प्रचंड ढीगच्या ढीग गावोगाव दिसू लागले.
पहाटेच्या गाढ झोपेत असणारी मुले, स्त्रिया, पुरुष, म्हातारे, कोतारे, पाळण्यातली बाळे व त्यांच्या आया, सारी त्या दगडविटांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. किल्लारी हे संपूर्ण गावच भूकंपात उद्ध्वस्त झाले. उमरगामध्ये अशी कित्येक पूर्ण गावेच्या गावे मुलामाणसांसकट गाडली गेली.
कित्येक कुटुंबातली तर म्हाताऱ्यांपासून तान्ह्या मुलांपर्यंत सर्वच माणसे भूकंपात मृत्युमुखी पडली. शोक करायला देखील कोणी राहिले नाही, अशा वेळी तिथे पाऊसही अगदी आकाश फाटल्याप्रमाणे जोरजोरात कोसळत होता.
आदल्या दिवसपर्यंत ज्या घरातून आनंदलहरी उमटत होत्या, तरुण-तरुणींचे हास्यकल्लोळ उसळत होते, लहान मुले जिथे हसतखेळत बागडत होती, आयुष्यभर खस्ता खाल्लेले म्हातारे जीव ज्या घरात विसावा घेत होते तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानभूमीची अवकळा आली.
दुसऱ्याला सावरायला वा त्याचे सांत्वन करायला घरात कुणीच राहिला नाही. घरच शिल्लक राहिले नाही. यापूर्वी कोयनानगरला भूकंप झाला होता तेव्हादेखील थोडीफार मनुष्यहानी झाली होती. पण ३० सप्टेंबरला झाली एवढी प्रचंड मनुष्यहानी महाराष्ट्रात काय पण जगातदेखील क्वचितच झाली असेल.
सरकारी गणनेनुसार सुमारे दहा हजाराच्या आसपास लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले. पण विविध वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार ही संख्या तीस हजारांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या भूकंपात केवळ माणसे गेली नाहीत. तर हजारो गुरे ढोरे, पशू मरण पावले.
भूकंपग्रस्त परिसरातली उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. लहान-मोठे कारखाने, उद्योग यांची वाताहत झाली. आणि सर्वात मोठी हानी मानसिक धक्क्याच्या स्वरूपातली झाली. भूकंपाच्या या प्रलयात जे जिवंत राहिले त्यांनी मृत्यूचे अकाळ विक्राळ स्वरूप पाहिले.
त्यामुळे त्यांची जगण्याची उमेदच नष्ट झाली. काही जणांना वेड लागायची वेळ आली तर काही जणांची क्रियाशक्तीच नष्ट झाली. घरादाराचे, शेती बागायतीचे व मुला-माणसांचे पुनर्वसन करता करता भूकंपात - बचावलेल्या लोकांच्या मनाची उभारी व उमेद जिवंत ठेवण्याचीही काळजी घेणे तेवढेच आवश्यक ठरले.
आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य आहे. कोणतीही अस्मानी सुलतानी आपत्ती कोसळली तर आत्मसंरक्षणासाठी सारा देश एक होतो. इथेही तेच झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातून मदतीचा प्रचंड ओघ वाहू लागला. फ्रान्स, अमेरिका यांची मदत पथकेही धावून आली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू केले. त्या आधी भारतीय लष्कराने ढिगारे उपसून शेकडो - हजारो प्रेते बाहेर काढली, तशी काही जिवंत मुले-माणसेदेखील मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढली. महाराष्ट्र शासनाबरोबर कित्येक सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात दिला.
विविध पक्षांच्या विद्यार्थिसंघटनांची सेवापथके तिथे कामाला लागली. काही बँकांनी व इतर वित्तसंस्थांनी काही गावे दत्तक घेतली आहेत. शिवसेनेने-देखील एक गाव दत्तक घेतले आहे. मृत्यूचे आकांडतांडव थांबले आहे. आता तिथे नव्या जीवनाची चैत्रपालवी बहरत आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद