लोकमान्य टिळक मराठी निबंध | Essay on Lokmanya Tilak in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध बघणार आहोत. "या न्यायालयाने काहीही निर्णय दिला असला तरी मी निरपराध आहे, अशी माझी खात्री आहे या न्यायालयापेक्षा सर्वोच्च न्यायालय आहे ईश्वराचे. त्या ईश्वराच्या न्यायालयात मी खात्रीने निर्दोषीच ठरेन."
भर न्यायालयात काढलेले हे उद्गार लोकमान्य टिळकांचे आहेत हे त्यांचे चरित्र माहीत असणाऱ्या मुलांना तत्काळ कळून येईल. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री. मोठे विद्वान होते. लोकमान्यांचे लहानपणचे शिक्षण सुरुवातीला त्यांच्या गावी व नंतर पुणे येथे झाले. त्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र होती.
'संत' हा शब्द त्यांनी सन्त असा लिहिला असता शिक्षकांनी तो चूक दिला, तेव्हा मुख्याध्यापकांकडे जाऊन टिळकांनी तक्रार केली आणि आपला शब्द कसा बरोबर आहे ते पटवून दिले. वर्गात मुलांनी शेंगांची टरफले टाकली असता टिळकांना छडी मारण्यासाठी मास्तर पुढे होताच त्यांनी सांगितले, “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी छडी घेणार नाही.”
निस्पृहपणा व बाणेदारपणा हे लोकमान्यांचे ठळक गुणविशेष सांगणाऱ्या लोकमान्यांच्या अशा अनेक आख्यायिका आहेत. वाचनाची त्यांना फार आवड होती. वयाच्या बाराव्या वर्षी अगदी अवघड गणित सोडविण्याची अट पुरी करून त्यांनी वडिलांजवळून बाणभट्टाचा 'कादंबरी' हा संस्कृत ग्रंथ वाचायला घेतला व वाचला.
त्यांचे उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये झाले. शरीरप्रकृती नीट नाही हे लक्षात येताच एक वर्ष अभ्यास बाजूला ठेवून त्यांनी आपले सारे लक्ष शरीरप्रकृती सुधारण्यांकडे घालविले. आगरकरांसारखा जिवलग स्नेही त्यांना इथेच लाभला. १८७६ साली बी.ए.व. १८७९ साली ते एल.एल.बी. परीक्षा पास झाले.
विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने त्यांनी 'केसरी मराठा संस्था' आणि 'चित्रशाळा प्रेस' यांची स्थापना केली. १८८१ मध्ये 'केसरी' सुरू झाला. त्यांचे संपादक होते आगरकर व 'मराठा' या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक होते टिळक.
पुढे आपापसांतील मतभेदांमुळे आगरकर 'केसरी' सोडून गेले. आणि त्या त्रयीनेच स्थापन केलेल्या 'न्यू इंग्लिश स्कूल' व 'फर्ग्युसन कॉलेज' यातून लोकमान्य टिळकांनी अंग काढून घेतले. १८८५ मध्ये राष्ट्रीय सभा (Congress) स्थापन झाल्यावर ते तिचे सभासद बनले.
पुढे काँग्रेसच्या राजकारणात लो. टिळकांचा 'जहाल' पक्ष, व नामदार गोखले यांचा 'मवाळ' पक्ष असे तट पडले. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच' हे टिळकांचे घोषवाक्य त्या काळात फार गाजले. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?'
या सारख्या जहाल अग्रलेखांनी लोकमान्यांनी भारतीय जनतेत ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोषाचे रान पेटवले. त्यासाठी त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला.अशा कारावासात टिळकांनी वाचन, मनन, चिंतन व लेखन केले. 'ओरायन,' -
आयर्याचे वेदांतील वसतिस्थान हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांची बुद्धीची झेप व विद्वत्तेची खोली दिसून येते. पुढे मंडालेच्या तुरुंगात त्यांनी 'गीतारहस्य' लिहिले.लोकजागृती व लोकसंग्रह यासाठी टिळकांनी शिवजयंती व गणपती यांचे सार्वजनिक उत्सव सुरू केले, तथापि केसरीतून त्यांनी लोकजागृती निर्माण केली. त्यातून ब्रिटिश साम्राज्याला हादरे
बसू लागले. यामुळेच चिरोलने त्यांना Father of Indian Unrest ही पदवी दिली.१ ऑगस्ट १९२० रोजी मुंबई येथे सरदारगृहात लोकमान्यांचे निधन झाले. त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी चौपाटीवर त्यांचा पुतळा उभारण्यात आला. तो पाहिल्यावर त्यांचे चरित्र आठवणारा प्रत्येकजण मनात म्हणतो तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हां घडो !मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद