माझे आजोबा मराठी निबंध Essay on My Grandfather in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. गोष्ट संपली आणि वर्गातल्या मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गोष्ट सर्वांनाच आवडलीहोती. घरी परतल्यावर टेबलावरच्या आजोबांच्या फोटोकडे पाहत मी मनाशी म्हटले- “आजोबा, ही सारी तुमची पुण्याई."
मी म्हटलं ते खरंच होतं. गोष्टींचा व गाण्यांचा वारसा मला आजोबांकडून मिळाला होता. रोज संध्याकाळी गणपतीच्या दर्शनासाठी आजोबा न चुकता जात आणि देवदर्शन झाल्यावर आमच्या घरी येत, मग मी त्यांना विचारायचो- "आजोबा, कालची गोष्ट ?"
"दम धर, दम खातो थोडा, मग सांगतो. काल कुठपर्यन्त आलो होतो...?' दमेकरी आजोबा धापा टाकीत विचारायचे. मग त्यांच्यापुढे गोष्टीचा धागा ठेवायचा...की गोष्ट पुढे चालू. रोज अर्धा अर्धा तास गोष्ट सांगायचे. चार चार सहा सहा दिवस गोष्ट चाले. गोष्ट सांगताना, मध्ये बोलून चालत नसे, मधून मधून हुंकार द्यावे लागत. "लक्षात आलं ? काय सांगितलं मी, सांग पाहू ?...' असे विचारल्यावर सांगता यायला पाहिजे; अशी शिस्त होती.
लहान मोठ्या शेकडो गोष्टींचा संग्रह आजोबांकडे होता. राजाराणीच्या गोष्टी, बिरबल, कालिदास यांच्या गोष्टी. चातुर्यकथा, इसापकथा, भूतकथा, परीकथा, पुराणकथा, रामायण, महाभारत कथा ! गोष्टींचे नमुने व तहा तरी किती ? पाच मिनिटांच्या गोष्टीपासून तो पाच पाच दिवसांच्या गोष्टीपर्यंत. मला प्रश्न पडे आजोबांना इतक्या गोष्टी कशा माहीत ? पुढे बऱ्याच वर्षानी मला त्याचा शोध लागला.
गोष्टींच्या सोन्याची खाण मला आजोबांच्या भल्यामोठ्या कपाटात सापडली. रामायण, महाभारतपासून कथासरित्सागर, विष्णुपुराणापर्यंत आणि अरेबियन नाइटस्पासून इसापनीती, हितोपदेशापर्यंत अनेक पुस्तकांनी ते कपाट ओतप्रोत भरले होते.
आजोबा नुसते गोष्टीवेल्हाळ नव्हते, कष्टाळू होते. ऐन सत्तरीतसुद्धा त्यांचा जोम कायम होता. करवतकाठी धोतर, बिनकॉलरचा सदरा, एखादे जाकीट व त्यावर तपकिरी काळसर कोट या कपड्यांत कधी विशेष बदल झाला नाही.
रंगाने आजोबा गोऱ्यात जमा होते. काळी टोपी घातल्यावर तिच्याकडेने दिसणारे पांढरेशुभ्र केस अधिकच खुलत. खोल गेलेल्या त्यांच्या डोळ्यांत गोष्ट सांगताना वेगळेच पाणी चमके. गालातल्या गालात हसायला लागले की बसके गाल वर आल्याचा भास होई. बोलणं हलक्या मध्यम आवाजात होतं.
चालणं धीमेपणाचं होतं. जेवणंही बेताचंच पण चवीचवीनं पदार्थ खायचे, खलबत्यात कुटलेलं तंबाखूमिश्रित पान त्यांना आवडायचं. पण तेही बेतानंच खायचे. दम्यापायी तंबाखूचं व्यसन आलं. एरव्ही त्यांचं सारं वागणं मध्य सप्तकामधलं होतं. पण त्यांचं खरं व्यसन म्हणजे जमीन खरेदीचं. जमीन म्हणजे सोनं. सारं धन जाईल पण जमीन जाणार नाही', अशी त्यांची श्रद्धा होती.
आजोबांचं घर म्हणजे संगीताचं माहेरघर होतं. गावात कोणीही गवय्या बजय्या आला तर त्याची पहिली बैठक आजोबांच्या माडीवर. सारे गावकरी त्या बैठकीला हजर. तो गवय्या खूष व्हायचा आधी आजोबांच्या तबलावादनाने...आणि आजोबांच्या धारदार आवाजाने तो मंत्रमुग्ध व्हायचा.
काळी पाचच्या सुरात सुरुवात करून तारसप्तकातल्या मध्यम पंचमापर्यंत त्यांचा आवाज टकळीच्या सुतासारखा सरळ सरसरत जाई व सापासारखा सळसळत खाली येई. त्यांच्या माडीवर दर गुरुवारी त्यांची भजने होत. ती शिरशिरी कानात अजून कायम आहे.
अर्धांगाचा तिसरा झटका आल्यावर आजोबा देवाघरी गेले तेव्हा लोकांनी त्यांना भजन करीत वाजत गाजत नेले. गाण्याभजनाचं वेड आणि गोष्टींची ओढ ही आजोबांकडून मला मिळालेली अमोल देणगी आहे. वाटून न आटणारी, सांगून न संपणारी ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद