ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध बघणार आहोत. दत्तात्रेयांची गोष्ट अशी सांगतात की त्यांनी २४ गुरू केले. सूर्य, चंद्र, पृथ्वी हे त्यांनी गुरू मानले. एवढेच नव्हे तर एका ठिकाणी एका शरकाला त्यांनी गुरू मानले.
तो शरकर्ता शर म्हणजे बाण तयार करीत होता. त्यावेळी आपल्या कामात तो इतका मग्न होता की राजाची स्वारी वाजत गाजत पुढच्या रस्त्यावरून गेली ती सुद्धा त्याला कळली नाही. अशी त्याची एकाग्रता!कोणतीही विद्या मिळवायची तर गुरू हवाच !
पण प्रत्येक वेळी गुरू कसा उपस्थित राहणार ? बरे एकदा सांर न शिकवून झाल्यावर कोणता गुरू पुन्हा पुन्हा तेच शिकवत राहील? मग ती उजळणी कशी व्हायची ? आपण जर एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलो तर हे गुरू काय दर वेळी आपल्या बरोबर येतील ?
होय ! येतील ! सर्वच गुरू नव्हे पण काही गुरू असे आहेत की ते तुम्ही न्याल तिथे येतील, सांगाल तिथे राहतील, म्हणाल ते शिकवतील, आणि म्हणाल तेवढ्या वेळा शिकवतील ! अगदी पुन्हा पुन्हा !!विस्मयचकित झालांत ना ! असे गुरू म्हणजे पुस्तके ! ग्रंथ हेच ते गुरू !
गुरुमुखातून मिळणारी विद्या कानांनी ऐकली, हृदयात साठविली तरी तिला अखेर मर्यादाच नाही का ! एक गुरू काय सांगेल व किती वेळा सांगेल ? किती ठिकाणी फिरेल ? म्हणूनच ग्रंथातून असे ज्ञान जर संग्रहित केलेले असेल तर ते केव्हाही कुठेही आणि कोणालाही हवे तेव्हा मिळू शकते.
ज्ञान, विज्ञान, विविध कला, साहित्य, इतिहास, भूगोल, थोर पुरुषांची चरित्रे, विविध सामाजिक व आर्थिक समस्या व त्यांची उकल या सर्वाचे ज्ञान देणारे गुरू म्हणजे ग्रंथ होत. ही पुस्तके केवळ शाळकरी मुलांना भाषा, गणित, शास्त्र व इतिहास शिकवितात असे नव्हे तर ,
मोठमोठ्या माणसांना विविध विषयांतली पूर्वीपासून तो अगदी आजपर्यंतची माहिती ते कळवितात, शाळकरी मुले परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके वाचतात, तर मोठी माणसे ज्ञानविज्ञान वगैरे माहिती मिळविण्यासाठी अगर देण्यासाठीही वाचतात.
चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व रामायण, महाभारतसारखे ग्रंथ पहा. भारतीय संस्कृतीच्या उगमापासून तिची प्रगती यात दिसते. कुठे शिकंदर, कुठे बुद्ध ? नेपोलियन बोनापार्ट कधी होऊन गेला आणि जॉर्ज वॉशिंग्टन व अब्राहम लिंकन आता किती जुने झाले ? पण इतिहासाच्या किंवा चरित्राच्या पुस्तकांत यांची अगदी चटकदार माहिती मिळेल !
चरित्रकोश, ज्ञानकोश, विश्वकोश हे ग्रंथ असे आहेत की गरज पडेल तेव्हाच मनुष्य ते उघडून पाहणार. एरव्ही तिकडे तोंडसुद्धा फिरविणार नाही तरी पण हे गुरू कधी रागावणार नाहीत ! तुम्ही विचाराल ती माहिती ते अवश्य व झटपट काढून देतील.
म्हणूनच ग्रंथालयांना साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांनी 'ज्ञानाची सदावर्ते' म्हटले आहे. सदावर्ते म्हणजे सतत चालू असणारी जेवणावळ. केव्हाही व कोणीही येवो, पाने मांडून तयार आहेत; तुम्ही येऊन बसा की वाढायला सुरुवात.
ग्रंथ माणसाशी असेच वागतात. ते सदा सज्ज असतात. वाचक येण्याची खोटी की खोलली ज्ञानाची पोतडी, पुरवली माहिती. राग नाही, कंटाळा नाही, आपपर भाव नाही. असे गुरू लाभणे कठीण. पण अर्थात त्या ग्रंथातील ज्ञान मिळविण्यासाठी मान मोडून बसले पाहिजे, मन लावून त्यांचे वाचन केले पाहिजे.
जे पुस्तकात आहे ते आपल्या नेत्रांनी आपल्या चित्तात साठविले पाहिजे. गुरू देणारे आहेत पण घेणाऱ्यांनी घेतले पाहिजे ! नाहीतर - नाहीतर असे होईल....
पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनम् ।
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम् ।।