शाळा बंद झाल्या तर निबंध मराठी If Schools Are Closed Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या शाळेचे प्रवेशद्वार जवळ येताच माझी पावले थबकली. दाराशी फळ्यावर सूचना लिहिली होती "गेले दोन, तीन दिवस गिरगावात पाणी फार कमी येत असल्याने शाळेच्या टाक्या पूर्ण रिकाम्या झाल्या आहेत,
म्हणून शाळा आज व उद्या बंद राहील." सूचना वाचून वाईट नाही वाटलं. आम्हा मुलांना आनंदच झाला. पुढे परत फिरताना आणखी दोन, तीन शाळा याच कारणामुळे बंद पडल्याचे समजले. मग मनात विचार आला. शाळा अशाच कायमच्या बंद पडल्या तर
तर काय मज्जा येईल, सगळ्या मुलांना खूप आनंद होईल. तो अभ्यास नको, तो गृहपाठ नको आणि तो झाला नाही म्हणून शिक्षा नको. सकाळी उठून अभ्यासाला बसावे लागणार नाही. आई-वडिलांची भुणभुण नाही, मास्तरांची पिरपिर नाही.
आणि ती कैदाशीण परीक्षा तिचं तर नावसुद्धा उरणार नाही. मग नापास होण्याची भीती उरणार नाही. - बाबांचा मार बसणार नाही. शेजाऱ्यापाजाऱ्यांचे कुजके-नासके शेरेताशेरे ऐकावे लागणार नाहीत. आईचा चेहरा कधी यामुळे रडवेला होणार नाही.
शाळा बंद पडल्यावर करणार काय म्हणजे ? अहाऽऽरे ! काय पण प्रश्न ? काय करणार? उत्तर एकच ! 'खे...ळ...णा...र...' क्रिकेट खेळणार ! सकाळ, संध्याकाळ क्रिकेट खेळणार! गल्लीबोळातून आणि मैदानावर जाऊन क्रिकेट खेळणार ! रेडिओवर, ट्रान्झिस्टरवर क्रिकेची
कॉमेंट्री ऐकणार. टी. व्ही. वर क्रिकेट पाहणार. पिक्चर पाहणार. दुपारच्या वेळी घरच्या शनी जर क्रिकेट खेळू दिले नाही किंवा वेळी अवेळी येणाऱ्या पावसाने विचका केला तर-पत्ते खेळणार-कॅरम खेळणार-बुद्धिबळे खेळणार आणि आमच्या खेळण्यांवरून मोठ्या माणसांनी कटकट केली तर
मग गोष्टींची पुस्तके वाचणार-परीकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा...वाचणार. शब्दकोडी सोडविणार, पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार...आणि रेडिओ, टी.व्ही. दुरुस्ती करायला शिकणार...अर्थात ९ वी पास झाल्यावर-कारण त्याशिवाय मला त्यात प्रवेश कसा मिळेल? अरेच्या ! पण मी ९ वी पास कसा होणार ?...
शाळा बंद पडल्या तर-पुढच्या वर्गात कसा जाणार ? मग प्रगती कशी होणार ? शाळा बंद पडल्यावर आमचे सर काय करणार ? त्यांच्या नोकऱ्या जातील, बेकार होणार ते ! पाठ्यपुस्तके, गाईडस् व स्वाध्याय पुस्तिका छापणारे-लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते सर्वांचेच धंदे बंद पडतील ना ! आणि शाळेच्या इमारती एक तर ओस पडतील नाही तर त्यांची रुग्णालये बनतील, किंवा लॉजिंग बोर्डिंग तयार होतील!
मग मी टीव्ही दुरुस्ती कशी शिकणार ? कॉम्प्युटर सायन्स कसे शिकणार ? आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणत-एकविसाव्या शतकाच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची आहे. आम्ही मुले शाळेत न जाता आहे तिथेच जेठा मारून बसलो तर भावी काळचे डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, कवी, कलावंत कसे निर्माण होणार ?...
शाळा बंद तर तेही बंद...सर्व काही बंद ! म्हणूनच मला आता वाटतं शाळा बंद पडल्या तर... तर काय, वाटेल तेवढे भगीरथ प्रयत्न करून शाळा सुरू केल्या पाहिजेत ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद