जीवन आहे प्रवास सुंदर मराठी निबंध | JEEVAN AAHE PRAVAS SUNADHAR ESSAY MARATHI

 जीवन आहे प्रवास सुंदर मराठी निबंध | JEEVAN AAHE PRAVAS SUNADHAR ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जीवन आहे प्रवास सुंदर मराठी निबंध बघणार आहोत.  जीवन! नेमकं काय हो जीवन म्हणजे? 'दोन घडीचा डाव' की 'ऊनपावसाचा खेळ' ? 'बंदिवास', 'तीन अंकी नाटक' का 'जरतारी वस्त्र'? कोणी म्हणतं, 'जीवन चलनेका नाम' (सतत कार्यरत राहणं म्हणजे जीवन) तर एखाद्याला साक्षात्कार होतो, 'जिंदगी एक सफर है सुहाना ।'


मलाही जीवन हा एक 'सुंदर प्रवास' वाटतो. तो सुंदर होणं मात्र केवळ माझ्या नि माझ्याच हातात आहे. तो सुंदर झाल्याचं श्रेय मी दुसऱ्यांना देऊ शकेन पण तो खडतर झाल्याचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडता येणार नाही. कारण त्याला जबाबदार मीच असणार आहे. माझं जीवन 'सुहाना सफर' कसं करता येईल?


कोणी प्रवासाला निघालं की आपण सहजच म्हणतो 'हॅपी जर्नी' नगराच्या सीमेवर 'तुमचा प्रवास सुखाचा होओ' अशी पाटीही झळकत असते. पण निव्वळ शुभेच्छांनी कोणाचा प्रवास सुखाचा झालाय? नाही. त्यासाठी काळजीपूर्वक, जय्यत तयारी करावी लागते. काही त्रुटी राहिली की गोंधळ उडालाच समजा.


प्रवासाला निघण्यापूर्वी गन्तव्यस्थान (पोचण्याचं ठिकाण) आम्हाला ठाऊक असतं. थोडं समजू उमजू लागल्यावर मलाही माझं जीवितध्येय निश्चित करायचं आहे. मी एक सर्वोत्तम, आदर्श माणूस होणार आहे. 'नराचा नारायण' व्हायचं आहे मला. । स्टेशनवर पोचायला उशीर केला तर गाडी माझ्यासाठी क्षणभरही थांबणार नाही काळही कोणासाठी थांबत नसतो.


तेव्हा चकाट्या पिटणे, निंदानालस्ती, भांडणं, टवाळक्या करणे यात आयुष्य फुकट दवडणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे. एकट्याने प्रवास करण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मुळीच मज्जा येणार नाही. मी संपादन केलेली विद्या जीवनप्रवासात मला नक्कीच साथ देईल. (विद्या मित्रं प्रवासेषु ।) तिकीटही जपून ठेवायला हवं. 


नाहीतर सारंच मुसळ केरात! टी.सी. फैलावर घेईल. भुर्दंड भरावा लागेल तो वेगळाच! मानवदेह देताना ईश्वराने प्रथम श्रेणीचं (ए.सी.चं) तिकीट काढून दिलंय. त्या देहाचं सार्थक करणं माझ्या हाती आहे. अन्यथा वृद्धपणी, अंतकाळी पश्चात्ताप करण्यावाचून हातात काहीच उरणार नाही.


प्रवासात पैशाशिवाय पावलोपावली नडतं, सद्गुणसंपत्तीशिवाय आयुष्याला काय किंमत? कवडीमोल होऊन जातं ते. उत्तमोत्तम गुण एकाएकी अंगी बाणणार नाहीत इच्छेला प्रयत्नांची जोड द्यावी लागणार. निरनिराळे छंद, कला, 'टाइमपास' म्हणून कामी येतील नाहीतर प्रवास रटाळ व्हायची शक्यता. वॉटर बॅग घ्यायची राहिली की प्रवासभर पाणी, पाणी करावं लागणार. जीवनातही हवा भावनेचा ओलावा. 


त्याविना जीवन हे जीवन कसले? रुक्ष, ओसाड, विराण वाळवंटच. भावनेचा ओलावा वाळवंटातही (कसोटीच्या क्षणी) जपणार, ओअॅसिस (मरुद्यान) सारखा. हृदय प्रत्येकालाच असतं पण मला 'सहृदय' व्हायचंय, खऱ्या अर्थानं. _ 'भूक असावी, शिदोरीही असावी' सुसंस्कारांची शिदोरी भरपूर असली की काही चिंताच नको. 


गाडी कितीही लेट झाली (दीर्घायुष्य लाभलं) तरी पुरून उरेल. गरजूंनाही मुक्त हाताने देता येईल. प्रवासात खिसेकापू, लुटारू यापासून सावध राहावं लागतं. जीवनातही माझं सुख, समाधान, आनंद हिरावून घेण्यासाठी टपून बसलेल्या दुर्जनांशी गाठ पडणारच! 


त्यासाठी 'अखंड सावधान असावे' हा समर्थांचा सल्ला माझं संरक्षककवच असेल. सामान खूप जास्त झालं की हमाल करणं आलं. जीवनप्रवासाचं मात्र उलटंच! अनुभवांचं गाठोडं जितकं मोठं तितका प्रवास आनंददायी, सुसह्य. त्या गाठोड्याचं ओझं लीलया पेलता येतं. हमाल करण्याची मुळीच गरज नाही.


अशा जय्यत तयारीनिशी प्रवास सुरू करा. जीवनात आनंदाची लयलूट होईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज आहे? हा आनंदयात्री गुणगुणत असेल, स्वच्छंदपणे गात असेल, 'जिंदगी एक सफर है सुहाना' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद