खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache mahatva nibandh in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळाचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.काही वर्षांपूर्वीची गोष्ट ! भारतात ९ वी एशियाड मैदानी क्रीडा स्पर्धा घेतली गेली. आशिया खंडातील कितीतरी देशांनी यात भाग घेतला होता. 'एशियाड' मुळे अनेक लहान-मोठे बदल झाले होते. भारतात रंगीत टी.व्ही. आणण्याची
धडपड त्यासाठीच ! सा-या जगात भारताचे नाव 'एशियाड' मुळे होणार होते. नंतर , आलीकडच्या काळात पुण्यालादेखील क्रीडानगरी उभी राहिली होती. ह्या सर्व बातम्या वाचताना अगर ऐकताना किंवा दूरदर्शनवर खेळ पाहताना असंख्य मुलांच्या मनात एक विचार येई. खेळांचे जीवनामध्ये स्थान इतके महत्त्वाचे आहे का ? आणि तसे असेल तर आम्ही सकाळ-संध्याकाळ खेळतो तेव्हा आपले आईवडील आपल्यावर का रागावतात ? का संतापतात ते एवढे ! खेळ वाईट आहे का ?
'खेळणे हा मुलांचा सहजस्वभाव आहे. खेळकर मूल सर्वानाच आवडते, पण त्याच मुलाने मोठेपणी खेळत बसणे आवडत नाही. त्याचा अर्थ हाच की, खेळ आवडत नाहीत असे नव्हे तर कामधंदा, उद्योग, अभ्यास सोडून खेळत बसणे मोठ्या माणसांना पसंत पडत नाही. 'खेळू नका' असे मोठी माणसे सांगत नाहीत. तर 'दिवस रात्र नुसतेच खेळत बसू नका' असे सांगतात.
मैदानी खेळ हा व्यायामाचा चांगला प्रकार आहे. कबड्डी, लंगडी यासारखे देशी खेळ घ्या किंवा क्रिकेट, हॉकी, पोलो, फुटबॉल, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन वगैरे खेळ घ्या, या खेळांमुळे मुलांचे शरीर सुदृढ व कणखर बनते. मुलांचे मनोरंजन तर होतेच, पण खिलाडूवृत्ती अंगी बाणते.
'पराभव' पचविल्याशिवाय 'यश' प्राप्त होत नाही, आणि जरी यश लाभले तरी पराभूत झालेल्याचीही लायकी कमी मानायची नाही ही शिकवण मिळते. सेऊल एशियाडमध्ये धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवूनसुद्धा धावपट्टी बदलल्यामुळे शायनीचे सुवर्ण पदक गेले. पण तिने आपली चूक खिलाडूपणे मान्य केली !
बुद्धिबळे, रमी, ब्रिज, बिझिक, या सारखे बैठे खेळसुद्धा मुलांमध्ये वा मोठ्या माणसांमध्ये फार प्रिय असतात. त्यातही अनेकजण कित्येक प्रकारचे उच्चांक गाठतात. मैदानी खेळ असो अगर बैठे खेळ असोत, त्यातही अनेकविध कौशल्ये हस्तगत करणे व त्यावर स्वतःचे प्रभुत्व स्थापन करणे यातला आनंद काही वेगळाच आहे.
अलीकडे निरनिराळ्या सरकारी, निमसरकारी अगर खाजगी संस्थांमध्ये नोकरी देताना या विविध खेळांत मिळविलेल्या प्रावीण्याचाही विचार करतात. त्या संस्थात काम करणाऱ्यांचे स्पोर्ट्स क्लब असतात. त्यांचे सामने होतात. एकमेकांबरोबर कसोटी सामने खेळले जातात.
म्हणून अशा प्रकारच्या खेळातले प्रावीण्य हे 'अधिकस्य अधिक फलम्' विशेष फायदेशीर ठरते यात संदेह नाही. (म्हणूनच भारताचा विश्वनाथ आनंद बुद्धिवळात रशियाच्या कॉस्थारॉव्हशी बरोबरी करतो.) हे सगळे मान्य करून सुद्धा हा प्रश्न उरतोच की या खेळांसाठी आपला आयुष्यातला एकूण किती वेळ द्यायचा ? मोठे मोठे खेळाडू....क्रिकेटपटू अगर हॉकीपटू यांच्यासारख्यांची गोष्ट सोडा. कारण खेळ हा त्यांचा व्यवसाय असतो.
'गावस्कर' क्रिकेट खेळतो किंवा दुसरा कोणी बॅडमिंटन खेळतो, म्हणून मी तसाच आणि तेवढाच वेळ खेळणार असे शाळा-कॉलेजमधल्या विद्यार्थ्याने अगर ऑफिसमध्ये काम करणाऱ्याने म्हणून चालणार नाही. आपला अभ्यास, आपली इतर कामे, आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून खेळ खेळले पाहिजेत. अशी काळजी घेतली नाही तर आपल्या आयुष्याचा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद