लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची मराठी निबंध | Lokamanyta Hi Shakti LOknaykanchi Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची मराठी निबंध बघणार आहोत. कविराज ग. दि. माडगूळकर यांच्या 'गीत रामायण' मधील एका गीतातील ही पंक्ती आहे. रावणाच्या अशोकवनात बंदिवासात राहिलेल्या सीतेला मुक्त केल्यावर राम सीतेला जशीच्या तशी स्वीकारायला नकार देतो.
मग सीता स्वतः अग्निदिव्य करते. अग्नीत सीताशुद्धी झाल्यावर राम म्हणतो-मला हिचे शुद्ध चारित्र्य ठाऊक नव्हते का ? ते माहीत असूनही मी हे कार्य केले. का ? मला लोकक्षोभ होऊ द्यायचा नव्हता. सती जानकीची शुद्धी लोकसाक्षीने करायची होती. कारण लोकमान्यता हीच लोकनायकांची शक्ती असते.
लोकांचा नेता कसा असावा ? लोकांच्या विचारांजी बूज राखणारा, त्यांचे मनोगत समजून घेणारा, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारा, त्यांच्यात रमणारा व त्यांना रमविणारा ! पूर्वीच्या राजेशाहीच्या काळातसुद्धा भवभूतीच्या रामाने उद्गार काढले
स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि।
आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा ॥
लोकांच्या इच्छेसाठी मी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार आहे ही रामाची प्रतिज्ञा होती कारण लोकांचे प्रेम, त्यांचा पाठिंबा, त्यांचा विश्वास हेच नेत्याचे सामर्थ्य असते. रामाने जे ओळखले ते आजच्या लोकशाहीच्या युगात विशेष मोलाचे ठरते.
लोकानुरंजनातून लोकशिक्षण हे ध्येय नेत्यांनी नित्य डोळ्यांसमोर ठेवले पाहजे. लोकांना जी गोष्ट सांगावयाची, अगर त्यांच्याकडून जी गोष्ट करवून घ्यायची ती त्याच्या कलाकलाने वागून त्यांच्या गळी उतरवली पाहिजे. त्यांचा विरोध होत असेल तर त्या विरोधाची धार बोथट केली पाहिजे.
युक्ती-प्रयुक्तीने त्यांचा विरोध नाहीसा केला पाहिजे. लोकांत मिळून मिसळून कधी कधी वेळप्रसंगी त्यांच्या पातळीवर उतरून आपले ध्येय साध्य केले पाहिजे. समाजमन हे बालमनासारखे असते. त्याला थापट द्यायची तर तीदेखील थोपटत थोपटत दिली पाहिजे.
टिळकांनी ही गोष्ट ओळखली म्हणूनच ते लोकमान्य झाले. गांधीजींनी समाजाची नाडी पकडली म्हणून ते महात्मा ठरले. पंडित नेहरूंनी लोकशक्तीची उपासना केली म्हणून ते लोकांचे लाडके 'जवाहरलाल' बनले. . आणि शिवाजीने तरी दुसरे काय केले ? मर्द मराठमोळ्या मावळ्यांच्या अंतरीची वेदना ओळखली.
त्यांच्यात जागृती निर्माण केली, त्यांचा स्वाभिमान चेतवला आणि त्यातून प्रचंड शिवशक्ती निर्माण केली. लोकांना बरोबर घेऊनच पुढे जायचे असते हे त्याने ओळखले होते. त्यालाच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला समर्थांनी ही गोष्ट वेगळ्या शब्दांत सांगितली आहे.
राखावी बहुतांची अंतरे ।
भाग्य येते तदनंतरे ।।
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद