मला कोण व्हावेसे वाटते मराठी निबंध | Mala kon vhavese vatate marathi nibandh

   मला कोण व्हावेसे वाटते मराठी निबंध | Mala kon vhavese vatate marathi nibandh

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला कोण व्हावेसे वाटते मराठी निबंध बघणार आहोत.  लहानपणी मी सारखा आजारी पडायचो. डॉक्टर घरी येऊन रोज इंजेक्शने देत असततेव्हा मला वाटायचे मोठेपणी आपण डॉक्टर व्हायचे आणि आपले आताचे डॉक्टर व आईवडील यांना रोज दोन दोन इंजेक्शने द्यायची !


लहानपणी वाटतं ते खरं होतं थोडंच ? इंग्रजीत म्हण आहे. There is many a slip between the cup and the lip. मनात असते एक, होते भलतेच ! वाढत्या वयाबरोबर माइया इच्छाही बदलत गेल्या. मारकुट्या मुलांना मारण्यासाठी हेडमास्तर व्हावेसे वाटले. 


हॉटेलात आईस्क्रीम खाताना हॉटेलवाला व्हावंसं वाटलं. टॅक्सीतून फिरताना टॅक्सी ड्रायव्हर व्हावंसं वाटलं. एवढंच काय, पण एकदा चांगला चित्रपट पाहताना असा पिक्चर रोज पाहायला मिळावा यासाठी सिनेमा थिएटरचा डोअर कीपर व्हावं असंही वाटलं ! (रोज फुकट दोन तीन वेळा सिनेमा पाहायला मिळणार...किती मज्जा !)


त्या सगळ्या इच्छा, आशा तशा कालांतराने वाऱ्याबरोबर उडून गेल्या. आता काय वाटते ? बरेच वाटते ! कधी वाटते वकील व्हावे. पांढरी पँट काळा कोट घालून कोर्ट दणाणून सोडावे. पैसा दाबून कमवावा, लोकांनाही संकटातून सोडवावे ! कघी वाटते वर्तमानपत्राचे संपादक व्हावे. 


सनसनाटी बातम्या छापाव्यात. प्रतिपक्षाला पळता भुई थोडी करून टाकावी ! पण नंतर वाटते-वकील संपादक हे ढोंगी बनेल माणसाचे काम ? तिथे पक्का मुरलेला माणूस हवा ! आपले ते काम नव्हे ! बरे, गणित आणि शास्त्र या विषयात लंगडी घालत तोल सांभाळणाऱ्याला डॉक्टर, इंजिनियर हे मार्ग बंदच !


पण असल्या व्यवसायांपेक्षाही मनाची हौस ही निराळीच गोष्ट असते. व्यवसाय गरजेनुसार जमेल तो करावा. पण हौस...आवड ! मला लेखनाची आवड आहे. हरिभाऊ आपटे यांच्या 'उषःकाल' कादंबरीपासून तो पु.ल. देशपांडे यांच्या 'गोळाबेरीज' पर्यंत अनेक पुस्तके मी रात्रीचा दिवस करून वाचली आहेत. लेखक व्हावे असे मनापासून वाटते.


लेखक म्हणजे मण मण वजनाचे टनावारी लेखन करणारा, वृत्तपत्रीय सदरलेखक नव्हे. लोकांच्या मनाला क्षणभर रिझवणारी' माझी लेखणी त्यांच्या मनात 'कण भर रुजणारी असावी, एवढीच माझी साधी इच्छा आहे. अमुक एक प्रकारचे पेटंट घेतल्यासारखे आपण कोणी विशेषज्ञ व्हावे असे मला वाटत नाही. 


'महाराष्ट्राचे अजोड कादंबरीकार' "मराठीचे थोर समीक्षक' असल्या पदव्यांचाही मोह मला नाही ! आपल्या लिखाणाने वाचकांना समाधान मिळावे, त्यांचे मन प्रफुल्लित व्हावे, हृदय भरून यावे, असे मला वाटते. आपल्या लेखनात सौन्दर्य व लालित्य असावे आणि आपले विचार सबळ साक्षी-पुराव्याच्या आधाराने निर्भीडपणे लोकांसमोर मांडण्याचे सामर्थ्य आपल्या लेखनात असावे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.


समाजाच्या रक्ताशी निगडीत असलेल्या प्रश्नावर जे पोटतिडिकेने लिहितात ते रक्ताने लिहिणारे लेखक, लेखन हाच व्यवसाय असल्यामुळे लोकानुरंजनातून लोकशिक्षण देण्यासाठी जे घाम गाळणात-ते निढळांच्या घामाने लिहिणारे लेखक, आणि माझ्यासारखे बाकीचे ? ते सारे शाईने लिहिणारे लेखक ! माझे कागद व पेन घेऊन या शेवटच्या रांगेत सध्या मी उभा आहे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद