मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar Nibandh

 मला पंख असते तर मराठी निबंध | Mala Pankh Aste Tar  Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला पंख असते तर  मराठी निबंध बघणार आहोत. असा संताप आला त्या कबुतराचा मला ! वाटले, त्याच्या पाठोपाठ आपणही उडत जावे आणि गॅलरीतले कपडे रंगवणा-या त्या कबुतराला पकडून खाली खेचून आणावे. 


पण कसे शक्य आहे ? माणसाला उडता येतेय कुठे ? कबुतरे, कोंबड्या, चिमण्यासुद्धा उडतात पण माणसाला ते जमत नाही, कारण माणसाला पंख नाहीत. जर असते तर खरंच ! माणसाला पंख असते तर काय मजा आली असती. पक्ष्यांप्रमाणे रोज सकाळी माणसेही आकाशात पंख फडफडवीत उड्डाण करू लागली असती. 


माणसांची भरारी गरुडासारखी किंवा त्यांच्यापेक्षा कदाचित उंचावर गेली असती. माणसे दमली तर घेताहेत ढगांवर थोडा वेळ विसावा. बरे ! झोपेत ढगांवरून खाली कोसळले तरी पुन्हा पंख फडफडवीत वर हजर ! पंख असल्यावर मग लिफ्टची गरज काय ? आणि मोटारी, आगगाड्या, विमाने हेलिकॉप्टर्स कशाला पाहिजेत ? 


लिफ्ट नसेल तर पाचव्या, सहाव्या मजल्यावर चढून जाताना जीव असा मेटाकुटीला येतो म्हणता ! पण माणसाला पंख असते तर-पाचव्या काय पन्नासाव्या मजल्यावर यायला सांगा. पंख फडफडवीत वाटेल त्या मजल्यावर हजर ! मुंबईहून दिल्लीला जायचेय ? 


ती ट्रेन नको अन् ते विमान नको ! रिझर्व्हेशन ? गरज नाही. पंख फडफडवीत, मध्ये हवी तिथे हवी तितकी विश्रांती घेत दिल्लीला हजर ! एक विचार येतो. सकाळ-संध्याकाळ जसे लोक समुद्रावर, तळ्यावर फिरायला जातात तशी पंखवाली माणसे आकाशात फिरायला गेली असती. 


आकाशात माणसांची नुसती तोबा गर्दी ! गरूड, घार, गिधाड, वटवाघूळ, घुबड, याचबरोबर कावळा, बगळा, कबूतर, हंस यांच्या सहवासात माणूस त्यांच्याबरोबर अंतराळात युद्धेही करतोय, असे दृश्य दिसले असते. आणि मग त्याचबरोबर त-हेत-हेचे ते पक्षी व त-हेत-हेची पंखवाली माणसे यांच्या आवाजांनी आकाश थरारून गेले असते. पण....


माणसाला पंख असते तर पंख नसलेल्या आजच्या मानवाने आज जी प्रचंड झेप अंतरिक्षात घेतली आहे तशी ती घेतली असती का ? माणसाला पंख नाहीत म्हणून तर लिफ्ट, मोटारी, आगगाड्या, विमाने, जेट, अग्नियाने, अंतराळयाने यांचे शोध लागले. आजचा मानव चंद्रावर उतरला. अंतराळातल्या तरंगत्या प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करून परत आला ते कशामुळे ? 


माणसाला पंख नाहीत म्हणूनच. माणसाला पंख नाहीत, त्याला उडता येत नाही हा मानवाला मिळालेला शाप नसून वर आहे. कारण पंख नसलेल्या मानवाने संशोधन करून अंतराळात एवढी मोठी झेप घेतली आहे की पंख असणा-या सर्व पक्ष्यांचे बळ एकवटले तरी ते माणसाच्या पासंगालाही पुरणार नाही.


गरज ही शोधाची जननी म्हणतात. माणसाला पंख असते तर गरजच संपली असती. प्रगती संपली असती. त्याची विचारशक्ती लुळी-पांगळी झाली असती. कल्पनाशक्ती कुजली असती. देहाने भरा-या घेणा-या माणसाच्या मनाच्या भरा-या थांबल्या असत्या. 

माणसाला पंख. असते तर त्याच्या मनाचे ‘प्रज्ञा' व 'प्रतिभा' हे पंख कापले गेले असते. माणसाच्या मनाच्या आताच्या या दोन पंखांचे सामर्थ्य कोणत्याही पक्ष्याच्या पंखांपेक्षा हजारो पटीने अधिक आहे. म्हणूनच कवी पाडगांवकर म्हणतात माग हवे जे ते परंतु माझे पंख मागू नकोमित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद