मातीवर पडणे एक नवा थर अंती मराठी निबंध | MATI PADNE AK NVA THAR ANTI MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मातीवर पडणे एक नवा थर अंती मराठी निबंध बघणार आहोत. 'मातीवर पडणे एक नवा थर अंती' हे कुसुमाग्रजांच्या एका अर्थपूर्ण कवितेचे पालुपद आहे. एवढा क्रांतिकारी व प्रयत्नवादी कवी मराठीत विरळा. असे असता त्यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीच्या मुखातून हे उद्गार आले ते जीवनाच्या तितक्याच महत्त्वपूर्ण अशा दुसऱ्या बाजूची जाणीव झाली म्हणूनच.
मानवाने कितीही मोठे पराक्रम केले तरी अखेर मानव अपूर्ण आहे. जन्म आणि मृत्यू या घटना जोपर्यंत माणसाच्या स्वाधीन नाहीत तोपर्यंत माणसाचे सारे भव्य पराक्रम, कर्तृत्व, दिग्विजय त्याच्या सर्जनशक्तीचे सारे आविष्कार, यांची अखेरची गती काय ?...मातीवर पडणे एक नवा थर अंती.
या विश्वातील प्रत्येक चराचर वस्तू नाशिवंत आहे. वृक्ष, डोंगर, पर्वत, प्रासाद, स्तंभ यांचे अखेर काय हाणार आहे ? सिंधू, नाईल, मिसिसिपी, होअँगहो या नद्यांच्या काठांवर दोनचार हजार वर्षांपूर्वी विस्तारलेल्या संस्कृतीचे काय झाले ? चंद्रगुप्त, अशोक, हर्ष, शिवाजी, संभाजी यांच्यासकट टिळक, गांधी, नेहरूंपर्यंत हजारो कर्तृत्ववान महापुरूष आले व गेले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाचे लेख काळाच्या पडद्यावर लिहून ठेवले.
पण अखेर त्यांच्या मागाहून येणाऱ्या माणसांनी त्यांच्या कार्यावर बोळा फिरविला. अनभिज्ञ अनुयायांमुळे असो, अगर त्यांच्यानंतर येणाऱ्या अन्य महापुरुषांच्या कर्तृत्वाच्या प्रभावामुळे असो, पुरुषाच्या मागोमाग त्यांचे तत्त्वज्ञानही कालांतराने जाते.
पुढे कित्येक वर्षांनी दुसऱ्या एखाद्या समविचारी तत्त्वज्ञानाचे बोट धरून ते तत्त्वज्ञान काही काळापुरते परत येते...आणि कालांतराने परत निघून जाते. आणि अगदी अखेरीस कटू सत्य सांगणे भागच आहे. की हजार दोन हजार वर्षांनंतर कितीही कर्तृत्वान व श्रेष्ठ युगपुरुष असला तरी तो विस्मृतीच्या गर्तेत कायमचा लुप्त होण्याची शक्यता असते.
उमललेले फूल कोमेजणारच. पानाफुलांनी बहरलेला वृक्ष अखेर उन्मळून पडायचाच. जीवनाचा मार्गच मुळी मरणाच्या काळडोहाकडे जातो. तेथे अमरत्वाचे नाव कुठे आढळणार ?... म्हणूनच कवी ग. दि. माडगूळकर म्हणतात
'वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा !"
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद