माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध | Maza avadta lekhak pu la deshpande nibandh in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध बघणार आहोत. गुलाब, जाई, जुई, मोगरा, पारिजातक आदी नानाविध फुलांनी बहरलेल्या बागेत विहार करणाऱ्या बालिकेला जर विचारले, 'तुला यातले कोणते फूल आवडते ?' तर ती काय उत्तर देईल ? सारीच फुले आवडती.
माझे तसेच झालेय. लेखकांच्या बाबतीत फडके, खांडेकर, अत्रे, काणेकर, पु. ल. देशपांडे हे सारे माझे आवडते लेखक आहेत. पु.ल. देशपांडे हे 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' म्हणून प्रसिद्ध आहेत.
'नस्ती उठाठेव', 'खोगीर भरती', 'बटाट्याची चाळ', 'असा मी, असा मी' या सारखे पु. लं. चे लेखसंग्रह, 'अपूर्वाई, 'पूर्वरंग', 'जावे त्यांच्या देशा', 'वंगचित्रे' यासारखी प्रवासवर्णने, 'अंमलदार', 'तुझे आहे तुजपाशी', 'ती फुलराणी', यासारखी नाटके,...या साऱ्या पु.लं. च्या पुस्तकांचे मी केवळ वाचन केलेले नाही, तर त्यांची पारायणे केलेली आहेत.
याचे कारण पु.लं. चे सुरेल व दर्जेदार लेखन. पु. लं. चे लेखन विनोदी आहे, पण ‘इनोदी' नाही. त्यांच्या विनोदाला बुद्धीची झळाळी आहे, तसा भावनेचा ओलावा आहे. मर्मभेदाची धार आहे, तशी कारुण्याची झालर आहे. तो खोचक आहे पण बोचक नाही. सूचक आहे, पण दुर्बोध नाही.
साहित्यातील अनेकविध संदर्भानी तो सजलेला आहे, पण अश्लील कोट्यांनी सुजलेला नाही. 'तुमचा खांदा गेला का ?...मग तुम्हांला माझा खांदा देऊ का ?, 'सूत जमवायच्या दिवसात सूत कातीत काय बसलास ?' 'तबलजी ना तुम्ही, मग साधी थाप मारता येत नाही तुम्हांला ?'
यासारखे शाब्दिक विनोद तर पु. लं. च्या लेखनात जागोजाग आढळतातच, पण 'अंतू बर्वा', 'नारायण', 'गजा खोत' या सारख्या व्यक्तिचित्रांमधून किंवा 'अपूर्वाई' सारख्या प्रवासवर्णनामधून त्यांच्या विनोदाचे अनेक पैलू दिसून येतात. तुकारामाचे सहज बोलणे जसे हितोपदेश होते, तसे पु. लं. चे सहजलेखन काव्यात्मक व विनोदमधुर आहे.
त्यांच्या सर्व लिखाणाच्या मुळाशी जीवनाचे मार्मिक निरीक्षण, मनन व चिंतन आहे. (म्हणूनच त्यांच्या 'बटाट्याची चाळ', या एकपात्री कार्यक्रमातील- 'एक चिन्तन' हा भाग खूप गाजला.) व्यापक सहानुभूती, अभिजात रसिकता आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी विलक्षण आदर हा त्यांच्या लेखनाचा मूलाधार आहे.
साहित्याइतकेच किंबहुना थोडे अधिकच, पु.लं. चे संगीतावर प्रेम आहे. त्यांच्या नाटकात, लेखनात व भाषणात, संगीताचे असंख्य संदर्भ ते अतिशय मार्मिकपणे देत असतात. उत्कृष्ट मी आणि माझ्या गोष्टी विनोदी नट म्हणून त्यांनी मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवली आहे आणि मार्मिक विनोदी वक्ता म्हणून तर ते त्यांच्या काळात बहुधा एकमेवाद्वितीयच ठरतील.
हार्मोनियम आणि कथाकथनाच्या त्यांच्या ध्वनिफिती निघाल्या आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या काही चित्रफितीही तयार झाल्या आहेत. 'कवित्व', 'रसिकत्व', व परतत्त्वस्पर्श यांच्या आंतरिक अपूर्व तरंगांनी शिंपलेले पु.लं. चे सारे लेखन म्हणजे गंधमधुर फुलझाडांचे नंदनवनच आहे म्हणा ना ! त्यांच्या कोणत्याही पुस्तकाचे कोणतेही पान उघडून पहा. पानोपानी आली फुले', असाच प्रत्यय तुम्हांला येईल. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद