माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak Essay in Marathi

 माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी. तिथे विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठा पुतळा आहे. कुणाचा ? गांधींचा ? नेहरूंचा ? ...नाही ! 


तो आहे महात्मा जोतिबा फुले यांचा. पुणे शहर महाराष्ट्रातल्या विद्येचे माहेरघर. तिथे भाजी बाजारात मंडईत गेलात तर तिथेही 'फुले' यांचे नाव आढळेल !...महात्मा जोतीराव फुले, हाच माझा आवडता समाजसुधारक.


जोतीरावांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंद फुले. पूर्वी त्यांचे नाव गोव्हे होते. पुढे त्यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करू लागले तेव्हापासून लोक यांना 'फुले' म्हणू लागले. १८२७ साली जन्मलेल्या 'ज्योती'ची आई तो फक्त एक वर्षाचा असताना वारली व त्याचा सांभाळ दाईने केला. 


त्यांचे प्राथमिक शिक्षण थोड्या फार अडचणीतून पुरे झाले. पण पुढे त्यांना इंग्रजीचा अभ्यास पुरा करायला बरीच वर्षे लागली. दरम्यान इ. १८४१ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा विवाहदेखील झाला होता.एका ब्राह्मण मित्राच्या वहाडात मिरवणुकीबरोबर नवऱ्या मुलीकडे जात असताना जोतीरावांचा घोर अपमान झाला. त्या प्रसंगामुळे 'मागास समाजा'ला अपमानित अवस्थेतून वर आणायला हवे अशी प्रेरणा त्यांना मिळाली. 


शिवाय अहमदनगरला ख्रिस्ती मिशनरी लोकांचे कार्य पाहून त्यांना स्फूर्ती आली, आणि पुण्यात परतल्यावर त्यांनी कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी शाळा काढली. प्रथम काही दिवस ते स्वतः शिकवीत. पुढे आपली पत्नी सावित्रीबाई फुले हिला शिकवून त्यांनी तयार केले, नंतर सावित्रीबाई त्या शाळेत मुलींना शिकवू लागली. 


या काळात फुले पतिपत्नींना अतिशय कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. उच्च वर्गातले लोक त्यांची निंदा करीत. सावित्रीबाई एक स्त्री असून स्वतः शिकली व मुलींना शिकविते म्हणून रस्त्याने जाता येताना लोक तिच्याकडे एखाद्या पापिणीसारखे बोट दाखवीत. दोघा पतिपत्नींना शिवीगाळ करत. 


अंगावर दगड विटांचा मारा करीत. कारण त्या काळात स्त्रीने शिक्षण घेऊ नये, फक्त चूल व मूल सांभाळीत राहावे असा समज होता. स्त्री शिकली तर बिघडेल, असा प्रचार केला जात असे. खरे पाहता स्त्री शिकली तर पुरुषी जुलुमाची बंधने तोडून ती स्वतंत्र होईल हीच खरी भीती लोकांना वाटत होती.


'स्त्री'ला शिक्षण देऊन आत्मोद्धार करण्याची प्रेरणा देणाऱ्या जोतीरावांनी मागास समाजासाठी दोन शाळा काढल्या. त्यांच्या या शिक्षण कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८५२ रोजी जोतीरावांचा सरकारतर्फे सत्कार करण्यात आला.


जोतीरावांच्या समाजसेवेची ही पहिली पावती होती. स्त्रियांना केवळ शिक्षण देऊन जोतीराव थांबले नाहीत. फसलेल्या, नाडलेल्या कमारीमातांचा प्रश्न जोतीरावांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. कित्येक नवजात मुले कचऱ्याच्या पेट्यात टाकली जातात. 


काही देवटाच्या पायरीवर ठेवली जातात हे जोतीरावांनी पाहिले होते अशांसाठी जोतीरावांनी इ. स. १८६४ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. कुमारी मातांना आधाराचा हात दिला. त्या काळात अपमानित व उपेक्षित स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या रक्षणासाठी हे धाडसी प्रयत्न जोतीरावांनी केले हेच त्यांचे सामाजिक सुधारणेतले दुसरे पाऊल होय.


जोतीराव विचारवंत व क्रियाशील सुधारक होते. महारमांगांसाठी आपल्या घरापुढचा हौद खुला करणाऱ्या जोतीरावांना उच्चवर्गीय समाजाने वाळीत टाकले पण जोतीरावांनी त्याची पर्वा केली नाही. 'गुलामगिरी', शेतकऱ्याचा ‘असूड' 'इशारा' 'जातिभेद विवेकसार' वगैरे ग्रंथ लिहून जोतीरावांनी त्या काळच्या मूर्ख व दुष्ट सामाजिक रूढींवर टीकेचे आसूड ओढले आहेत. 


इ. १८७३ मध्ये तर त्यांनी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला आणि हिंदू समाजातल्या अनेक अनिष्ट प्रथांविरुद्ध लोकांत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुणे नगरपालिकेत सदस्य झाल्यावरही त्यांनी हे प्रयत्न चालू ठेवले होते. या देशातील बहुजन समाज शेतकरी असून खेड्यापाड्यात राहणार आहे. त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक उद्धार झाल्याखेरीज त्यांचे अज्ञान, धर्मभोळेपणा दूर होणार नाही. 


सरकार व सावकार त्यांना फसवून लुबाडतात. हे शिक्षणाशिवाय संपणार नाही. नोकरी-चाकरीबरोबर व्यवहारज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचे शिक्षण सर्वांना द्यायला हवे असे आग्रही विचार त्यांनी केवळ पुस्तकांतून मांडले नाहीत तर ब्रिटिश सरकारला लेखी कळविले होते.


जोतीरावांना मारायला पाठवलेले दोन मारेकरी पुढे त्यांचे शिष्य झाले. शिकून मोठे झाले. यापेक्षा त्यांच्या समाजसुधारणेचा वेगळा पुरावा हवाच कशाला ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद




निबंध 2

माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak Essay in Marathi 



सुमारे शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचे ते दिवस, फारच भयानक होते. सारा देश गुलामगिरीचे जोखड खांद्यावर पेलत होता. हात बेड्यांत नि पाय शृंखलांत जखडले होते. समाजमनावर जणू काजळीचा थर साचला होता. काही कर्मकांडी काही थोतांडी तर काही षंढ प्रजा, आला दिवस मावळेपर्यंत नि मावळल्यावर उजाडेपर्यंत ढकलीत होती.


अंधश्रद्धा, निरक्षरता, अस्पृश्यता, भीती, रोगराई, भोळे-भाबडे गैरसमज ह्यांनी ती पछाडली होती. मनाची स्वतंत्रता व विचारांची देवाणघेवाण जणू संपुष्टात आली होती. वाहते जीवन ठप्प झाले होते. मृतवत मुर्दाड जनांची मांदियाळीच. दिशाहीन, लक्ष्यहीन!


अशा काळोखात एक लखलखता तेजस्वी तारा जन्माला आला. समाज सुधारणेचं कंकण हाती बांधून... महात्मा ज्योतिबा फुले. प्रचंड धाडसी व्यक्तिमत्त्व, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं कसब नि धारिष्ट्य अंगी बाणवलेलं, सत्यशोधक समाजाचे संस्थापक प्रवर्तक म. फुले.


त्याकाळी अस्पृश्यता अगदी जोमानं फोफावली होती. जातिभेद, उच्चनीचता ह्याला इतके उधाण आले होते की, दलितांना पिण्याचे पाणी देखील हाताने घेण्याची भ्रांत होती. ज्योतिबांनी समाजातील काही प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या मंडळींचा रोष पत्करून आपला पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला.



प्रथम लोक चिडले पण ज्योतिबांनी त्यांना ठणकावून सवाल केला की, पाण्याला कसला विटाळ?' समाज सुधारण्यासाठी उचललेलं हे त्यांचं पहिलं पाऊल. बालविवाह, जरठकुमारी विवाहांना त्यांनी कसून विरोध केला. पंचाहत्तर वर्षांच्या वृद्धाबरोबर दहा वर्षाच्या बालिकेचे लग्न लावून दिल्यावर साहजिकच लवकरच तिला वैधव्याला तोंड द्यावे लागे. 


सारा जन्म घरातल्यांची बोलणी खात अंधाऱ्या खोलीत उपाशीतापाशी राहन दिवस कंठावे लागत. तिच्यापढे दोनच पर्याय असत. एक सती जाण व दुसरा आत्महत्या. स्त्रियांची मानहानी व अधोगती शिक्षणाशिवाय संपणार नाही हे ज्योतिबांनी ओळखले नी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आपल्या घरातच आपली पत्नी सावित्रीबाई ह्यांना शिकवून, बहीण सगुणाबाईही समवेत होत्या. 


अनेक हालअपेष्टा, अपमान, टोमणे सहन करीत सावित्रीबाई शिक्षित झाल्या. एवढेच नव्हे तर पहिल्या ट्रेन्ड शिक्षिकाही! १८४८ साली बुधवार पेठेत भिडे वाड्यात त्यांनी एक कन्याशाळा काढली. शाळेची जागा विनाशुल्क देऊन वर भिड्यांनी देणगीही दिली. 


१८५० साली मुलींची संख्या सत्तरच्या वर गेली. त्यात सर्व जातीच्या मुली होत्या. काम वाढले. शाळा जोरात चालू झाली. स्त्रीशिक्षणाप्रमाणे दीन-दलितांचा, विधवांचा उद्धार इत्यादी सामाजिक प्रश्न त्यांनी हाती घेतले. स्त्रियांच्या पुनःस्थापनेसाठी आश्रम काढले. 'आधी केले, मग सांगितले' ह्याप्रमाणे विधवेच्या मुलाला स्वत: दत्तक घेतले. त्याला डॉक्टर केले. 


समाजापुढे एक उदात्त उदाहरण ठेवून आदर्श घातला. प्रसंगी सामाजिक संघर्षांना, मतभेदांना त्यांना सामोरे जावे लागले. चिखल, शेण, दगड, गोटे ह्यांचा मारही सहन करावा लागला. उपेक्षितांना शिक्षण, आत्मविश्वास व आत्मसन्मान हे त्यांचे उद्दिष्ट होते.


डोक्यावर मळलेले मुंडासे, अंगात कोपरी, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी ह्याच साध्या पोशाखात ते नेहमी वावरत. अगदी इंग्रज राजपुत्र भारतभेटीला आला असताना एका समारंभात ह्याच वेशात ते त्याच्या भेटीस गेले. खांद्यावरचं घोंगडं जमिनीवर अंथरून सरळ खाली बसले व वेळ येताच ड्यूक साहेबासमोर भारतात सर्वांना शिक्षणाची सोय करण्याची त्यांनी विनंती केली. 


भारतात कारखाने, उद्योगधंदे उभारण्यास सांगितले. भारतीयांचे प्रश्न मुद्देसूद मांडले. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कुठलाही कृत्रिमपणा नव्हता. सडेतोड, सुस्पष्ट व प्रभावी बोलण्यानं सर्वजण चकीत झाले. अविद्येचे समूळ उच्चाटन करण्याचा त्यांचा दृढनिश्चय होता. विद्येविना मती गेली मतीविना नीति गेली नीतीविना वित्त गेले एवढे अनर्थ एका अविद्येने केले.


असं ते स्पष्ट लिहितात.  शेतीच्या प्रश्नांवर, पाण्याच्या नियोजनावर ते नेहमीच अस्वस्थ असत. 'शेतीसाठी कनाल' हा त्यांचा लेख तर प्रसिद्धच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पहिले भाष्यकार ज्योतिबा होत. 'इशारा' 'चौदावे रत्न' 'शेतकऱ्याचा आसूड' 'गुलामगिरी' आदी ग्रंथरचनांतून त्यांची ज्वलंत भाषाशैली अनुभवास येते.


‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' या त्यांच्या ग्रंथातील सत्यवर्तनशील व्यक्तींची लक्षणे वाचून मन थक्क होऊन जाते व समर्थ रामदासांच्या दासबोधातील लक्षणांची' आठवण करून जाते. त्यांनी चिंतिल्याप्रमाणे विश्वकर्त्याने निर्मिलेले सर्व स्त्री-पुरुष जर सद्वर्तनी झाले, तर समाज व परिणामत: आपला देश सर्वार्थाने आगळ्या वेगळ्या सौंदर्याने नटेल ह्यात शंकाच नाही. 


त्यांच्या मनातील अपेक्षित बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा प्रत्येक मानवात ओतप्रोत भरला तर... काय बहार येईल असेही वाटते. मानवता व सत्य हीच माणसाच्या जीवनाची मूलभूत व श्रेष्ठ मूल्ये आहेत. हाच विचार त्यांनी 'अखंड' ह्या काव्यातून मांडलाय. ते म्हणतात,
सत्य सर्वांचे आदी घर । 

सर्व धर्मांचे माहेर। 

जगामाजि सुख सारे । 

खास सत्याची ती पोरे ।।


बोली भाषेशी जवळीक साधणारा हा प्रभावी व सडेतोड कवी असेही म्हणतो, 'मानवता धर्म' सत्य सर्व नीती। बाकी करापती। ज्योति म्हणे।।


चांगला माणूस देवालाही प्रिय असतो म्हणतात. १८८८ मध्ये ज्योतिबांना अर्धांगवायूचा झटका बसला. थोड्या कालावधीतच १८९० मध्ये ज्योतिबांची प्राणज्योत मालवली. परंतु अजरामर कार्यामुळे ते महात्मा झाले, अमर झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना आम्हा तमाम विद्यार्थ्यांचा त्रिवार मुजरा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद