माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi

 माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  माझी आजी   शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत श्री गजानन महाराजांच्या तसबिरीवरील मोगऱ्याचा हार प्रसन्नपणे हासत होता. फुलांचा दरवळ सर्वत्र पसरलेला. समईच्या प्रकाशात देवघर उजळून निघालेलं. 


आजीने पेढ्याचा नैवेद्य दाखविला. हात जोडले. तिच्या श्रांत मुखावर कृतकृत्यतेचं समाधान झळकत होतं. ओठ पुटपुटत होते, “महाराज, तुमच्या कृपेने अर्धी लढाई तर जिंकले. आता पुढची लढाई जिंकण्यासाठी धैर्य द्या, बळ द्या. आजीचं वय त्यावेळी अंदाजे २७, २८ वर्षे असेल. 


आजोबांवर काळाने आकस्मिक घाला घातला. पदरात तीन अपत्यं. दोन मुली, एक मुलगा. वय वर्षे ९, ७, ५.  आजी मोठी धीराची. त्याही परिस्थितीत ती डगमगली नाही. आपणच हाय खाल्ली तर आपल्या कच्च्याबच्च्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? या विवेकाने तिने दुःखाचे कढ अक्षरशः गिळून टाकले. 


सौभाग्यतिलकासवे अश्रूही पुसून टाकले, कायमचे! पितृप्रेमाला अंतरलेल्या अपत्यांसाठी तिने आईची माया आंथरली. वरून पित्याच्या छायेचं पांघरूण घातलं. नातलगांकडे मुलांची आबाळ होणार नाही याबद्दल आजीला खात्री होती. पण त्यांना दुसरीकडे ठेवायचं नाही ह्या निश्चयावर ती ठाम होती. 


त्यांच्या मुखात ती ओला, कोरडा घास वत्सल हाताने भरविणार होती. मुलांची आईपासून तरी ताटातूट होऊ नये असंही त्या मातृहृदयाला वाटलं असणार आणि आणखी एक सबळ कारण होतं. संकटाला सामोरं जाण्याचं बळ, धैर्य, जगण्याची उमेद यांचं उगमस्थान होतं तिच्या चिमण्या पाखरांजवळ. 


आजीच्या  बहिणीचं स्वतःचं घर होतं. तिच्या घरातील वरच्या दोन खोल्या आजीला निवाऱ्यास लाभल्या. लग्नापूर्वी चौथीपर्यंत शिक्षण झालेलं. आता हातपाय हालविण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सासर माहेरच्यांनी मदतीचे हात पुढे केले. आवश्यक तिथे मदतीचा कृतज्ञतापूर्वक स्वीकारही केला परंतु आजी मोठी स्वाभिमानी. 


कायमचा पांगुळगाडा वापरणं तिच्या रक्तात नव्हतं. तिने नॉर्मल स्कूलचं प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरविलं. नागपूर येथील 'सेवासदन' संस्थेत आजीने प्रवेश घेतला. प्रशिक्षण सुरु झालं. आवड, हौस म्हणून शिकणं वेगळं असतं. 


इथे तर नियतीने संसाराचा सारीपाट उधळून लावलेला! सर्व सोनेरी स्वप्नं धुळीला मिळालेली! तरूण वय, मुलंही लहान, सारंच प्रतिकूल. अशा मनःस्थितीत शिक्षण घेणं म्हणजे अग्निदिव्यच! त्या अग्निदिव्यासाठी आजीने कंबर कसली.  


कोणत्याही कामाला बाई ठेवणं शक्यच नव्हतं. आजी पहाटे उठून घरातील सर्व कामे (केरवारे, धुणं, भांडी, स्वयंपाक इत्यादी) उरकायची नि 'सेवासदन' मध्ये जायची. घरी आल्यावर कामं आ वासून तयारच. मुलांचं संगोपन, जेवणखाण, दुखणंखुपणं, शाळा, अभ्यास आणि स्वतःचा अभ्यास. 


तारेवरची कसरत चालू होती. एक वर्षाचा तो काळ युगासारखा वाटला असणार पण आजीला घड्याळाकडे पाहायला फुरसत कुठं होती म्हणा! संकटांना एकट्याने यायला आवडत नाही. त्यांनाही कोणाची तरी 'कंपनी' हवी असते म्हणे! परीक्षा जवळ आली त्याबरोबरच दुसरी एक परीक्षा (सत्वपरीक्षाच!) समोर उभी ठाकली. आजीला अल्सरच्या व्याधीने ग्रासले.


त्याकाळी म्हणावी तितकी प्रभावी औषधं नव्हती. औषधपाणी करायला पैशाचं बळही शून्यच होतं. पोट खूप दुखायचं. आजीच्या सोशिकपणाची कमालच म्हणायची. 'पावसानं झोडलं, राजानं मारलं तर दाद मागायची कोणाजवळ?' या प्रश्नाचं उत्तर तिला ठाऊक होतं. देव आणि दैव हात धुऊनच पाठीमागे लागले होते जणू! आजीने तेही दुःख निमूटपणे सोसलं.


जवळपास एक महिना जेवण तुटलं. भरीत भर कडक पथ्य! तीन पाव, दूध, नि उकडलेला बटाटा हा तिचा दिवसभराचा खुराक! ('संतुलित आहार' की 'पोषण आहार' म्हणायचं त्याला?) आजी 'आलिया भोगासी सादर' होतीच.


परीक्षा एक एक पावलाने जवळ येत होती तसं व्याधीनी उग्र रूप धारण केलं. दुखणं इतकं उमळलं की डॉक्टरांची पाचावर धरण बसली. पेशंटला परीक्षेला बसू द्यायचं की नाही? निर्णय करता येईना. पेशंटने मात्र कच खाल्ली नव्हती. आजीचा निर्धार कायम होता, 'काय वाट्टेल ते झालं तरी मी परीक्षा देणारच.'


असह्य पोटदुखीचा जवळपास उपाशी पोटीच तिने सामना केला. अभ्यासात कसूर केली नाही. कसोटीचा क्षण आला तसा निघून गेला. परीक्षा पार पडली. नव्हे, आजी परीक्षेच्या दिव्यातून पार पडली. आजीसह सर्व आप्तेष्टांचा जीव भांड्यात पडला. आणि 'काळरात्र सरून उषःकाल झाला.' आजीची तपस्या फळाला आली. प


रीक्षेचा निकाल मनासारखा लागला. अडथळ्यांचे डोंगर नाही तर पर्वत, हिमनग पार करून आजी परीक्षेत यशस्वी झाली होती. तेव्हा स्वर्गीय आजोबांचा ऊर नक्कीच आनंदाने, अभिमानाने, कौतुकाने भरून आला असणार.  धनतोलीतील सुळे यांच्या प्राथमिक शाळेत शिक्षकाची जागा रिक्त असल्याचे कळले. आजीने ताबडतोब अर्ज केला. तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली. 


स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न सत्यात अवतरलं. चौथीपर्यंत शिकलेल्या आजीने केवळ एक वर्षाचे हे प्रशिक्षण पूर्ण केले. पण अनुकूल परिस्थितीत घेतलेल्या सर्वोच्च पदव्या एका पारड्यात टाकल्या नि कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीत आजीने घेतलेलं शिक्षण दुसऱ्या पारड्यात टाकलं तर? 


कोणाचं पारडं जड असेल? थांबा, त्यासाठी तराजू आणण्याची मुळीच गरज नाही. फक्त एवढंच सांगते की त्या पारड्यात मातेचं वात्सल्य, मांगल्य, सेवाभाव, त्याग, प्रयत्न, आत्मविश्वास, सामर्थ्य. धैर्य, स्वाभिमान इत्यादींनी लखलखणारी परमपवित्र तुलसिदलं असतील. श्रीकृष्ण परमात्माला तोलणाऱ्या रुक्मिणीमातेच्या तुलसिदलाशी अगदी निकटचं नातं सांगणारी! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

 माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Essay In Marathi



'ऊठ बाळ, सकाळ झाली. उन्हे अंगावर आली बघ. प्रत्यक्ष सूर्यदेव उठवायला आलेत. झटकन उठ.' असे म्हणत सकाळी सकाळी माझं पांघरूण अंगावरून काढते ती 'माझी आजी'. एव्हाना तिची योगासने, प्राणायाम आटोपलेला असतो. तोंडाने एकीकडे ती म्हणत असते -


"प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जगी तोचि तो मानवी धन्य होतो। माझी आजी बी.ए. बी.एड्. झाली, मराठी हा स्पेशल विषय घेऊन. तिचे उच्चार, लेखनशैली खूप छान आहे, अन् विचार उच्च पातळीवरचे. 


ती निवृत्त शिक्षिका आहे, अगदी हाडाची. शिकवण्यात तिचा विशेष हातखंडा आहे. विशेष म्हणजे गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी कुठलाही विषय ती लीलया गळी उतरवते. तिच्याजवळ नुसतं बसण्याने, अवघड टॉपिक सोपा होऊन उलगडत सामोरा येतो. तिच्यामुळेच मराठी व्याकरणातल्या समास, संधीशी माझी घट्ट मैत्री झाली.


मी तिचा सगळ्यात मोठा नातू. दुधावरची साय. तळहातावरचा फोड. ती माझे खूप लाड करते पण शिस्तीच्या वेळी मात्र तिचा शिस्तीचाच शिरस्ता असतो. जातिभेद, वर्णभेद तिला मुळीच मान्य नाही. सर्वधर्म समभावावर तिची दृढ निष्ठा आहे. ईश्वर एकच आहे हे तिचं तत्त्व. 


ती श्रद्धाळू जरूर आहे, पण अंधश्रद्धांवर तिचा विश्वास नाही. मनाचा हळवेपणा, मृदुता तिच्या ठायी पावलोपावली दिसतो. अभ्यास करून कंटाळलो तर विरंगुळा म्हणून ती कधी विनोद चुटकुले सांगून हसवते, कधी महाभारतातल्या व्यक्तीरेखा समजावते, तर कधी इसाप, बिरबल डोळ्यांसमोर उभे करते. 



तिच्या मांडीवर डोके ठेवूनच मी माझे मराठीतले कित्येक निबंध, कल्पनाविस्तार तयार केले. पत्रे तर तिने इयत्ता पहिलीपासूनच माझ्याकडून लिहन घेतली व पोस्टातही टाकायला लावली. पोस्टाचे व्यवहार, मी त्यातूनच शिकलो. माझ्या परीक्षेच्या वेळी ती मला खूप धीर देते. माझा आत्मविश्वास जागा ठेवते. 


परीक्षेला निघताना मी जेव्हा तिच्या पावलांना वाकून स्पर्श करतो, तेव्हा ती मनोमन आशीर्वाद देते ह्र 'संकल्प तुझा विजयश्रीचा सिद्धीस जाणार आहे प्रयत्नांच्या पाठी यश हाती हात घालून येणार आहे.' हे जीवन खूप सुंदर आहे. आनंदी राहावं, समाधानानं जगावं, चित्त प्रफुल्लित ठेवावं. 


महत्त्वाकांक्षी असावं, पण कुणाशी ईर्षा करू नये. सुहृदांशी मैत्री करावी. अहंभावाला शिवू नये. 'देता' हात आपल्याजवळ असावा ही तत्त्वे तिने लहानपणापासूनच आमच्या मनावर ठसवली. एकदा रामनवमीला मी तिच्याबरोबर राममंदिरात गेलो. पाच मिनिटे ती देवासमोर डोळे मिटून बसली. मी तिला विचारले 'रामरक्षा म्हणत होतीस का गं आजी?' तिने होकार दिला व म्हणाली त्या रामाला अंत:करणातून सांगितलं,


“भेगाडलेल्या जमिनींसाठी चिंब ओली सर दे वज्रासारख्या देहामध्ये सामर्थ्यशाली मन दे देणार असशील सढळ हाताने तर .... विश्वकल्याणी दान दे!" हे ऐकून आजीची माझ्या मनातली प्रतिमा लख्ख उजळली. रोज संध्याकाळी आई सांजवात लावते. उदबत्तीच्या मंद सुगंधाने मन प्रसन्न होते. वातावरण पवित्र होते. वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे


असे तोंडाने म्हणत हसत-खेळत रात्रीचे जेवण होते. झोपताना आजी आम्हा भावंडांना तोंडी हिशेब विचारते. उत्तरे देता देता आम्ही कधी झोपी जातो कळत देखील नाही. सकाळी उठण्यासाठीचा घड्याळाचा गजर आजीने हमखास लावलेला असतो.


वाचन व बागकाम हे आजीचे आवडते छंद. आरोग्याविषयीचे विविध मासिकातले लेख वाचून आजोबांसकट सर्वांचेच आरोग्य ती सांभाळते. तिच्या परसबागेत तिला हवे तेव्हा कुंडीतल्या झाडांना वांगी, मिरच्या, टोमॅटो व देवपूजेसाठी गुलाब, मोगऱ्याची फुलेही सापडतात.


माझी आजी पुरोगामी विचारांची आहे पण शिस्तीची भोक्ती असल्यामुळे वागणुकीतील स्वातंत्र्य व स्वैराचार यातली मर्यादारेषा ओलांडलेली तिला चालत नाही. समाजात स्त्री-पुरुष समानता असली तरी स्त्री स्त्रीच्याच जागी रहावी ह्यात तिचे दुमत नाही. स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, सासुरवास, हुंडाबळी ह्यावर ती कडाडून टीका करते.


नवी शिक्षण पद्धती व प्रचलित गुणदान पद्धती पाहून तिच्यातली शिक्षिका तळमळते. गर्भवती महिलांचे डोहाळेजेवण, सर्व रक्त तपासण्या, सोनोग्राफी सकट करण्याची पद्धत तिने आमच्या गावात सुरू केली. तिला संगणक वापरायला खूप आवडतो. सध्या ती की-बोर्डवर टायपिंग शिकतेय. 


माझी परीक्षा झाल्यावर तिला इंटरनेटचा वापर शिकवण्याचं मी वचन दिलंय. त्यामुळे ती खूप खुश झाली. शिक्षणासाठी मी जर घरापासून लांब गेलो, तर ती मला ईमेलवरून सर्वांची खुशाली कळवणार आहे, असा तिचा निश्चय आहे. आहे की नाही. मज्जा! हेवा वाटला ना माझ्या मित्रांनो? 


आजी जवळ असो नाहीतर लांब असो, माझ्या मनातलं तिचं अस्तित्व समईतल्या मंद तेवणाऱ्या वातीसारखंच आहे, स्वच्छ, सात्त्विक, तेजस्वी प्रकाश देणारं! तिचं माझं नातं शब्दांपलिकडचं आहे, एवढंच सांगतो, तीच माझं मंदिर अन् तीच माझा राम आहे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद