माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आवडते पुस्तक मराठी निबंध बघणार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू हे माझे अत्यंत आवडते पुढारी तर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे माझे सर्वात आवडते लेखक. पंडितजींच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांनी 'मराठा' मधून त्यांच्या जीवनावर लेख लिहिले, त्यांचा संग्रह म्हणजे 'सूर्यास्त'. माझे सर्वात आवडते पुस्तक तेच.
पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्यावर मृत्युलेख लिहिले. विशेषांक काढले. पण "मराठा" मधली लेखमाला पंडितजींच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एकेक पैलू रोज दाखवू लागली. खरे पाहता आचार्य अत्रे हे पंडितजींचे स्तुतिपाठक नव्हते.
नेहरूंवर सर्वात कठोर टीका महाराष्ट्रात तरी आचार्य अत्र्यांनीच केली. पण याचा अर्थ असा नव्हे की ते त्यांची योग्यता मी आणि माझ्या गोष्टी ओळखत नव्हते, त्यांना मानत नव्हते । असे असते तर असे हृदयस्पर्शी, गुलाबपुष्प-कोमल, भावतरल लेख त्यांनी कसे लिहिले असते ? हे पंधरा लेख म्हणजे अश्रुसरोवरांत उमललेले भद्भुत तांबुस कमळच. सरस्वतीच्या कंठातला हा कौस्तुभमणीच,
या पुस्तकातील एकेक शब्द, एकेक वाक्य एकेक लेख पंडितजींच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची बारीकसारीक सूक्ष्म अंगे अत्यंत हळुवारपणाने मुलायमपणे साकारीत जातो. 'जगातून युद्ध नाहीसे व्हावे, यासाठी त्यांनी जन्मभर युद्ध केले' 'राजकारणाची काट्याकुट्यांची वाट चालत असतानाही हृदयावर त्यांनी रसिकतेचा टवटवीत गुलाब धारण केला होता', 'पंचेचा कोटी लोकांच्या देशाचे पंतप्रधान या देशात अगदी एकटे होते,
ही नेहरूंच्या जीवनाची सर्वात मोठी शोककथा होती.' अशी उदाहरणे किती द्यावीत ? सर्व पुस्तकच पुनर्मुद्रित करावे लागेल. ते लेख एकत्रितपणे वाचण्यात फार मोठा आनंद आहे. इथे चरित्राची रिळे नाहीत व्यक्तिचित्रांच्या रंगीत प्रतिमा आहेत.
पंडित नेहरूंचे निधन, त्यांची अंत्ययात्रा, डॉ. राधाकृष्णन्सकट सामान्य माणसांच्या डोळ्यांतले अश्रू, त्यांची लोकप्रियता, त्यांचा रूबाबदारपणा, त्यांचे बालप्रेम, गांधीजी व नेहरू यांच्यामधला फरक, पंडितजींचे भावदर्शी वक्तृत्व, प्रिय पत्नीच्या वियोगातून आलेला एकलेपणा असे विविध पैलू दर्शविणारा यातला प्रत्येक लेख म्हणजे नेहरूंच्या चरित्र सरोवरात उमललेली अत्र्यांच्या प्रतिभापुष्पाची एकेक गंधकोमल पाकळीच ! तिचा सुगंध घ्यावा तेवढा थोडाच !
भारताच्या मावळत्या सूर्याला, प्रतिभेच्या पौर्णिमेत न्हाऊन निघालेल्या महाराष्ट्र गिरीवरच्या पूर्णचंद्राने आपल्या 'पुष्पपराग सुगंधित अति शीतल, अशा वायुलहरीमी गंधित झालेल्या चंद्रकरांनी केलेला हा मानाचा मुजरा आहे.' तो सांगतो आहे 'नेहरू, न हरू !
प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हे पुस्तक असलेच पाहिजे. ते वाचल्यावर स्वर्गस्थ जवाहरलाल नेहरूंना तो अभिमानाने सांगेल 'स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी इथे जन्मती !' लेख, निबंध म्हणून अभ्यासण्यासारखा आहे. आकर्षक सुरुवात, मुद्देसूद मांडणी व समर्पक. शेवट यांचे ते नमुनेच आहेत. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद