नको तो रविवार मराठी निबंध | Nako To Rravivar Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण नको तो रविवार मराठी निबंध बघणार आहोत. शालान्त परीक्षा जवळ येत चालली होती. घरात ऊठसूट साऱ्यांकडून उपदेशाचा मारा होत होता. "सनी, तुला आता वेळ फुकट दवडून चालायचा नाही.
रोज आठ-दहा तास अभ्यास व्हायला हवा. आणि-रविवारी तर सर्वात जास्त. सर्व विषयांची उजळणी रविवारी पुरी करायची. कमीत कमी दोन पेपर तरी रविवारी सोडवायचे बरं का ? आणि मुख्य म्हणजे छायागीत व टीव्ही सिनेमा बंद. लक्षात ठेव हे !''
एक ना दोन. असा उपदेश मला रोजच ऐकावा लागत होता. खरे म्हणजे रविवार किती सुखाचा, आरामशीर ! उशिरा उठावे. सकाळी झकास नाश्तापाणी करावे. रविवारी सकाळी टीव्ही-वर प्रतिभा व प्रतिमा, महाभारतसारखे कार्यक्रम पाहावेत.
दुपारी आपल्या घरातल्या भावंडांबरोबर गप्पा करीत आरामशीर भोजनावर ताव मारावा. बरं दुपारचं पोट भरून जेवण झाल्यावर थोडी सुस्ती येणारच ! तेव्हा उगाच आपली थोडा वेळ-म्हणजे दीड-दोन तास छोटीशी डुलकी लागावी ! एरव्ही रोज दुपारी शाळा, संध्याकाळी क्लास असल्यावर दुपारची झोप कुठली लागणार ? एक रविवारच काय तो सुखाचा.
संध्याकाळी ५-५॥ वाजता उठून परत हातपाय तोंड धुऊन पुन्हा थोडा नाश्ता करून झकास चहा घ्यावा. तोपर्यंत टीव्हीचा पिक्चर सुरू होतोच. तो संपल्यावर रात्री जेवण केल्यावर जरा चार-दोन मित्रांना भेटून रात्री झोप घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्याही कामाला-चुकलो-अभ्यासाला तयार !
पण माझे हे सुखस्वप्न प्रत्यक्षात येण्याची बातच नव्हती. गेले आठ-दहा रविवार घरच्यांनी दारच्यांनी आणि पाहुण्यांनी माझा नुसता छळ मांडलाय. रविवार असला तरी आई सकाळी अभ्यासाला म्हणून लवकर उठविणार ! डोळे चोळून तोंड धुऊन पुस्तक घेऊन मी बसतो खरा पण तुम्ही सांगा जांभया देत तुम्हांला वाचता येतं का ? आणि वाचलेले लक्षात तरी राहते का
त्यात सकाळी कधी दधकेंद्रावरून दूध आणा, नाहीतर रॉकेलच्या रांगेत डबा घेऊन उभे राहा हा व्याप आहेच! नंतर स्नान वगैरे करून जरा कुठे अभ्यासाला बसावे तर आजूबाजूचे शेजारी आमच्या घरी टीव्ही पाहायला येणार. त्यांनी सगळे कार्यक्रम पाहायचे. मी मात्र बाहेर गॅलरीत बसन अभ्यास करायचा !
दर रविवारी कोणीतरी पाहुणे टपकणारच. कधी बाबांचे दोस्त, तर कधी आईचे महिला मंडळ. साऱ्यांनी आमच्या घरात बसून टीव्ही पाहून गप्पा मारायचा. त्यांच्यासाठी काही खास बेत केला तर सामान आणायला हा बंदा सेवक त्याच्यासाठी तयारच. मग पुख्खा झोडताना, किंवा जेवणखाण संपल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मला अभ्यासाचे महत्त्व सांगायचे.
“सनी, नाटक, सिनेमा, टीव्ही, बंद बरं का' असे सुनवायचे, आणि क्वचित दुपारी आई बाबांना आग्रह करून एखाद्या नाटकाला किंवा इंग्रजी पिक्चरला न्यायची. “घराकडे नीट लक्ष ठेव बरं का ! आणि अभ्यास कर हं ! नाहीतर झोपशील !'' हे वर आहेच.
यामुळे मला रविवार नकोसा झालाय. ज्या दिवशी कधी पुरेशी झोप नाही, खेळायला मोकळीक नाही, वा घरात बसून टी.व्ही. पाहता येत नाही, बाहेर मित्रांबरोबर हिंडाफिरायला मिळत नाही. आणि घरी येणाऱ्या लोकांची कामं करून ऊठसूट उपदेशाचा काढा प्यावा लागतो. असला रविवार काय कामाचा ! नको तो रविवार !मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद