प्रभातसमयो पातला मराठी निबंध | Prabhat Samayo Patala Essay Marathi

 प्रभातसमयो पातला मराठी निबंध | Prabhat Samayo Patala Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रभातसमयो पातला  मराठी निबंध बघणार आहोत.  मकर्रर्रर्रर्र sss दारावरची घंटी वाजली. मी दिवा लावून दार उघडले. वसईचा दूधवाला आला होता. दूध घेतल्यावर चहा करून प्यालो व अभ्यासाला बसलो. अर्ध्या पाऊण तासानंतर मनात आले, मुंबईची सकाळ तरी पाहूया-उघड्या डोळ्यांनी. शर्ट चढवून शरदला दरवाजा लोटायला सांगून बाहरे पडलो.


रस्त्यांवर मोटारी व बसेस तुरळक हिंडत होत्या. दूधकेन्द्रावर दुधाच्या बाटल्यांसाठी व पिशव्यांसाठी रांगा लागल्या होत्या. आजूबाजूच्या इमारतीच्या दारा-खिडक्यांमधून टेबललॅम्पचे प्रकाश आणि रेडिओवरचे मंगल प्रभातचे सूर बाहेर झिरपत होते. 


फुटपाथवर अजून बरीचशी अंथरुणे दिसत होती. चावी बंद पडलेल्या बाहुल्यांसारखी त्यावरील माणसे स्तब्धपणे पहुडली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली बरीच दुकाने बंद होती. उघडे होते फक्त मेवाडी चहावाले व हॉटेलांचे अर्धवट उघडे दरवाजे. 


हॉटेलांतून काही चार दोन माणसे दिसत होती. रस्त्यावर हळूहळू गर्दी वाढत होती. वर्तमानपत्रांचे गळे घेऊन बरीचशी मुले लगबगीने जात होती. त्यातल्याच एकाकडून एक वर्तमानपत्र मी विकत घेतले. रस्त्यावरच्या दिव्याखाली उभा राहून मी पेपर वाचू लागलो. 


इतक्यात कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज आला. मुंबईत कोंबडा...? पण मग लक्षात आले-सायकलवरून जाणा-या एका दाढीवाल्या पेपरविक्याने स्वतः कोंबड्यांचा आवाज काढला होता. चालताचालता स्टेशनकडे जाणा-या पुलावर येऊन मी थबकलो. आकाशातले नक्षत्रांचे दिवे हळूहळू मावळत होते. 


खाली रस्त्यावरचे दिवे विझवले जात होते. पहाटेचा झुंजुमुंजू संधिप्रकाश भोवतालच्या वातावरणावर सायीसारखा दाटत होता. दिशांच्या कडा लाजलेल्या नववधूच्या गो-या गालांप्रमाणे लाल झाल्या होत्या. सूर्य दिसत नव्हता, पण सूर्यकिरण मात्र काळोखाचा भेद करीत पसरू लागले. 


कवी माडगूळकरांची 'अंधाराचा हत्ती मरतो किरणांचे लागून भाले', ही ओळ मला आठवली. होनाजीच्या 'घनश्याम सुंदरा...' पासून तो कुसुमाग्रजांच्या झाला उषःकाल राणी' पर्यंतच्या अनेक कविता आठवल्या व त्यांच्या वर्णनांची यथार्थता पटली. त्या रम्य वातावरणांत मी तन मन हरपून उभा होतो.


इतक्यात कुठला तरी गिरणीचा भोंगा झाला व माझी तंद्री भंगली ! 'अरुणोदय झाला' याऐवजी गिरणोदय झाला' असा बदल कवी मढेकरांनी केला तो योग्यच. खेड्यांत सूर्योदय होतो. पक्ष्यांच्या किलबिलाटांने आणि स्त्रियांच्या भूपाळ्यांनी माणसांना जाग येते (अशी खेडीही आता हळूहळू अस्तंगत होऊ लागली आहेत.) 


मुंबईला जाग येते कर्णकर्कश घंटेने, घड्याळ्याच्या गजराने, आगगाडीच्या शिट्यांनी, मोटारी व बसेस यांच्या आवाजांनी, गिरण्यांच्या भोंग्यानी ! खेड्यात सकाळ होते, पण वेळेची किंमत नसते. उलट शहरात सूर्यनारायणाच्या दर्शनाआधीच सकाळ होऊन गेलेली असते.


होनाजीच्या भूपाळीमधले मंगल वातावरण, कुसुमाग्रजांच्या काव्यातला कोमल कुसुमगंध सगळा खेड्यात. इथे शहरात त्याचा मागमूस नाही. इथे पक्ष्यांची किलबिल नाही, वाहनांची गलबल आहे. सरितेची खळखळ नाही, जनतेची धावपळ आहे, विनोदाने म्हणावेसे वाटते, इथे मंगल प्रभात होत नाही, ‘दंगल प्रभात' होत असते.


म्हणून ग. दि. मांच्या 'प्रभात समयो पातला' या चरणानंतर...भोवती कोलाहल दाटला, असे उद्गार मुंबईकरांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहरे पडतील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद