रेल्वे स्टेशनचे दृश्य मराठी निबंध | Railway Stationche Drushy Marathi Nibandh

 रेल्वे स्टेशनचे दृश्य मराठी निबंध | Railway Stationche Drushy Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  रेल्वे स्टेशनचे दृश्य  मराठी निबंध बघणार आहोत.  रेल्वे स्टेशन एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इथे रेल्वे गाड्यांची ये-जा असते. त्यातून प्रवासी येतात जातात. मालाची ने-आण केली जाते. दिवस असो की रात्र येथे नेहमीच गडबड असते. कारण गाड्या आणि प्रवासी येत जात राहतात. प्रवाशांचे येणे-जाणे, फेरीवाल्यांचे आवाज. गाड्यांचा आवाज, इंजिनांच्या शिट्या यामुळे गोंधळ असतो.


मागच्या रविवारी मला पुणे रेल्वे स्टेशनवर जाण्याची संधी मिळाली. माझे काका कलकत्त्याहून येणार होते. त्यांना घेण्यासाठी गेलो होतो. ते प्रथमच पुण्याला येणार होते. स्टेशनच्या बाहेर कार, रिक्षा, टॅक्सी, हमाल आणि फेरीवाल्यांची खूप गर्दी होती. प्रवासी आपले सामान घेऊन पळत आहेत की काय असे वाटत होते. काही लोकांनी आपले सामान हमालांच्या डोक्यावर दिले होते.


तिकिटाच्या खिडकीजवळ लांबच लांब रांगा होत्या. अनेक जण कोणाला घेण्यासाठी वा सोडण्यासाठी आले होते. मी एक प्लॅटफार्म तिकीट घेतले आणि आत गेलो. प्लॅटफॉर्मवर अफाट गर्दी होती. 


पुस्तके, चहा, पानविडी इत्यादीची दुकाने होती. फेरीवाले ओरडून ओरडून आपला माल विकत होते. थोड्या थोड्या वेळाने गाड्या येत जोत होत्या. गाड्या गर्दीने खचाखच भरल्या होत्या. काकांची गाडी येण्यास अजून अर्धा तास होता. 


म्हणून मी रेल्वे स्टेशनवरील दृश्यांचा आनंद घेऊ लागलो... देशाच्या सर्व भागांतील लोक तिथे होते. त्यांचे रंगी-बेरंगी कपडे आकर्षक होते. ते सर्व आपापल्या भाषेत बोलत होते. काही लोक इंग्रजीत बोलत होते. 


असे वाटत होते की जणू एक छोटासा भारतच तेथे उपस्थित होता. मी एका चहाच्या स्टॉलवर जाऊन चहा घेतला. प्लॅटफार्मवर कोठेही रिकामी जागा नव्हती. कुठे कोणी झोपले होते तर कुणी बसले होते. बेंचांवर लोक बसले होते. 


टी.टी. गार्ड, मेकॅनिक आणि इतर कर्मचारी आपापल्या कामात गुंतलेले होते. पोलीस गस्त घालीत होते. लाऊड स्पीकरवर गाड्यांच्या येण्या-जाण्याची सूचना उद्घोषक देत होते. अर्धा तास कसा गेला कळले नाही. काकांची गाडी धडधडत प्लॅटफार्मवर येऊन थांबली. काका एका डब्याच्या दरवाजात उभे होते. 


गाडी थांबण्यापूर्वीच मी त्यांच्याजवळ पोहोचलो. सामान हमाला जवळ दिले आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. एक टॅक्सी करून घरी जाण्यास निघालो. आम्ही घरी पोहोचलो, परंतु रेल्वे स्टेशनचे दृश्य माझ्या आठवणीत पक्के बसले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद