सुंदर मी होणार मराठी निबंध | Sundhar Me Honar Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुंदर मी होणार मराठी निबंध बघणार आहोत. प्रेक्षकांची तोबा गर्दी. वातावरण संगीताच्या मायावी सुरांनी धुंद झालेलं. दिव्यांच्या झगमगाटाने झळकणारा रंगमंच! आयोजकांच्या मुखातून माझं नाव पुकारलं गेलं. आश्चर्याच्या धक्क्यातून स्वतःला कशीबशी सावरत, गोंधळलेल्या
मनःस्थितीतच मी मंचावर आरोहण केलं. आश्चर्याचा दुसरा धक्का! आता तर अक्षरशः वेड लागायची पाळी आली. एका लावण्यवतीने आपल्या शुभ नि सुंदर हस्ते 'मिस इंडिया' पदाचा मुगुट माझ्या शिरावर ठेवला. मी लाजेने अर्धमेली झाले. काय ऐकते नि काय पाहते मी हे?
स्पर्धेत भाग न घेताच मी 'मिस इंडिया'? आयोजकांचं डोकंबिकं तर फिरलं नाही? की मी स्वप्नात आहे? हाताला जोरदार चिमटा घेऊन पाहिला. “अग, किती जोरानी चिमटा काढतेस?" असं म्हणत, किंचाळतच मी जागी झाले. त्या क्षणी अस्मादिकांची हसून हसून इतकी काही मुरकुंडी वळली म्हणता!
सावळा रंग, चारचौघींसारखं रूप, किरकोळ शरीरयष्टी, बेताचीच उंची लाभलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीने 'मिस इंडिया' होणे ही कल्पनाच किती हास्यास्पद! जी गोष्ट माझ्या ध्यानी, मनी (स्वप्नीही) नव्हती ती स्वप्नात का दिसावी? हा प्रश्न मला भेडसावीत होता आणि माझ्या परीनी, या प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढलंय.
आपण सर्व सत्य, शिव, सुंदर अशा परमेश्वराचा अंश आहोत. सौंदर्याची विलक्षण ओढ आपल्या रोमारोमात भरलेली आहे ती यामुळेच. सौंदर्याने नटलेली प्रत्येक वस्तू (कलाकृती, स्थळ, व्यक्ती, निसर्ग) आपल्याला भावते. पाषाणयुगातील मानवाचं सांगता येणार नाही, पण मला वाटतं, आरशाचा शोध लागला आणि आपली आरशातली छबी न्याहाळताना 'आपण सुंदर दिसावं' अशी सुप्त इच्छा मनामनात जागृत झाली असावी.
ते काही असो, या स्वप्नामुळे माझ्या विचारात विलक्षण क्रांती घडून आली. मी मनाला विचारलं, “मला सुंदर होता येईल?" मन ठामपणे म्हणालं, "हो नक्कीच" ठरलं तर! मी सुंदर होणार! आपलं रंग, रूप, व्यक्तिमत्त्व (उंची, जाडी इत्यादी) बदलणं आपल्या हातात नाही. कसं शक्य होणार होतं? ब्युटीपार्लरमध्ये जाऊन?
स्वतःच्या रूपाला, रंगाला, बांध्याला साजेशी रंगरंगोटी, केशभूषा, वेषभूषा करून मी नेहमीपेक्षा थोडी नीटनेटकी, आकर्षक दिसू शकले असते. नियमित व्यायाम करून शरीर सुडौल बनविण्याचा प्रयत्न करता येणार होता. पण नाक, डोळे तर तेच राहणार होते.
आणि रंगरंगोटी पुसली नि केशभूषा विस्कटली की अधिक विद्रूप दिसण्याचीच शक्यता! मेकअपसाठी स्वतःवर खूप वेळ घालवावा लागणार! इतकं स्वतःकडे लक्ष द्यायला फुरसत आहे कोणाला? शिवाय शाळेत नटूनथटून जाणं म्हणजे बोलणी खायचीच लक्षणं!
मग काय प्लॅस्टिक सर्जरी? एकदा केली की पाहायला नको. छे! छे! एवढा प्रचंड खर्च! आणि तेही कृत्रिम सौंदर्यच, काळाच्या ओघात नष्ट होणारं! त्या सौंदर्याच्या मोबदल्यात मला बरंच काही गमवावं लागणार ते वेगळंच! जन्मदात्या आईशी, परमप्रिय ताईशी असलेलं साम्य संपुष्टात येणार. किंबहुना माझं मीपणच त्यात हरवून जाईल.
खरं तर यापैकी काही एक मला करायचं नाही. पण तरीही मी सुंदर होणार हे पक्कं, अगदी काळ्या दगडावरची रेघ! कसं तर मी माझ्या मनाचं सौंदर्य वाढविणार - मनाला विद्रूप करणाऱ्या काम, क्रोध, अहंकारादी मळाची पुटं धुऊन टाकणार.
मनाचं सौंदर्य वाढविणारं ब्युटी पार्लर निघालं आहे? आहे तर! त्या ब्यूटीपार्लरकडे (संतसाहित्याकडे) माझी पावलं वळणार. अंतरंग शुद्ध झालं की बहिरंग सुंदर असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. संत चोखामेळा हेच सांगतात.
"ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा ।
काय भुललासी, वरलिया रंगा ?"
शूर्पणखा, पूतना यांनी अत्यंत सुंदर (मायावी) रूप धारण केल होतं. पण त्यांचं सौंदर्य कोणाही कलावंताला कौतुकाचा विषय वाटला नाही. (एखाद्या सुंदर स्त्रीला शूर्पणखेची उपमा द्यायचं धाडस कोणी करणार नाही) याउलट रामभक्तीत न्हाऊन निघालेल्या, अंगावर सुरकुत्या पडलेल्या वृद्ध शबरीचं चित्र रेखाटण्यात कलावंताला धन्यता वाटेल. बहिरंगाला भुलणाऱ्या अज्ञानी जीवाला सुभाषितकार अंतरंग नटवायला सांगतात.
'श्रोत्रं श्रुते नैव न कुण्डलेन ।
दानेन पाणिर्न तु कंकणेन ।
विभाति कायः खलु सज्जनानाम् ।
परोपकारेण न चन्दनेन ।।
शास्त्राध्ययनाने कान शोभून दिसतात. कुंडलाने नाहीत. हात कंकणाने नव्हेत तर दानाने सुंदर दिसतात. चंदनाचा लेप लावून शरीराचं सौंदर्य खुलत नाही, तर परोपकार हा असली दागिना आहे बावनकशी सोन्याने मढविलेला! महाभारतासारखा ललामभूत ग्रंथ जगाला देणारे महर्षी व्यास कृष्णवर्ण, कुरूप होते.
सॉक्रेटिस, इसाप यांचं बहिरंग पाहू नका. त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहा. उत्तमोत्तम विचार रत्नांचा खजिना तुमचे डोळे दिपवून टाकेल. अल्लाउद्दिनच्या गुहेसारखा! समर्थ रामदासस्वामी म्हणतात, 'चातुर्ये शृंगारे अंतर' शरीराला वस्त्रालंकारानी नटविता येतं पण मनाचा दागिना आहे चातुर्य.
मी या संतांचा, विचारवंतांचा उपदेश शिरोधार्य मानणार. मग माझं मस्तक उत्तमोत्तम विचारांनी शोभून दिसेल. माझी केशभूषा कोणतीही असो. मुखावरील प्रसन्नता, हास्य, आनंद, समाधान, शांती ही माझी सौंदर्यप्रसाधनं असतील. डोळ्यात भूतदया, प्रेम, वात्सल्य, आत्मीयता असल्यावर काजळाचा शृंगार हवाय कशाला?
दुसऱ्यांना सुखविणारे, दुःखी जीवाचं सांत्वन करणारे नम्र, स्नेहा शब्द ज्या ओठातन बाहेर पडतात त्यांना लिपस्टिकची काडीमात्र (कांडीमात्र) गरज नाही. सद्गुणांचे अलंकार मी बिनधास्त धारण करीन, त्याला चोर, डाडूंपासून मुळीच धोका नाही. हे सौंदर्य जन्मभर टिकणार.
म्हातारपणी शरीर जराजर्जर झालं तरी पर्वा करायचं कारण नाही, कारण मन ताजंतवानं असेल. हृदयात भक्तिभाव स्थिर होऊन, मी सद्गुरूंच्या पायाशी बसेन तेव्हा तर विश्वाचं साम्राज्ञीपद माझ्या पायाशी लोळण घेईल. भारत सुंदरीच काय विश्वसुंदरीही माझ्या भाग्याचा हेवा करतील.
जाता जाता एक अतिमहत्त्वाचा प्रश्न! माझ्यासारखं सुंदर व्हायला कोण कोण तयार आहे? मग येणार माझ्याबरोबर? सौंदर्य पंढरीचे वारकरी म्हणून, सद्गुणांची पताका खांद्यावर घेऊन? |मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद